हे वाक्य वाचा :
‘‘मला थोडे पैसे हवेत. मित्रा, माझी मदत कर.’’
हिंदीच्या प्रभावाने अनेकदा आपण आपल्या भाषेतील वाक्यरचनेची मोडतोड करतो. हिंदीतील काही शब्द मराठीने स्वीकारले आहेत, त्याबद्दल तक्रार नाही. भाषासमृद्धीसाठी प्रत्येक भाषेत इतर भाषांतील शब्द स्वीकारले जातात. परंतु आपल्या भाषेतील वाक्यरचनेत इतर भाषांची घुसखोरी करणे आणि आपली वाक्यरचना नाकारणे म्हणजे आपणच आपल्या मातृभाषेवर अन्याय करणे. हा अन्याय मराठी भाषकांना सहज दूर करता येईल.
वरील वाक्यात ‘माझी मदत कर’ या वाक्यरचनेवर हिंदी वाक्यरचनेचा प्रभाव सहज लक्षात येईल. ‘मेरी मदद करो’ ही हिंदी वाक्यरचना. मराठीत ‘मला मदत कर’, असे वाक्य. ‘माझी मदत’-‘माझी’ हे मदत या नामाचे सार्वनामिक विशेषण आहे. ‘मला’ हे वाक्यात कर्म आहे, विशेषण नव्हे. ‘(तू) मला मदत कर’ हे वाक्य बरोबर आहे. बोलताना व लिहिताना योग्य वाक्यरचना करणे अपेक्षित आहे.
(२) जोडून की तोडून
आता काही शब्द लिहिताना होणारी एक चूक अशी आहे. हे वाक्य वाचा :
‘तुम्ही सारेजण माझ्या व्याख्यानाला या.’
इथे ‘सारे’ हे, ‘जण’ या शब्दाचे विशेषण आहे. हे दोन शब्द आहेत. सारेजण हा एक शब्द नाही. तसेच, प्रत्येक जण, साऱ्या जणी, दोघे जण, सर्व जण इ. शब्द जोडून न लिहिता तोडून लिहावेत.
तसेच, काही क्रियापदे जोडून लिहिणे चुकीचे आहे. उदा. बघू या, जाऊ दे, पाहू या, बसू या, नाचू या, गाऊ या, झोपू दे- द्या इ. या शब्दांतील ‘बघू, जाऊ, पाहू, बसू, नाचू, गाऊ, झोपू’ ही मुख्य क्रियापदे आहेत. ‘या, दे, द्या’ ही साहाय्यकारी क्रियापदे आहेत. ‘बघूया’, ‘जाऊद्या’ इ. एक शब्द नसून दोन शब्द आहेत. योग्य अंतर ठेवून ते शब्द लिहिणे आवश्यक आहे. बोलताना जरी आपण ते एका शब्दासारखे उच्चारत असलो, तरी लेखनात ते दोन शब्द तोडून लिहायला हवेत.
– यास्मिन शेख