डॉ. श्रुती पानसे
आपण असं अनेकदा म्हणतो की आजकालच्या मुलांना नाही हा शब्द ऐकायचा नसतो. प्रत्येक गोष्ट त्यांना हवी तशीच आणि ताबडतोब हवी असते. ज्या मुलांना त्यांनी मागितल्याबरोबर वस्तू मिळतात, त्यांना तो आपला हक्कच वाटायला लागतो. कारण न्युरॉन्सची जोडणी त्याच प्रकारे झालेली असते.
याचा परिणाम असा होतो की ही मुलं मोठी झाल्यावर व्यसनांना, मोहांना पटकन बळी पडू शकतात. पण जी मुलं आवडलेल्या वस्तूसाठी थांबायला शिकतात, त्यांची बुद्धी योग्य प्रकारे निर्णयक्षमता दाखवते, असं ‘मार्शमेलो टेस्ट’मधून दिसून आलेलं आहे.
आपली इच्छा आणि भावनांचं नियमन याचा संबंध काय आहे, हे तपासण्यासाठी एक प्रयोग स्टॅनफोर्डमध्ये केला गेला. बालवाडीच्या वयातल्या काही छोटय़ा मुलांना या प्रयोगांमध्ये सामील करून घेतलं होतं. एका खोलीमध्ये टेबलवर मार्शमेलो नावाचा मुलांचा आवडता पदार्थ ठेवला होता. हा पदार्थ साधारणपणे बर्फीसारखा असतो. एका वेळेला एकाला खोलीत ठेवलं. त्यांना असं सांगण्यात आलं होतं की ‘हा मार्शमेलो तू खाल्लास तरी चालेल. पण मी पंधरा मिनिटांनी परत येणार आहे, त्या वेळेला तुझ्यासाठी आणखी एक मार्शमेलो घेऊन येईन.’ या मुलांचे हावभाव व्हिडीओ टिपत होता.
काही मुलं स्वतला थांबवू शकली नाहीत आणि त्यांनी मार्शमेलो खाऊन टाकला. काही मुलांनी मात्र अत्यंत जाणीवपूर्वक कसाबसा वेळ काढला. कोणी त्या मार्शमेलोकडे दुर्लक्ष केलं, कोणी स्वत:चे डोळे मिटून घेतले. पंधरा मिनिटं होईपर्यंत ज्या मुलांनी कळ काढली, त्यांना दोन मार्शमेलो मिळाले.
ही मुलं मोठी झाल्यावर – टीनएजमध्ये आणि प्रौढ वयातही – त्यांचा अभ्यास केला गेला. तेव्हा असं लक्षात आलं की जी मुलं भावनांचं नियमन करायला शिकली होती, ती मुलं व्यसनांपासून तसेच अन्य चुकीच्या वर्तन समस्यांपासून लांब राहिली होती. प्रौढ आयुष्यामध्ये ही मुलं यशस्वी ठरली.
मुलांना ‘नाही’ ऐकायला शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. हे अनेक घटनांमधून दिसून आलेलं आहे. नाहीतर मोठय़ा वयामध्ये मुलं दुराग्रही बनतात. लहान मुलांनी यशस्वी, निरोगी जीवन जगावं असं वाटत असेल तर मागितल्याबरोबर वस्तू हातात द्यायची नाही एवढं तत्त्व पाळणं आवश्यक.
contact@shrutipanse.com