सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली व उत्क्रांतीच्या विविध स्तरांतून जात सजीवांनी पाणी, जमीन व आकाशदेखील काबीज केले. उत्क्रांतीचा परमोच्च बिंदू गाठत जमिनीवर सस्तन प्राण्यांची निर्मिती झाली. असे जरी असले तरी त्यातील काही सस्तन प्राण्यांनी पाण्याचाच अधिवास म्हणून स्वीकार केला. त्यांची शरीररचना तेथील परिस्थितीशी अनुकूलन साधणारी असल्याने एक वेगळा सस्तन प्राण्यांचा समूह उदयास आला, तो म्हणजेच ‘जलचर सस्तन प्राणी’. यातील काही सागरातच आढळणाऱ्या सस्तन प्राण्यांची ही माहिती.

सागरी सस्तन प्राणी सिटाशियन (व्हेल, डॉल्फिन), पिन्नीपीडिया (सील, समुद्रसिंह, वॉलरस), सायरेनियन (डय़ूगाँग, मॅनाटी) व फिस्सीपीडिया (पाणमांजर, ध्रुवीय अस्वले) या गणांमध्ये (ऑर्डर) विभागले गेले. यांची शरीररचना वेगवेगळी असते. भूचर सस्तन प्राण्यांमध्ये आढळणारे अग्रबाहू व पश्चबाहू या अवयवांचे रूपांतर पहिल्या तीन गणांतील प्राण्यांमध्ये वल्हेसदृश अवयवात झाले. तर पायाचे रूपांतर रुंद आणि सपाट शेपटीवजा अवयवात झाले. या दोन्ही उपांगांचा उपयोग त्यांना पाण्यात सुलभरीत्या हालचाल करण्यास होतो. त्यामुळे यातील काही प्राणी जसे व्हेल, डॉल्फिन, डय़ूगाँग व मॅनाटी हे कधीच जमिनीवर न येता संपूर्ण आयुष्य पाण्यात घालवतात. सील, समुद्रसिंह (सी-लायन), वॉलरस हे प्राणी जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकतात, परंतु त्यांच्या शरीराच्या बोजड रचनेमुळे ते जमिनीवर सरपटत किंवा खुरडत हालचाल करतात. पाण्यामध्ये मात्र ते अतिशय चपळतेने वावरतात. हे प्राणी केवळ प्रजनन व पिल्लांची काळजी घेण्यासाठी जमिनीवर येतात, परंतु खाद्याच्या शोधार्थ पाण्यातच परततात. चौथ्या गणातील सस्तन प्राणी (पाणमांजर, ध्रुवीय अस्वले) यांना अग्रबाहू व पश्चबाहू हे अवयव इतर सस्तन प्राण्यांच्या अवयवांसारखे लांब, पंजा आणि नखे असलेले असतात. ध्रुवीय अस्वले आपला बराचसा काळ पाण्याबाहेर बर्फावर अथवा हिमनगावर व्यतीत करतात, तर पाणमांजरे पाण्यात व जमिनीवर दोन्हीकडे राहतात.

सर्व सागरी सस्तन प्राण्यांना आता कायद्याद्वारे संरक्षण मिळाले आहे. यातील अनेक प्रजाती आता संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. अयोग्य मासेमारी, प्रदूषण, तापमानवाढ, समुद्रात केलेल्या अणुचाचण्या अशा अनेकविध मानवी उपद्वय़ापाने या मौल्यवान सागरी संपदेला धोका निर्माण झाला आहे.

– डॉ. राजीव भाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org