खारफुटीची झाडे ही उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रांच्या किनारपट्टीच्या प्रदेशात वाढतात. या प्रजातींची मुळे आणि पाने यांमध्ये खाऱ्या पाण्यातील उच्च क्षारता सहन करू शकतील असे विशेष अनुकूलन झाले आहे.ही भव्य झाडे किनारपट्टीच्या भूभागाला नयनरम्यता तर देतातच, पण त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. जमिनीची धूप रोखतात, वादळ-वाऱ्यांपासून किनारपट्टीचे संरक्षण करतात. तसेच समुद्राकडून येणाऱ्या लाटा रोखण्यासाठी नैसर्गिक भिंत म्हणूनही ती काम करतात. विविध प्रकारच्या सागरी आणि आंतरभरती प्रदेशामध्ये आढळणाऱ्या जीवांसाठी निवासस्थान प्रदान करतात. अनेक मासे आणि क्रस्टेशियन्स (खेकडे आदी कवची मृदूकाय) यांसारख्या जीवांच्या प्रजननासाठी जागा उपलब्ध करून देतात, कारण तेथे मुबलक प्रमाणात खाद्य मिळते. याव्यतिरिक्त, खारफुटी झाडे पाण्यातील प्रदूषके आणि अतिरिक्त पोषक घटक गाळण्यासाठी मदत करतात आणि एकूणच पाण्याची गुणवत्ता सुधारतात.

खारफुटी एक महत्त्वपूर्ण कार्बनशोषक आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मोठय़ा प्रमाणात शोषून घेऊन हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यास मदत करतात. अनेक सागरी प्रजातींच्या अस्तित्वासाठी खारफुटी महत्त्वपूर्ण ठरतात.भारतात अनेक किनारी भागांमध्ये खारफुटीची वने आढळतात. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे वन असून तिथे बंगाली वाघ (बेंगॉल टायगर) आढळतो. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात ५० हून अधिक विविध प्रकारच्या खारफुटी असून ती देशातील सर्वात प्राचीन खारफुटी परिसंस्था आहे. गुजरातमधील कच्छचे आखात हेदेखील मोठय़ा खारफुटीच्या परिसंस्थेचे घर असून अनेक प्रजाती आढळतात. महाराष्ट्रातील कोकण प्रदेश खारफुटीच्या वनांसाठी ओळखला जातो.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

ओडिशातील भितरकणिका नॅशनल पार्कमध्ये मोठय़ा प्रमाणात खारफुटीची परिसंस्था आहे. तमिळनाडूतील पिचावरम आणि वेदालाई, केरळमधील कन्नूर आणि कासरगोड तसेच आंध्र प्रदेशातील कोिरगा वन्यजीव अभयारण्य ही खारफुटीची वने समृद्ध खारफुटीच्या परिसंस्थेसाठी ओळखली जातात.
खारफुटी वने केवळ सौंदर्यानेच सुखावणारी नसून निसर्गाचा नाजूक समतोल राखण्यात मदत करतात. तसेच ते किनाऱ्याचे संरक्षण, उपजीविका आणि जैवविविधता जपण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. ही वने निसर्गाच्या लवचिकतेचा आणि अनुकूलतेचा पुरावा आहेत आणि म्हणूनच या मौल्यवान परिसंस्थेचे जतन होणे अतिशय महत्त्वाचे आहे.

डॉ. शीतल पाचपांडे,मराठी विज्ञान परिषद