निसर्गाचे देणे निसर्गातच राहून निसर्गाला परत करण्याचा ध्यास असणाऱ्या काही मोजक्या निसर्गवेडय़ांपैकी एक म्हणजे किरण पुरंदरे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्याचा मनमुराद आनंद घेणे आणि निसर्ग निरीक्षणाच्या जोरावर इतरांनाही आपल्याबरोबर त्या दुनियेत घेऊन जाणे, बेभान होऊन कार्य करत राहणे हा या पक्षी अभ्यासकाचा खास गुण.

ते नागझिरा अभयारण्यात १ नोव्हेंबर २००१ ते डिसेंबर २००२ दरम्यान ४०० दिवस राहिले. त्यांनी दररोजच्या निरीक्षणांतून तिन्ही ऋतूंतील निसर्ग पाहिला, त्यातील बदल टिपले. त्यासाठी १५०० किलोमीटर पायी आणि १५०० किलोमीटर सायकलने प्रवास केला. आदिवासी मित्र व वनकर्मचाऱ्यांबरोबर कोणतीही तक्रार न करता राहण्याचे कसब अवगत केल्यामुळे मोठय़ा प्रमाणात जैवविविधतेचे निरीक्षण करता आल्याचे ते आवर्जून सांगतात.

साध्या रोलच्या कॅमेरापासून ते डिजिटल छायाचित्रणापर्यंत विविध तंत्रांचा उपयोग करून त्यांनी हजारो छायाचित्रे टिपली. ‘विश्व प्रकृती निधी’, भारत सरकार यांच्या पुणे विभागात शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्या काळात त्यांनी अनेक पर्यावरण संवर्धन उपक्रम राबवून शेकडो शाळांतील मुलांमध्ये निसर्गप्रेम आणि त्यामधील विज्ञान रुजविले आहे. अनेकांच्या सहकार्याने ‘उपक्रम निसर्गकट्टा’ हा कार्यक्रम सुरू केला. पुणे आणि परिसरातील पाणवठे, नद्या, डोंगर, माळरान यातील निसर्गचक्राविषयी माहिती वृत्तपत्रातील सदरे, आकाशवाणी कार्यक्रमांतून दिली.

पुरंदरे यांनी निसर्ग संवर्धनाबाबत १८हून अधिक पुस्तके लिहिली. ‘कापशीची डायरी’, ‘मुठेवरचा धोबी’, ‘पक्षी आपले सख्खे शेजारी’, ‘दोस्ती करू या पक्ष्यांशी’, ‘पाणथळीतील पक्षी’ आणि ‘सखा नागझिरा’ ही त्यांची पुस्तके प्रत्येक निसर्गप्रेमी अभ्यासकाला भावतात. अंग मुडपून एखाद्या मचाणात सलग ५९ तास बसून निरीक्षण करणारे हे निसर्ग संशोधक खरे तर वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत. पक्षी, प्राणी, वनस्पती यांची शास्त्रीय नावे त्यांना माहिती आहेतच, पण मराठी नावेही ते आग्रहाने सुचवितात. त्यांनी काढलेल्या पक्ष्यांच्या आवाजाला पक्षीदेखील प्रतिसाद देतात. ‘ऋतुरंग’ कार्यक्रमातून संगीत, आवाज, छायाचित्रे आणि व्याख्यान या माध्यमांतून ते रसिकांना मंत्रमुग्ध करतात.

सध्या त्यांचे भंडारा जिल्ह्यातील पिटेझरी येथे तिथल्या ग्रामीण आणि आदिवासी बांधवांबरोबर अनेक उपक्रम सुरू आहेत. ‘अनघा’  या आपल्या सहचारिणीसोबत मोफत फळझाडे, भाजीपाला रोपवाटिका, बीजबँक, कापडी पिशव्यानिर्मिती तंत्राबरोबरच तिथे रोजगारनिर्मितीचे त्यांचे कार्य सुरू आहे. ते जखमी प्राणी, पक्ष्यांवर उपचारही करतात. विद्यार्थी आणि युवकांना सोबत घेऊन निसर्ग रक्षणाची यात्रा करणारा हा एक जगावेगळा अवलियाच आहे.

– डॉ. सुधीर कुंभार

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.