मुंबईतील जुहू, वर्सोवा, गिरगाव या चौपाटय़ा आणि मुंबईबाहेर उरण, मालवण, गणपतीपुळे इत्यादी वालुकामय किनारे हे मुबलक जैवविविधता दर्शवतात. या किनाऱ्यांवर भरतीच्या लाटांसोबत आलेला गाळ, रेती, रिकामे शंख, शिंपले, शैवाल, लाकूड, कचरा इत्यादी ओहोटीच्या वेळेला किनाऱ्यावर पसरतात. प्रवाही लाटांमुळे वाळूमध्ये सतत अस्थिरता आणि घुसळण सुरू असते. अशा अधिवासात अनेक मृदुकाय, संधिपाद प्राण्यांच्या प्रजाती, गोगलगाई, यती खेकडे इत्यादी राहतात. अशा किनाऱ्यांवर शंख, शिंपले गोळा करणे टाळावे. कारण त्यात जिवंत मृदुकाय प्राणी असल्यास तो मरतो. रिकामा शंख किंवा शिंपला इतर यती खेकडय़ांना तात्पुरते घर करता येते किंवा ते पक्ष्यांना घरटे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. मोडक्या शंख, शिंपल्यांत असणारे कॅल्शिअम काबरेनेट, समुद्रातील इतर प्राण्यांना खाद्य किंवा नवे कवच तयार करण्यासाठी उपयोगी पडते. खेकडे, पॉलिकिट वलयी किडे, कवचधारी किंवा बिनकवचाचे विविध प्रजातींचे प्राणी वाळूमध्ये बिळे करून जगतात. या प्राण्यांना परिसराशी जुळणारी रंगसंगती व खोल बीळ बनवण्याची कला अवगत असते. त्यांना नळीसारखे बीळ तयार करावे लागते व ऑक्सिजन मिळविण्यासाठी शारीरिक अनुकूलन साधावे लागते. हे जीव शत्रूपासून सुरक्षित राहावेत यासाठी त्यांच्यात विशेष अनुकूलने दिसतात. काही प्राणी सतत हालचाली करत असतात, त्यामुळे वाळू पाण्याखाली गेली तरीही ते अन्यत्र जात नाहीत. तसेच काही सूक्ष्म जीव ऑक्सिजनचा कमीत कमी वापर करून वाळूमधील अपुऱ्या ऑक्सिजनमध्ये जगतात. काही खेकडे दिवसा तर काही रात्री वावरतात. काही प्राणी दिवसा बिळात राहून उन्हापासून व शत्रूपासून सुरक्षित राहतात व रात्री भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. भरतीच्या लाटांमुळे काही माशांची व इतर छोटय़ा प्राण्यांची अंडी वाहून जाण्याची शक्यता असते. काही मासे, समुद्री कासवे, काही जातींचे खेकडे वाळूमध्ये बीळ करून अंडी घालतात. पाण्याखाली गेल्यावर वाळूच्या प्रभावामुळे ही बिळे बंद होतात व अंडी सुरक्षित राहतात. योग्य वेळी पिल्ले बाहेर येऊन समुद्राकडे पोहू लागतात. त्यांची शिकार करणारे तुतारीसारखे पक्षी लांब चोचीने बीळ उकरून खाद्य शोधतात. प्लोवर जातीचे काही पक्षी वाळूमध्ये बीळ करून अंडी घालतात. प्लास्टिक आणि मायक्रो प्लास्टिक प्रदूषणाने प्राण्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो. वालुकामय किनाऱ्यांचा वापर मनोरंजनासाठी करताना, वाळूचे किल्ले बांधताना आपल्याकडून हा परिसर प्रदूषित होणार नाही, याची काळजी घ्यावी. - डॉ. श्वेता चिटणीस मराठी विज्ञान परिषद ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org