रासायनिक उद्योगांत अकार्बनी कच्च्या मालांमध्ये फॉस्फरसचा वापर होतो. फॉस्फरस हा क्रियाशील असल्यामुळे निसर्गामध्ये मूलद्रव्य रूपात आढळत नाही. भूकवचामध्ये १३ टक्के इतक्या प्रमाणात निरनिराळ्या संयुगांमध्ये हा अनेक ठिकाणी आढळून येतो व भूकवचातील विपुलतेच्या दृष्टीनं त्याचा अकरावा क्रमांक आहे. फॉस्फरसची महत्त्वाची अशी दोन बहुरूपं आहेत. एक पांढरा अथवा पिवळा फॉस्फरस व दुसरा तांबडा फॉस्फरस. निसर्गात फॉस्फरस हा अधातू खनिज फॉस्फेट (रॉक फॉस्फेट)च्या स्वरूपात आढळतो. खनिज फॉस्फेटमध्ये मुख्यत: ट्रायकॅल्शिअम डायफॉस्फेट असतं. काही लोहखनिजांमध्ये फॉस्फरस असतो.
वनस्पती आणि प्राणी जीवनामध्ये फॉस्फरसला फार महत्त्वाचं स्थान आहे. वनस्पतींना फॉस्फरस हे मूलद्रव्य खतांच्या माध्यमातून पुरविलं जातं, तर प्राण्यांना फॉस्फरस हे वनस्पतींपासून मिळतं. प्राण्यांच्या हाडांमध्येही डाय आणि ट्रायकॅल्शिअम फॉस्फेट असतं. खनिज फॉस्फेटपासून सुपरफॉस्फेट, अमोनिअम फॉस्फेट इत्यादी फॉस्फरसयुक्त खतं बनविली जातात. प्राण्यांच्या हाडांच्या भुकटीचाही फॉस्फरस खत म्हणून वापर होतो.
अंधारात पांढरा फॉस्फरस हवेत उघडा ठेवला तर तो हिरवट रंगानं चकाकतो व त्या वेळी त्याचं सावकाश ऑक्सिजनशी संयोग होऊन फॉस्फरस ट्रायऑक्साइड (P4O6) मिळतं. ह्य़ाच चकाकण्याला स्फुरण असं म्हणतात; परंतु हा जर हवेत तापविला, तर पांढऱ्या ज्योतीनं जळतो व फॉस्फरस पेंटॉक्साइडचा (P4O10) पांढरा ढग तयार होतो. संहत सल्फ्युरिक आम्ल किंवा संहत नायट्रिक आम्ल या ऑक्सिडीकारक आम्लांनी फॉस्फरसचं ऑक्सिडीकरण होऊन फॉस्फोरिक आम्ल मिळतं. फॉस्फरस क्षपणकारक आहे. तो नायट्रिक आम्लाचं क्षपण करतो व नायट्रोजन डायऑक्साइड मिळतं. तांबे, चांदी व सोने यांच्या क्षारांच्या द्रावणांत फॉस्फरस घातल्यास त्यांचं क्षपण होऊन ते ते धातू मिळतात. कॉस्टिक सोडय़ाच्या विद्रावात पांढऱ्या फॉस्फरसाचे तुकडे घालून ते तापविल्यास फॉस्फीन (PH3) वायू मिळतो. तांबडय़ा फॉस्फरसवर कॉस्टिक सोडय़ाची क्रिया होत नाही. पांढरा फॉस्फरस क्लोरिनमध्ये ताबडतोब पेटतो. तांबडा फॉस्फरस क्लोरिनमध्ये तापविल्याशिवाय पेट घेत नाही. गंधकाबरोबर याची क्रिया होते व सल्फाइडं मिळतात. निरनिराळ्या धातूंबरोबर हा तापविल्यास त्या त्या धातूंची फॉस्फाइडं मिळतात.
शुभदा वक्टे (मुंबई) , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – प्रतिसाद की प्रतिक्रिया?
मानस, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायचीय. आवडणार नाही कदाचित, तरी सांगणारे.. मानसी धिटाईनं म्हणाली. ‘क्काय?’ मानसनं भुवया उंचावून त्रासिक चेहऱ्यानं म्हटलं. हेच. अगदी हेच सांगायचंय तुला!! ‘क्काय?’ मानसचा सूर चढा. ‘हेच की तू कोणत्याही गोष्टीला धाडदिशी प्रतिक्रिया देऊन टाकतोस. पाठचापुढचा विचार न करता. एखादी कळ दाबावी, त्या इलेक्ट्रॉनिक वेगानं तू उलट बोलतोस. ते कधी तुझ्या आताच्या ‘क्काय?’ सारखं प्रश्नार्थक असतं, नाही तर ‘माहित्येय. उगीच टाइमपास करू नकोस’, असली उत्तरं देतोस. ’मानसी रोखून पाहत म्हणाली. ‘चूक असतं का? तू ना उगीच काहीतरी सायकॉलॉजी वाचून फिलॉसॉफी झाडतेस..’ मानस म्हणाला. ‘बरंय, मग पाच मिनिटांचा टाइम आऊट.. पण आज बोलू..’ मानसी. ‘बरं, बरं, सांग काय ते!’ मानस.
माझं म्हणणं सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगते. चल एक दीर्घ श्वास घे. घेतलास, आता आस्ते आस्ते सोड. सोडलास, आता पुन्हा दीर्घ श्वास.. किती निवळला बघ तुझा चेहरा. मानसी म्हणाली. ‘सांग मग आता, उत्सुक आहे. सॉरी, तुला फटकन् काही तरी बोलून गेलो..’
‘ओके, मानस, आता कसं छान वाटलं!  मला असं सांगायचंय की तू कोणत्याही प्रसंगाला चटकन रिअ‍ॅक्ट करतोस. म्हणजे तू विचार न करता आपली रिअ‍ॅक्शन देऊन टाकतोस. आताच बघ ना, मी काही सांगायच्या आत, तू प्रतिक्रिया देऊन मोकळा. तुझ्या लक्षात येतंय का की तुझ्या बऱ्याचशा प्रतिक्रिया म्हणजे निव्वळ शेरेबाजी असते. त्याबद्दल तुला ‘सॉरी’ही म्हणावं लागतं.. तुझी ही सवय योग्य नाही रे.. मानसीनं थांब अशी खूण करून मानसला दोन तीन दीर्घ श्वास घ्यायला सांगितलं.
‘आता बोल!’ मानसी स्मित करत म्हणाली. ‘काय बोलू? तू तर मला गप्प राहायला सांगत्येस.. सॉरी, तुला आणखी काही तरी म्हणायचं असेल. मी पुन्हा प्रतिक्रियाच दिली. मला सुचतं ते मी बोलून टाकतो. खूपदा पस्तावतो. माणसं दुखावली जात असतील, माझ्याविषयी गैरसमज करून घेत असतील ना. आणि नंतर ‘सॉरी’ म्हणून दुरावलेले लोक जवळ येतात असं नाही..’
‘व्वा, मानस किती छान समजदारीनं बोललास रे. हे बघ, मी प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यामध्ये फरक करते. प्रतिक्रिया म्हणजे झटपट रिअ‍ॅक्शन तर रिस्पॉन्स म्हणजे काही वेळानं विचारपूर्वक दिलेला प्रतिसाद. प्रतिक्रिया आपोआप दिली जाते. आपल्या नकळत, सवयीने आपण बोलून टाकतो, जरा उचलली जीभ लावली टाळ्याला. प्रतिक्रिया मुख्यत: भावनिक, इमोशनल असतात. म्हणजे, तिरस्कार, नावड किंवा अगदी वाहवासुद्धा. होकारात्मक प्रतिक्रिया तशा ठीक, पण खूपदा आपण कसली स्तुती करतो हेदेखील कळत नाही. फेसबुकवर लोक कशालाही लाइक, ‘वॉव’ अशा रिअ‍ॅक्शन देतात. खूपदा त्या नुसत्याच वरवरच्या निर्थक आणि बाष्कळ असतात. अशा रिअ‍ॅक्शन घ्यायच्या सवयी पूर्वीदेखील होत्या, पण फेसबुकनं त्या बोकाळल्या आहेत.. दोघे हसले.
‘मग रिस्पॉन्स कसा द्यायचा? आणि तो होकारात्मकच असला पाहिजे का?’ मानसनं विचारलं. ‘नाही रे, प्रतिसाद म्हणजे विचारपूर्वक बोलणं. शब्द मोजूनमापून, तोलून वापरायचे असं नाही तर मोजके, अर्थवाही हवेत. प्रतिसाद म्हणजे फक्त कॉमेंट नाही. नीट चौकशी करणारे प्रश्न असू शकतात, आपलं मत असू शकतं. आपले विचार, वाचन आणि समज प्रकट करणं म्हणजे प्रतिसाद देणे..’
मानस दोन-चार श्वास घेऊन म्हणाला, पटलं, आवडलं आणि जमेलही! मानसी मनमोकळी हसली.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

प्रबोधन पर्व – कारखान्यातील माणसांचा विचार..
‘‘आपल्या घराण्याचा जसा अेक वंशवृक्ष असतो, तसेच आपल्या संस्थेत वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत प्रत्येकास आपली जागा व अेकमेकांशी कोणते नाते आहे हे दाखवणारा संघटना-वृक्ष प्रत्येक कारखान्यात असला पाहिजे. आणि त्याच्या आधारेच कारभार चालला पाहिजे. तसे असेल तरच कारखान्याची सर्व कामे घडय़ाळाप्रमाणे सुसूत्र चालून त्यात गोंधळ अुडण्याचा संभव अुरणार नाही.. संघटनेचे सवरेत्कृष्ट अुदाहरण म्हणजे आपले शरीर हेच होय. त्यांतील निरनिराळी अिंद्रिये व अवयव विशिष्ट कार्ये पार पाडीत असली तरी त्या सर्वाचे नियंत्रण मेंदू करीत असतो. त्याच प्रकारे चालकालादेखील आपल्या कचेरीत बसून साऱ्या कारखान्याची देखभाल व्यवस्थितपणे करता आली पाहिजे.. आता क्षणभर असे समजा, की कारखान्याचे काम सुसंघटित चालण्यासाठी तुम्ही त्याची योग्य अशी अंतर्गत व्यवस्था केलीत. पण तेवढय़ाने संपत नाही! तर या निरनिराळ्या कामांसाठी तुम्ही नेमलेली माणसे कोणत्या वृत्तीने आपली कामे पार पाडतात याचेही महत्त्व फार मोठे आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. तेही एक शास्त्र आहे.’’ असे सांगत शं. वा किलरेस्कर त्या शास्त्राविषयी लिहितात –
 ‘‘माणसांना वागविण्याचे हे काम कौशल्याचे तर खरेच; पण ज्याचा स्वभाव तिरसट, अरेराव, भेकड अथवा क्षुद्र नसेल, त्याला आपल्या हाताखालच्यांकडून योग्य प्रमाणात व योग्य प्रतीचे काम करवून घेता येणे फारसे अवघड वाटायला नको!.. आपल्या हस्तकांशी अूठसूट चढेल सुरात बोलले म्हणजे ते आपले काम चांगले करतील ही कल्पनाच चुकीची आहे. चालकाने योग्य वेळी खंबीरपणा अवश्य दाखवला पाहिजे. पण तसे करताना आपल्याकडून अन्याय अथवा पक्षपात होणार नाही याचीही दक्षता त्याने घेतली पाहिजे. कामगारालाही आपल्यासारख्याच भावना आहेत या गोष्टीचा त्याने केव्हाही विसर पडू देता कामा नये. अेवढय़ासाठी सहानुभूती, गुणग्राहकता व अुत्तेजन यांमुळे जे काम होअू शकते ते नुसते हुकूम सोडून होत नाही, हे स्वत:च्या अनुभवावरून मी सांगू शकतो.’’