दर्जेदार कोंबडी म्हणजे सतत अंडी देणारी कोंबडी किफायतशीर असते. ज्या कोंबडय़ा सतत अंडी देत नाहीत, ज्यांचे वार्षकि अंडी उत्पादन कमी असते अशा कोंबडय़ांना तेवढेच खाद्य, पाणी आणि व्यवस्थापन लागते. अशा कमी प्रतीच्या कोंबडय़ा कळपातून ओळखून त्यांच्या अंडी उत्पादनासाठी प्रयत्न करावेत.
दर्जेदार कोंबडय़ांमध्ये तुरा लाल, तेलकट, गरम आणि सुरकुत्या नसलेला असतो. कमी प्रतीच्या कोंबडय़ांमध्ये तुरा फिकट लाल, बारीक, कोरडा व सुरकुतलेला असतो. दर्जेदार कोंबडय़ांत गुदद्वार मोठे, लांबट व लवचीक असते. त्यावर सुरकुत्या नसतात. कमी प्रतीच्या कोंबडय़ांत गुदद्वार बारीक, गोल, आकुंचित पावलेले व सुरकुत्यायुक्त असते. चांगली खाद्य पचन क्षमता असल्यामुळे दर्जेदार कोंबडीचे पोट फुगीर असते. त्याचा जास्त अंडी उत्पादनाशी संबंध असतो. कातडी मऊ, तजेल, सुरकुत्या नसलेली असते. कमी प्रतीच्या कोंबडीत छोटे पोट, कातडी जाड, सुरकुत्यायुक्त असते.
छातीच्या हाडाचे टोक व प्युबिक हाडाचे टोक यांतील अंतर चार बोटे सामावतील एवढे असल्यास दर्जेदार कोंबडी, तर फक्त दोन-तीन बोटे एवढे असल्यास कमी प्रतीची कोंबडी समजावी. दर्जेदार कोंबडीच्या कातडीचा रंग सुरुवातीस पिवळा, तर अंडय़ावर आल्यावर फिकट पिवळा असतो. अंडी उत्पादन वाढत गेल्यावर चोच, गुदद्वार, पाय यांच्यावरील कातडीचा रंग फिकट पिवळा किंवा पांढरा होतो. कमी प्रतीच्या कोंबडय़ांत पाय, चोच, गुदद्वार यांच्यावरील कातडीचा रंग गडद पिवळा असतो.
जुनी पिसे झडून नवीन पिसे येणे (मोिल्टग) हा काळ दर्जेदार कोंबडीमध्ये कमी असतो. याउलट कमी प्रतीच्या कोंबडींत मोिल्टग मंद व प्रदीर्घ काळ चालू असते. मोिल्टगच्या काळात कोंबडय़ा अंडी देत नाहीत.
कोंबडय़ांच्या वाढीच्या काळात कमी प्रतीच्या कोंबडय़ांना वेगळे करावे. त्यांना प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. वाढीसाठी लागणारी औषधे दिल्यास कमी प्रतीच्या कोंबडय़ा पुन्हा अंडय़ावर येऊन सतत अंडी देतात. अंडी उत्पादन काळात त्या अंडी देत नसतील, त्यांना पायाचे आजार, कमी वाढ, आंधळेपणा, आनुवंशिक आजार असतील तर त्यांना कळपातून वेगळे काढावे. त्यामुळे एकंदरीत कळपाचे अंडी उत्पादन वाढते.
डॉ. माणिक धुमाळ (परभणी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
 rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस: बालमधुमेह – दुर्मीळ पण हट्टी आजार
मोठय़ा माणसांना नव्याने मधुमेह झाला की ती हादरतात, धास्तावतात, घाबरतात, पण काही काळाने सावरतात. इन्शुलिन, विविध औषधे, पथ्यपाणी, व्यायाम, योगासने असे अनेकानेक मार्ग ही मंडळी निवडत असतात. सात-आठ वर्षांच्या मुलाला मधुमेह झाला आहे असे कळल्याबरोबर त्या निरागस बालकाला विशेष वाटत नाही, पण पालक मात्र हादरतात. लगेचच वैद्यकीय चिकित्सकांच्या सल्ल्याने वारंवारच्या रक्तशर्करा तपासण्या इन्शुलिनचा मारा, क्वचित स्टिरॉईडची औषधे चालू होतात. मोठय़ा माणसांचा मधुमेह हा ‘याप्य’ म्हणजे जोपर्यंत औषधे, पथ्यपाणी, पुरेसा व्यायाम चालू आहे तोपर्यंत नियंत्रणात राहणारा रोग असे त्याचे स्वरूप आहे. मोठय़ा माणसांना आहार, व्यायाम, औषधे या त्रिकोणाचे महत्त्व पटले तर सहसा मधुमेह बळावत नाही. मोठय़ा माणसांची औषधे, इन्शुलिनचा डोस यात खूप मोठे चढ-उतार नसतात.
लहान बालकांना मधुमेह झाला की त्यांच्या रक्तशर्करा प्रमाणात खूपच चढ-उतार चालू राहतो. त्यामुळे वारंवार रक्त तपासणी, औषधे, इन्शुलिन डोस कमी-अधिक करणे, खाण्या-पिण्याची मुलांच्या या वयात न पटणारी बंधने यामुळे पालक हैराण होतात. मुलांमध्ये नैराश्य येते, चिडचिड वाढते, मुले आतल्या आत कुढू लागतात. त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. काही वेळेस रक्तशर्करा एकदम खाली जाते. लैंगिक समस्या उत्पन्न होता. स्वादूपिंडाचे कार्य मंदावते. थोडक्यात सांगायचे म्हणजे डॉक्टरांचे सततचे ध्यान हे बालरुग्ण हिताकरिता आवश्यक ठरते.
तज्ज्ञ डॉक्टर मंडळी मधुमेही औषधांबरोबरच ए. डी. अशा विविध प्रकारच्या व्हिटॅमिनचाही मारा करतात. विविध एंझाईम सप्लिमेंट दिले जातात. वयाच्या पाचव्या वर्षांपासून पंधरा-सोळा वर्षांपर्यंतचा काळ काळजी घेण्याचा असतो. या काळात काळजी घेतली, आहार नियंत्रण ठेवले व खूप औषधांची सवय लावली नाही तर, आयुर्वेदीय औषधांनी बालमधुमेहावर काबू मिळवता येतो.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..       महाराष्ट्र आणि मराठी
पंधराव्या शतकात डिंभ. कृष्णमूर्ती नावाच्या माणसाने विंध्याच्या दक्षिणेला, गोदावरीच्या उत्तरेला आणि झाडी मंडळाच्या (म्हणजे चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या आसपासचा प्रदेश) पश्चिमेला, समुद्रापर्यंतचा देश म्हणजे महाराष्ट्र देश असे वर्णन केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाच्या वेळेला हा ऐतिहासिक उल्लेख झाला होता. त्यातले बेळगाव, बिदर राहिले आहे. या प्रदेशात राहणारे लोक मध्यम बांध्याचे, काटक, सावळे, कलहशील (म्हणजे भांडकुदळ) आणि अभिमानी असे वर्णन तो करतो. या प्रदेशात राहणाऱ्यांची भाषा मात्र अनेक शब्दांनी वर्णन केली गेली आहे. देशी अपभ्रंश, प्राकृत, महाराष्ट्री, महराटी वगैरे. विज्ञानात असतो त्याप्रमाणे इथे सुसंगत क्रम काही लागत नाही. अपभ्रंश हा शब्द भ्रंशाचे म्हणजे बदलाचे, तुटण्याचे, हीन झाल्याचे सांगतोच, पण अप हा शब्द त्याला वधारतो. उदा. अपघात. संस्कृतमधून अपभ्रंश शब्द निर्माण होतात. प्राकृत हा शब्द संस्कृत आहे. त्याचे चक्रावणारे अर्थ आहेत. शुद्ध, अतिशुद्ध, अशुद्ध, भेसळ असलेले, प्रादेशिक, किरकोळ आणि प्रकृतीशीसंबंधित असे ते अर्थ आहेत. एखाद्या प्रदेशाच्या, प्रकृतीबरहुकूम, बदलून घेतलेले जे शब्द किंवा भाषा ती प्राकृत असा अर्थ माझ्या मनात उमटला. मग एक आणखी नवा शब्द बघावा लागतो तो म्हणजे बोली भाषा. सर्वसामान्यांची बोलीभाषा प्राकृत (म्हणून अशुद्ध); परंतु तीच भाषा जर राज्यकर्त्यांची झाली तर मग शासन करताना तिला कडेकोट नियमाने बांधावे लागते आणि मग तीच प्राकृत जर नीट बांधून लिहिली गेली तर ती प्रमाणभाषा होते. ही प्रमाणभाषा करताना अडचणी आल्या तर मग परत जिच्यापासून या सगळ्या भाषा प्रसूत झाल्याचा दावा आहे त्या संस्कृतकडे वळावे लागते. ‘चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न प्रलंबित आहे,’ हे वाक्य पूर्णपणे संस्कृत असले तरी त्यातला ‘आहे’ हा शब्द अस्य या शब्दाचा अपभ्रंश किंवा प्राकृताचे रूप आहे. थोडक्यात काय, तर मराठीचे संस्कृतवाचून काही खरे नाही; पण एक आणखीन गोची आहे ती म्हणजे या भागात आपले पूर्वज राहत होते त्यांचे स्वत:चे असे काही शब्द होते की नाही. या विषयातील विद्वान असे म्हणतात की, असे शब्द १००-२०० च्या वर नाहीत आणि त्यातले काही अपभ्रंशच आहेत. मराठी भाषेचे एक रहस्यमय कोडे असे की, पाचव्या शतकापासून प्रचलित असलेली ही भाषा १२७५ ते १३५० मध्ये एकदमच फळफळली आणि लीळा चरित्र नावाचे साधे व्यावहारी, प्रामाणिक गोष्टीरूप लिखाण अवतरले आणि त्यानंतर त्याच काळात ‘ज्ञानेश्वरी’ नावाचे अद्भुत घडले. ती ‘ज्ञानेश्वरी’ प्राकृत अपभ्रंश, बोली, देशी आणि संस्कृत शब्दांचे भांडार आहे. एक मात्र नक्की, ‘ज्ञानेश्वरी’त मध्य-पूर्वेतले शब्द नाहीत. ‘ज्ञानेश्वरी’तल्या भाषेबद्दल सोमवारी.
रविन मायदेव थत्ते
 rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत: २४ ऑगस्ट
१८७२ > ‘साहित्यसम्राट’ अशी ओळख असलेल्या नरसिंह चिंतामणी केळकर यांचा जन्म. साहित्यिक, वृत्तपत्रकार व राजकीय नेते असे तिहेरी कार्य त्यांनी केले. ‘केसरी’, ‘मराठा’ या लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या पत्रांच्या संपादनात केळकर यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), मराठे आणि इंग्रज, राजशास्त्र, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबऱ्या, आदींचा समावेश आहे.
१९२५ > जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ, संस्कृतचे प्रकांडपंडित रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे निधन. त्यांच्या कार्यावर आधारित संस्कृतची पाठय़पुस्तके झाली. ‘संस्कृत अँड डिराइव्हड लँग्वेजेस’ हे महत्त्वाचे इंग्रजी पुस्तक, तसेच ‘दख्खनचा प्राचीन इतिहास’ व अन्य पुस्तके त्यांनी लिहिली.
१९३२ > कवी, समीक्षक रावसाहेब गणपतराव जाधव यांचा जन्म. त्यांची ३०हून अधिक पुस्तके मराठी साहित्य जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यापैकी ‘निळी पहाट’, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साहित्य आणि सामाजिक संदर्भ ही काही नावे.
संजय वझरेकर