सुनीत पोतनीस

आग्नेय आफ्रिकेतील मोझाम्बिक या देशाच्या किनारपट्टीवर स्थायिक झालेल्या स्वाहिली लोकांनी सातव्या-आठव्या शतकात उभारलेल्या लहान-मोठ्या बंदरांमधून पूर्वेकडचा हिंदी महासागरातला व्यापार चालत असे. इ.स. १४९८ मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामा आपल्या जहाजांचा ताफा घेऊन भारताकडे जाण्याच्या सागरी मार्गाचा शोध घेण्यासाठी निघाला. आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला- केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो पुढे पोहोचला मोझाम्बिकच्या किनारपट्टीवरील एका बंदरात. तिथे काही दिवस मुक्काम करून गामाने एका भारतीय व्यापाऱ्याला वाटाड्या म्हणून घेत कालिकतकडे कूच केले.

पुढे वास्को-द-गामाने मोझाम्बिकच्या दिलेल्या माहितीमुळे पोर्तुगालच्या राजवटीला मोझाम्बिकचे महत्त्व पटून त्यांनी प्रथम तेथील एका बंदरावर हल्ला करून ते ताब्यात घेतले. इ.स. १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी त्या बंदराशेजारी त्यांची एक छोटीशी वसाहत उभी केली. त्यापाठोपाठ पोर्तुगीजांनी इ.स. १५१० च्या सुमारास मोझाम्बिकचे छोटे, पण महत्त्वाचे असलेले मोझाम्बिक नावाचे बेट आणि व्यापाराचे केंद्र असलेले सोफाला शहर व बंदर यांच्यावर हल्ले करून ताबा मिळवला. पोर्तुगीज राजवट मोझाम्बिकच्या एकेका प्रदेशाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत असतानाच अनेक पोर्तुगीज व्यापारी गटा-गटाने मोझाम्बिकच्या अंतर्गत भागात जाऊन सोने मिळवण्याच्या खटपटीत होते. त्यातल्या प्रत्येक गटाने आपापले व्यापारी ठाणे वसवून तिथे थोडे सैन्यही राखले.

अठराव्या-एकोणिसाव्या शतकात मोझाम्बिकमध्ये गुलामांचा व्यापार बराच फोफावला. आफ्रिकेतल्या निरनिराळ्या जमाती एकमेकांवर हल्ले करत. या चकमकींमध्ये बंदीवान झालेल्या पराभूत जमातीच्या तरुणांना जेत्या जमातीचा प्रमुख अरब व्यापाऱ्यांना गुलाम म्हणून विकत असे. याशिवाय अन्य धडधाकट आफ्रिकी तरुणांना अरब व पोर्तुगीज व्यापाऱ्यांकडून गुलाम म्हणून मोठी मागणी होती. पुढे इ.स. १८४२ मध्ये पोर्तुगाल राजवटीने गुलामांच्या व्यापारावर कायद्यााने बंदी घातली. इ.स. १५१० साली पोर्तुगीजांनी मोझाम्बिकच्या प्रदेशात काही ठिकाणी आपल्या वसाहती व व्यापारी ठाणी प्रस्थापित केली, तरी त्यांना पूर्ण वर्चस्व मिळवण्यासाठी शतकभराचा काळ लागला.

sunitpotnis94@gmail.com