31 March 2020

News Flash

मधुमेहामागचे इंगित

मधुमेहाशी थेट संबंध असणाऱ्या ‘इन्सुलिन’च्या शोधाशी अनेक संशोधकांची नावे जोडली आहेत.

मधुमेहाशी थेट संबंध असणाऱ्या ‘इन्सुलिन’च्या शोधाशी अनेक संशोधकांची नावे जोडली आहेत. या संशोधनाची सुरुवात जर्मनीच्या पाउल लांगेरहान्स याने १८६९ साली स्वादुपिंडाची रचना अभ्यासताना शोधलेल्या पेशीसमूहांपासून झाली. मात्र, या ‘लांगेरहान्स पेशीसमूहां’चे कार्य तेव्हा समजले नव्हते. स्निग्ध पदार्थाच्या पचनक्रियेतील स्वादुपिंडाचा सहभाग अभ्यासण्यासाठी, १८८९ साली जर्मनीच्या ऑस्कर मिन्कॉस्की आणि योसेफ फॉन मेरिंग यांनी कुत्र्यावर केलेल्या प्रयोगात त्याचे स्वादुपिंड काढून टाकले. त्यानंतर त्या कुत्र्याला तीव्र स्वरूपाचा मधुमेह झाल्याचे त्याच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणावरून दिसून आले. या कुत्र्यात स्वादुपिंडाच्या छोटय़ा भागाचे आरोपण केल्यानंतर या कुत्र्याच्या रक्तातील साखर पुन्हा कमी झाली. कुत्र्यावरच्या या प्रयोगातून स्वादुपिंड आणि मधुमेह यांतील संबंध स्पष्ट झाला.

१९०१ साली युजिन ओपी या अमेरिकी संशोधकाला मधुमेहाने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या स्वादुपिंडांतील लांगेरहान्स पेशीसमूह खराब झाले असल्याचे आढळले. त्यावरून या पेशीसमूहातून मधुमेहाशी संबंधित स्राव निर्माण होत असल्याची शक्यता त्याने व्यक्त केली. सन १९२० मध्ये मोझेस बॅरॉन या संशोधकाने एका लेखात- मिन्कॉस्की आणि फॉन मेिरग यांचे संशोधन पुढे नेल्यास त्यातून मधुमेह नियंत्रित करू शकणाऱ्या पदार्थाचा शोध लागू शकेल, असे मत व्यक्त केले होते. कॅनडातील टोरँटो विद्यापीठातील संशोधक फ्रेडरिक बँटिंग याने तो लेख वाचल्यावर, यात रस निर्माण होऊन त्याने मधुमेहावरचे पुढील संशोधन हाती घेतले.

सन १९२१ मध्ये बँटिंगने चार्ल्स बेस्ट याच्या साहाय्याने केलेल्या संशोधनात, एका कुत्र्याच्या स्वादुपिंडातून लहान आतडय़ांत येणाऱ्या नलिका बंद केल्या. त्यानंतर कुत्र्याला मधुमेह झाला नसल्याने, स्वादुपिंडातून येणाऱ्या पाचकरसात मधुमेहाला कारणीभूत ठरणारे रसायन नसल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर या कुत्र्याच्या स्वादुपिंडाचा द्रव बनवून तो स्वादुपिंड काढून टाकलेल्या (आणि त्यामुळे मधुमेह झालेल्या) कुत्र्याला टोचला. अल्पावधीतच त्या कुत्र्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले. या निष्कर्षांची खातरजमा केल्यानंतर, जेम्स कॉलिप या रसायनतज्ज्ञाच्या मदतीने त्यांनी या द्रवातला, रक्तातील साखर नियंत्रित करणारा ‘इन्सुलिन’ हा पदार्थ शुद्ध स्वरूपात वेगळा केला. या इन्सुलिनची त्यानंतर एका १४ वर्षांच्या मधुमेही मुलावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. माणसांवरच्या अधिक चाचण्यांनंतर, ‘एली लिली’ या कंपनीने इन्सुलिनचे व्यापारी स्तरावर उत्पादन सुरू केले.

– डॉ. रमेश महाजन

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2019 2:01 am

Web Title: what is diabetes mpg 94
Next Stories
1 स्क्रीन-शिक्षण
2 मेंदूशी मैत्री : अन्न की उत्पादनं?
3 मेंदूशी मैत्री : अभ्यास : स्वत:हून
Just Now!
X