– शुभदा चंद्रशेखर वक्टे, मराठी विज्ञान परिषद
प्रा. इंद्र बीर सिंह यांचा जन्म ८ जुलै १९४३ साली लखनऊ येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षणही तिथेच झाले. १९६२ साली त्यांनी लखनऊ विद्यापीठातून भूविज्ञान विषय घेऊन एमएससी पदवी प्राप्त केली. ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ’ (ऑइल अॅण्ड गॅस कॉर्पोरेशन) देहरादून इथल्या मुख्यालयात त्यांनी काही काळ काम केले, पण १९६३ मध्ये जर्मनीतील श्टुटगार्ट येथील तंत्रज्ञान विद्यालयात डॉ. हेरमान आल्डिंगेर यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीतील हार्त्स पर्वतातील पाषाणांवर संशोधन करण्यासाठी ते जर्मनीला गेले. त्यांनी १९६६ मध्ये डॉक्टरेट प्राप्त केली. पुढच्या संशोधनात्मक अभ्यासासाठी ते नॉर्वेतील ऑस्लो विद्यापीठात विख्यात भूवैज्ञानिक थॉमस बार्थ यांच्या संशोधन प्रकल्पात सहभागी झाले. या प्रकल्पांतर्गत त्यांनी नॉर्वेच्या टेलेमार्क प्रदेशातील अवसादी खडकांच्या इतिहासावर उल्लेखनीय शोधनिबंध प्रकाशित केले.
१९६९ च्या सुरुवातीला त्यांनी विल्हेल्म्सहाफेन येथील जेन्केन्बर्ग सागरविज्ञान संस्थेतले हान्स-एरिक राइनेक यांच्या संशोधन गटात सहकारी संशोधक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जर्मनीच्या उत्तर समुद्रकिनाऱ्यावरील भरती-ओहोटीच्या वेळी ओल्या पृष्ठभागावर वाळूच्या कणांचे सूक्ष्म थर कशा पद्धतीने निर्माण होतात, आणि विविध अवसादी संरचना (सेडिमेंटॉलॉजिकल स्ट्रक्चर्स) होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात याविषयी निरीक्षणे केली. या महत्त्वाच्या निरीक्षणांमधून मिळालेल्या माहितीचा त्यांना प्राचीन खडकांमधल्या संरचनांवरून अचूक निष्कर्ष काढण्यात उपयोग झाला. याच निरीक्षणांच्या आधारे त्यांनी डॉ. राइनेक यांच्यासमवेत ‘निक्षेपणात्मक अवसादी पर्यावरणे’ (डिपॉजिशनल सेडिमेंटरी एन्व्हिरॉनमेंट्स) हे गाजलेले पाठ्यपुस्तक लिहिले. ते १९७३ मध्ये श्प्रिंगर-फेरलाग या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले. या पुस्तकाने जागतिक स्तरावर देदीप्यमान यश मिळवले.
१९७२ मध्ये ते भारतात परतले आणि लखनऊ विद्यापीठात रुजू झाले. १९९५ ते २००३ दरम्यान विभागप्रमुख आणि विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) ही पदेही त्यांनी भूषविली. प्रा. इंद्र बीर सिंह यांनी गंगा नदीच्या काठी गाळाचे स्तर कसे निर्माण झाले, तिथली भूरूपे कशी विकसित झाली, याचा अभ्यास केला.
भारतीय भूवैज्ञानिक संघटनेने त्यांना १९९६ मध्ये एल. रामा राव जन्मशाताब्दी पुरस्काराने सन्मानित केले. केंद्र शासनाच्या खनिकर्म मंत्रालयाने २०१४ मध्ये विज्ञानातील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय पारितोषिक दिले. २०२० मध्ये लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात विशेष सन्मानाने गौरवण्यात आले. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी) या संस्थेचे ते मानद वैज्ञानिक होते. प्रा. इंद्र बीर सिंह यांचे ११ फेब्रुवारी २०२१ रोजी निधन झाले.
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org