हिरवीगार घनगर्द जंगले, स्वच्छ नद्या, खळाळणारे धबधबे आणि विस्तीर्ण जलाशय यासाठी ओळखले जाणारे ईशान्य भारतातील मेघालय हे राज्य निसर्गप्रेमींसाठी जणू नंदनवनच! ‘मेघालय’ याचा अर्थ ‘ढगांचे घर’. पृथ्वीवरचे सर्वात आद्र्र ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघालयात खासी आणि जैतिया टेकडय़ांच्या विस्तृत डोंगराळ भागात वृक्षांच्या मुळांपासून तयार झालेले अद्भुत पूल पाहायला मिळतात. पूल बांधणीचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत होण्याआधीपासून मेघालयातील आदिवासींनी दळणवळणासाठी या नैसर्गिक पुलांची बांधणी केली आणि वापर केला.

नदी किंवा सखल भागाच्या दोन्ही टोकांवर असलेल्या उंच भागावरच्या ‘फिकस इलास्टिका’ या रबर वर्गीय वृक्षांची मुळे वाढत जाऊन एकमेकांत अशा प्रकारे गुंफली आहेत की त्यापासून चक्क या नद्यांवर, लहान-लहान दऱ्यांवर पूल तयार झाले आहेत. यातले काही पूल नैसर्गिकरीत्या तयार झाले असून काही जाणीवपूर्वक बांधण्यात आले आहेत. एकावेळी ५०हून अधिक व्यक्ती या पुलावरून चालत गेल्या तरी त्यांचे वजन हे पूल सहन करू शकतात. या पुलांची लांबी १५ फुटांपासून २५० फुटांपर्यंत असल्याचे आढळते.

हे पूल तयार होण्यासाठी सुमारे १५ ते ३० वर्षे लागतात. या कालावधीत रबर वर्गीय वनस्पतींची मुळे वाढत जातात. खासी लोक धाग्यांसारखी वाढणारी ही मुळे एकमेकांत गुंफतात. बांबूचा वापर करून ते या मुळांना आधार देतात. जसजसा या पुलाचा वापर सुरू होतो तसतसे तळपायांना लागलेल्या मातीचे थर या पुलावर चढत जातात. आद्र्रतेमुळे ओलसर झालेल्या मातीचे थर वृक्षांच्या मुळांना घट्ट चिकटून राहतात आणि पुलाला मजबुती प्राप्त होते.

या नैसर्गिक पुलांना स्थानिक खासी भाषेत ‘जिंग किंग ज्री’ म्हणतात. खासी टेकडय़ांमधील अनेक खेडी अशा प्रकारच्या पुलांच्या मदतीने एकमेकांशी जोडली गेली आहेत आणि स्थानिक लोक दळणवळणासाठी त्यांचाच वापर करतात.

चेरापुंजीपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर उमशियांग नदीवर असलेला दुमजली नैसर्गिक पूल अतिशय प्रसिद्ध आहे. हा पूल पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे या पुलाचा क्षय होत चालला आहे. त्याला आळा घालण्यासाठी चेरापुंजी इथे अशाच प्रकारचा आणखी एक दुमजली पूल तयार करण्यात आला आहे. या परिसरात असे सुमारे डझनभर पूल पाहायला मिळतात. वृक्षांच्या मुळांची गुंफण होऊन तयार झालेले हे पूल म्हणजे निसर्गातील एक अद्भुत स्थापत्य आविष्कार आहे.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : http://www.mavipa.org