नवदेशांचा उदयास्त : कम्युनिस्ट मंगोलिया

१९२१ मध्ये मंगोल नेत्यांनी मंगोलिया प्रजासत्ताक चीनपासून मुक्त होऊन आपले स्वायत्त सरकार स्थापन केल्याची घोषणा केली.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस क्विंग घराण्याच्या सत्तेला घरघर लागली आणि त्याचा फायदा घेऊन आऊटर म्हणजे उत्तर मंगोलियन नेत्यांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले. या काळात चीनमध्ये रिपब्लिक ऑफ चायनाचे सरकार होते. मंगोलियातील परिस्थिती पाहून चिनी फौजा आऊटर मंगोलियात घुसल्या आणि चीनने या प्रदेशावर कब्जा केला. १९२० मध्ये मंगोलियातल्या तरुणांनी मंगोलियन पीपल्स पार्टी हा राजकीय पक्ष स्थापून सैबेरियातल्या कम्युनिस्ट बोल्शेविक गटाशी संपर्क साधला. रशियात नुकतीच क्रांती होऊन बोल्शेविक कम्युनिस्टांचे सरकार सत्तेवर आले होते. मंगोलियन बंडखोरांनी या बोल्शेविकांच्या मदतीने त्यांची रेड आर्मी चिनी सैन्यावर पाठवून त्यांना मंगोलियाबाहेर काढले. १९२१ मध्ये मंगोल नेत्यांनी मंगोलिया प्रजासत्ताक चीनपासून मुक्त होऊन आपले स्वायत्त सरकार स्थापन केल्याची घोषणा केली. मंगोलियन प्रदेश हा रशिया आणि चीन यांसारख्या बलाढय़ महासत्तांनी वेढला गेला असल्याने मागच्या सहस्त्रकात यापैकी कोणत्या तरी एका सत्तेच्या दडपणाखाली, प्रभावाखाली नेहमीच राहिला आहे. कम्युनिस्ट रशियाने मंगोलियाला चिनी सैन्याशी लढताना केलेल्या मदतीने मंगोलियन नेते आता रशियाच्या प्रभावाखाली आले. त्यामुळे स्वतंत्र मंगोलियाचे सरकार बदलून १९२८ साली तिथे कम्युनिस्ट मंगोलियन पीपल्स रिपब्लिक आले. मंगोलिया आता सोव्हिएत युनियनचा एक सदस्य देश बनला. पुढे जोसेफ स्टालिन सोव्हिएत युनियन प्रमुख बनल्यावर त्याने लोकांच्या इच्छेविरुद्ध अनेक शासकीय बदल केले. मंगोलियन माणसाला महत्त्व असलेल्या त्याच्या पशुधनाचे सामूहिकीकरण करण्यात आले. सांस्कृतिक ‘शुद्धीकरण’ करताना स्टालिनने अनेक बौद्ध मठ नष्ट केले, तिथे राहणाऱ्या हजारो बौद्ध साधूंना ठार मारले, बौद्ध मठ आणि इतर धार्मिक मालमत्ता स्टालिनने सरकारजमा करून घेतल्या. स्टालिनच्या या कारवाईला अनेक लोकांनी आणि लामांनी केलेला विरोध दडपताना हे विरोधक आणि शेकडो लामांना ठार मारले गेले. पुढे रशिया आणि जपान यांच्यात संघर्ष आणि तीन युद्धे झाली. या संघर्षांत सरशी रशियाचीच झाली, परंतु मंगोलियाचे तत्कालीन पंतप्रधान आणि एक मंत्री यांनी जपानसाठी गुप्तहेरी केली होती. राष्ट्रदोहाच्या आरोपाखाली या दोघांना १९३९ साली अटक होऊन मास्कोत गोळ्या घालून ठार मारले गेले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Communist mongolia zws

Next Story
मनमोराचा पिसारा.. या फुलांच्या गंधकोशी
ताज्या बातम्या