06 July 2020

News Flash

कुतूहल – पाणी ‘वैश्विक द्रावक’ का आहे?

नाना तऱ्हेचे पदार्थ पाण्यात सहजतेने विरघळतात, कारण पाणी एक उत्तम द्रावक आहे. शास्त्रीय भाषेत ज्या द्रावणात आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी असे दोन्ही पदार्थ विरघळतात त्याला (सार्वत्रिक)

| April 1, 2014 01:01 am

नाना तऱ्हेचे पदार्थ पाण्यात सहजतेने विरघळतात, कारण पाणी एक उत्तम द्रावक आहे. शास्त्रीय भाषेत ज्या द्रावणात आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी असे दोन्ही पदार्थ विरघळतात त्याला (सार्वत्रिक) वैश्विक द्रावक म्हणतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. याचे कारण पाण्याच्या रेणूत दडलेले आहे. दोन हायड्रोजन आणि एक ओजिन मिळून बनतो पाण्याचा रेणू! पकी हायड्रोजन आहे धन भारित आणि ऑक्सिजन ऋण भारित. दोन्ही विद्युतभार विरुद्ध टोकांना असल्यामुळे पाण्याचा रेणू पोलार झाला आहे. त्यामुळे इतर कोणतेही भारित रेणू पाण्याच्या रेणूशी सौम्य विद्युत बंधनात अडकतात, जेणेकरून तो पदार्थ विरघळतो. दुसरी बाब म्हणजे पाण्याच्या रेणूचा आकार इतर द्रावकांपेक्षा लहान आहे. त्यामुळे पाण्याचे रेणू दुसऱ्या पदार्थाच्या रेणूत शिरून त्याला घेरून टाकतात, त्यामुळे तो विरघळतो. पाण्यात कित्येक कार्बनी तसेच अकार्बनी पदार्थही सहज विरघळतात.
पाण्याचे भारित रेणू हे अत्यंत वेगाने आजूबाजूला फिरत एकमेकांना टक्कर देत असतात. त्याला ब्राऊनिअन हालचाली म्हणतात. या टकरीमुळेदेखील अनेक पदार्थाचे कण पाण्यात तरंगत राहतात. अशा द्रावणांना कलिल (कोलॉइड) द्रावण म्हणतात. कलिल कण द्रावणात एकसारखे मिसळलेले असतात. शिवाय कलिल द्रावणातील कण अतिशय लहान असल्यामुळे साध्या डोळ्यांनी द्रावणात वेगळे दिसत नाहीत.
उदाहरणार्थ आपले रक्त, गाईचे दूध. मात्र अधिक भारित पदार्थ टाकताच ही कलिल द्रावणे मोडून पडतात. जसे मीठ टाकल्याने दूध फाटते.  
मात्र काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. जसे तेल, वाळू, धूळ वगरे. त्यांना पाण्यात विरघळण्यासाठी साबण वा डिर्टजटचा उपयोग करावा लागतो. साबणाचे रेणू हे भारित असतात. ते तेलाच्या कणाभोवती चिकटून त्याला भारित बनवतात आणि त्यामुळे तेलाचा कण पाण्यात मिसळून जातो, पण विरघळत नाही. यालाच ‘इमल्शन’ म्हणतात. औषधे, घराचे रंग ही इमल्शने आहेत.   
पाण्याची द्रावणे, कलिल (कोलॉइड) आणि इमल्शने आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगाची आहेत.
डॉ. कमलेश कुशलकर, मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई   office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – गणित आणि भातशेती
गणितं सोडविणं आणि गणिताचा अभ्यास करणं ही शैक्षणिक जीवनातली मोठी आवाहनं सगळ्यांना खुणावतात (वा घाबरवतात!) तशी शिक्षण मानसशास्त्रालाही! गणिती विचार करणं आणि चिकाटीने न सुटलेलं प्रमेय सोडवीत राहणं या स्वभाव आणि बुद्धिवैशिष्टय़ांवर संशोधन चालू आहे. गणितं शिकविण्याच्या सोप्या आणि सखोल पद्धतींवरही संशोधन होत आहे; परंतु पेनसिल्वानिया विद्यापीठातील संख्याशास्त्रीय मानसशास्त्राला एका नव्या आयामाचा शोध घ्यावासा वाटला. याचं मुख्य कारण असं की, एकाच पद्धतीने शिकवलेल्या गणिताचं आठवीमधील मुलं वेगवेगळ्या पातळ्यांवर आकलन का करतात? हा प्रश्न. सर्वात सोपं उत्तर होतं अर्थातच, मुलांचे बुद्धय़ांक. त्याचं विवरण करूनही प्रश्न पुरता सुटेना. निरनिराळ्या समाजसंस्कृती, वेश आणि भाषक मुलांमध्ये गणिताची आकलनक्षमता भिन्न असावी, असा विचार सुचला आणि त्यावर अनमानधबक्यापेक्षा संख्याशास्त्रीय संशोधनानं काही निश्चित निष्कर्ष काढण्याचं ठरवलं. हे संशोधन फक्त अमेरिकेत स्थलांतरित विविध भाषक आणि वांशिक मुलांप्रमाणे सहा वेगवेगळ्या देशांत करायचं ठरवलं आणि ळकटरर नावाचा प्रचंड प्रकल्प पेनसिल्वानिया विद्यापीठाने घेतला. एखाद्या विषयाचा रिसर्च करण्यासाठी विद्यापीठ पातळीवर इतकी संसाधनं आणि प्रशिक्षित व्यक्तींना तयार करण्यासाठी लाखो डॉलर इन्व्हेस्ट करता येतात आणि त्याचे निष्कर्ष गोपनीय न ठेवता सर्वसामान्य लोकांकरिता खुले केले जातात; ही गोष्टच आपल्याला अपरिचित आहे.
ळकटरर या संशोधन प्रकल्पांतर्गत गणिताची चाचणी आणि १२० प्रश्नांची (जनरल माहितीसाठी) प्रश्नावली वापरली. प्रश्नावली गणिताइतकी किचकट होती. लक्ष एकाग्र राहण्याची मुलांची क्षमता त्यात तपासली होती.
एकूणच फक्त कठीण गणित हा निकष न वापरता, चिकाटीने प्रश्न सोडविण्याची किती क्षमता मुलांच्या स्वभावात आहे, याचा त्यांना तपास घ्यायचा होता. निष्कर्ष अर्थातच आश्चर्यकारक नव्हता.
गणिती तर्क आणि चिकाटी या बाबतीत अमेरिकेपेक्षा तैवान हाँगकाँग, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूर येथील मुलांनी बाजी मारली. केवळ गणिताच्या चाचणीत नाही तर सर्वसामान्य प्रश्नावलीतल्या उत्तर देण्याच्या क्षमतेतही पौर्वात्य देशातील मुलं अधिक तरबेज होती.
या पौर्वात्य संस्कृतीमधल्या मुलांचं पाणी काही वेगळंच असा सरधोपट निष्कर्ष न काढता, ही मुलं कोणत्या नागर-अनागर समाजातून आली याचाही अभ्यास आणि संख्याशास्त्रीय संशोधन केलं. खऱ्या अर्थानं सांगोपांग विचार, चिकित्सा, निखळ सत्यशोधनाचा हा नमुना होता.
या समाजशास्त्रीय संशोधनासाठी पाहणी मोठी रंजक आहे. या सर्व समाजघटकांचं नातं तिथल्या अनागर, शेतीप्रधान संस्कृतीशी जोडलेलं होतं. शेतीप्रधान कुटुंबांतली ही मुलं होती. नवल तर आणखी पुढे आहे. या पौर्वात्य देशातील शेती अर्थातच भातशेती होती. हजारो र्वष या मुलांचे पूर्वज भातशेती करीत होते. भातशेती हा सर्वात डिमांडिंग आणि कष्टाळू प्रकार मानला जातो.
भाताच्या लागवडीत आवणी-लावणी-खुरपणी, अशा अनेक पायऱ्या असतात. पाऊस-पाण्यात उन्हातान्हात कामं करणं आवश्यक असतं. हीच चिकाटी, हाच कष्टाळूपणा मुलांच्या नसानसात भिनलेला होता आणि तोच गणितं सोडवायला अखेर कामी आला! संशोधनाचे आयाम आणि  व्याप्ती किती व्यापक असते, याच्या अभ्यासानं आपण थक्क होतो. जिज्ञासू वाचकांनी माल्कम ग्लॅडवेलच्या ‘आऊटलायर्स’ या पुस्तकाचा जरूर वेध घ्यावा.
डॉ.राजेंद्र बर्वे –   drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – पाच शेर राग आणि पाच शेर प्रेम
‘‘तलवारीशी तलवारीनेच लढले पाहिजे. त्याशिवाय चालावयाचें नाही’ असा आपल्यांपकी बऱ्याच लोकांना वहिम आहे. त्यातलें खरें कारण हें आहे की आज आपल्यापाशी तलवार नाही. पुष्कळ वेळा जी वस्तू आपल्यापाशी नसते तिची किंमत आपण उगीच वाढवीत असतो. तशी आपली दशा झाली आहे. आपल्या मनात तलवार कां? म्यानात नाही म्हणून. खरोखर आपल्या म्यानात जर तलवार असती तर तिच्याविषयी आपल्या मनाला इतका मोह वाटला नसता. कारण, आपल्याला खरी गोष्ट समजली असती. ‘तलवारीशी तलवार’ हें म्हणणें जर आपल्या वडिलांच्या कानावर आलें असतें, तर त्यांना हसू आवरतें ना. कारण त्यांना लढाईचा अनुभव होता. कसें लढावयाचें, हें त्यांना माहीत होतें. त्यांनी आपल्याला सहज समजावून सांगितलें असतें की, ‘बाबा, तलवारीशी ढालीने लढावें लागतें.’ ज्या वेळेस लोक ‘त’ म्हटल्या ‘तलवार’ समजत होते, त्या वेळेस ही गोष्ट लोकांना माहीत होती. आज आम्ही ‘त’ म्हटल्या  ‘ताकभात’ समजतो, त्यामुळे ही गोष्ट आमच्या गळीं उतरत नाही.’’ विनोबा भावे ‘मधुकर’ या पुस्तकात प्रेम आणि राग यांचा समन्वय कसा साधावा, हे सांगताना पुढे लिहितात, ‘‘आपण ‘जशास तसें’ पुष्कळ वेळा म्हणतो,  पण आपल्याला त्यातला मतलबच समजत नाही. ‘जशास तसें’ याचा अर्थ इतकाच करावा की,  दुष्मनाची तलवार जितकी मजबूत तितकी आपली ढाल मजबूत असली पाहिजे.  ‘जशास तसें’ याचा अर्थ तलवारीशी तलवार लढवावयाची, असा करणें मंद बुद्धीचें काम आहे. तलवारीशी लढवावयाची तर ढालच. पण त्या ढालीचा सहन करण्याचा जोर तलवारीच्या मारण्याच्या जोरापेक्षा कमी पडता कामा नये. दुश्मनाच्या सवालात जर पांच शेर राग भरलेला असला तर आपल्या जबाबात पांच शेराहून कमी प्रेम नसावें.’’   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2014 1:01 am

Web Title: why water is global thinner
टॅग Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल: पेट्रोलियम द्रावणे
2 मनमोराचा पिसारा: हाऊ डॉक्टर्स थिंक?
3 मनमोराचा पिसारा: मुलखाचा आळशी
Just Now!
X