18 September 2020

News Flash

बिरबलाची माकडीण आणि ‘रेप्टिलियन ब्रेन’

माणसाला स्वत:चा जीव सर्वात महत्त्वाचा असतो, हे सिद्ध करण्यासाठी बिरबलाने हौदातल्या एका खांबावर माकडिणीला तिच्या पिल्लासह उभं केलं होतं.

माणसाला स्वत:चा जीव सर्वात महत्त्वाचा असतो, हे सिद्ध करण्यासाठी बिरबलाने हौदातल्या एका खांबावर माकडिणीला तिच्या पिल्लासह उभं केलं होतं. हौदात हळूहळू पाणी भरलं जात होतं. पाणी नाकातोंडाशी येऊ लागलं तेव्हा पिल्लाला वाचवण्याचा तिने खूप, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. मात्र जेव्हा तिचा स्वत:चा जीव धोक्यात आला तेव्हा तिने पिल्लाला सरळ स्वत:च्या पायाखाली ठेवून स्वत:चा जीव वाचवायचा प्रयत्न केला, ही गोष्ट आहे. असं होऊ शकतं. कारण सस्तन प्राण्यांमध्ये जरी पिल्लांविषयी प्रेमाची भावना निर्माण झालेली असली तरी पृथ्वीवरचे सर्व सजीव हे आधी स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. एका सत्य घटनेनुसार, बर्फाळ प्रदेशात काही जणांनी ‘ते सत्तर दिवस’ कसे काढले, याची आपल्याला पुस्तकात वाचून माहिती असेल. यामध्ये बर्फाळ प्रदेशात अडकून पडल्यामुळे, त्यांना कित्येक दिवस काही खायला न मिळाल्यामुळे, जीव वाचवण्यासाठी, अखेरीला कुठलाही मार्ग न उरल्यामुळे ते आपल्याच मृत सहकाऱ्यांचं मांस खाऊन जगतात. कारण इथे जगणं ही महत्त्वाची कृती आहे. जेव्हा कुठेही चेंगराचेंगरी होते, आग लागते, गुदमरायला होतं, श्वास घेता येत नाही तेव्हा इतरांना ढकलून स्वत:ला प्रथम बाहेर काढलं जातं. स्वसंरक्षणासाठी पायात सारी शक्ती ओतली जाते. असं घडतं, कारण मेंदूतला रेप्टिलियन ब्रेन स्वत:चं अस्तित्व आधी जपायला सांगतो. अस्तित्व टिकवणं हेच या अवयवसमूहाचं काम आहे.

मात्र असं असलं तरी स्वत:चा जीव धोक्यात घालून माणसं इतरांचा जीव वाचवतात, अशीही उदाहरणं आहेत. अंधारात गड उतरणारी हिरकणी असो किंवा अचानक आग लागल्यावर स्वत:बरोबर इतरांचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्ती असोत. त्यांचा रेप्टिलियन ब्रेनही आधी ‘स्वत:ला वाचवण्याच्या’ आज्ञा देत असेल, पण त्या झुगारून ‘समस्या सोडवण्याच्या’ मार्गावर काही माणसं जातात. दर वर्षी शौर्य गाजवणाऱ्या लहान मुलांनाही राष्ट्रपतींतर्फे पारितोषिक दिलं जातं. ती खूपच लहान मुलं असूनही स्वत:पेक्षा इतरांचा जिवाचा विचार आधी करतात. अंगात बळ आणून योग्य वेळी योग्य विचार करून दुसऱ्यांना वाचवतात.

मेंदूच्या या कार्यपद्धतीचा विचार केला तर असं जाणवतं की अशा माणसांचा मेंदू एकाच वेळी अनेक दिशांनी विचार करू शकतो, धावू शकतो, जे सुचेल ते पटकन कृतीत आणू शकतो.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 12:04 am

Web Title: the reptilian brain
Next Stories
1 कुतूहल : चार रंगांचे प्रमेय
2 मेंदूशी मैत्री : कोशात चुकीचेही शब्द!
3 मेंदूशी मैत्री : खोटं बोलण्याचं वाढीव ओझं..
Just Now!
X