पर्यावरणाचा सातत्याने होत असलेला ऱ्हास आणि मानवी आरोग्यावर तसेच इतर जैविक संसाधनांवर याचे होत असलेले गंभीर दुष्परिणाम हा गेल्या काही दशकांपासून चिंतेचा विषय झाला आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनातील धोरणकर्ते, राज्यकर्ते तसेच पर्यावरणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक-विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक या सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय राखणे गरजेचे आहे. या साऱ्यांना पर्यावरणविषयक शास्त्रीयदृष्टय़ा अचूक आणि परिपूर्ण माहिती उपलब्ध करून दिल्यास त्यांना विविध समस्यांची व्याप्ती कळेल आणि त्या अनुषंगाने पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घेता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेच उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने १९८२ च्या डिसेंबरमध्ये ‘पर्यावरणीय माहिती प्रणाली’ (एन्व्हॉयर्न्मेंटल इन्फॉर्मेशन सिस्टीम- एन्व्हिस) हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत पर्यावरणविषयक माहिती शासकीय संकेतस्थळांवर संकलित करून अद्ययावत केली जाते. पर्यावरणाशी संबंधित विविध क्षेत्रांतील शास्त्रीय माहिती विविध मार्गानी जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जाते. ही संकलित माहिती धोरणात्मक निर्णय घेणारे अभियंते आणि शास्त्रज्ञांनाही उपयुक्त ठरते. यासाठी विविध पर्यावरणविषयक मुद्दय़ांवरील माहितीचा संग्रह, त्यांची संगतवार मांडणी आणि विविध पर्यावरणीय विषयांचा प्रसार यासाठी एक परिपूर्ण कार्यजाळे (नेटवर्क) तयार करण्याची योजना या उपक्रमात आखण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध संकेतस्थळे आणि ऑनलाइन डेटाबेस यांचाही समावेश यात करण्यात आला आहे.

हे काम विकेंद्रित स्वरूपात चालते. मंत्रालय स्तरावर नियंत्रण करणारे मुख्य केंद्र आणि देशाच्या विविध भागांत विषयानुरूप उभारण्यात आलेली केंद्रे अशी या उपक्रमाची रचना आहे. प्रदूषण, घातक रसायने यांमुळे उद्भवणाऱ्या पर्यावरणीय समस्या असोत की पर्यावरण संवर्धनासाठी केले जाणारे कल्पक प्रयत्न किंवा पर्यावरणनिष्ठ तंत्रज्ञानाचा वापर असो; त्यांसंदर्भातील माहितीचे संकलन करणे, त्या त्या पर्यावरणीय विषयातील पुस्तके, अहवाल, लेख आदी संदर्भसाहित्याचा संग्रह करणे, आवश्यक असेल तेव्हा ही किंवा अन्य माहिती केंद्रीय स्तरावर उपलब्ध करून देणे ही देशभर विखुरलेल्या ‘एन्व्हिस’ केंद्रांची जबाबदारी असते. तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून पर्यावरणीय माहितीचा समृद्ध स्रोत निर्माण करणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.

महाराष्ट्रात अशा प्रकारचे ‘एन्व्हिस’ केंद्र २००३ पासून कार्यरत झाले. या केंद्राद्वारे http:// www.mahenvis.nic.in/ या संकेतस्थळावर पर्यावरणविषयक अहवाल, मूलभूत माहिती, कायदे, योजना, बातम्या, छायाचित्रे, विविध संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २०१० पासून या केंद्रामार्फत पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यस्तरीय निबंध, लेख, घोषवाक्य तसेच छायाचित्र स्पर्धाचे आयोजन केले जाते.

– कविता वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on environmental information system abn
First published on: 04-06-2020 at 00:07 IST