डॉ. चंद्रकांत लट्टू, मराठी विज्ञान परिषद
विशालकाय तपकिरी सागरी शैवालाला ‘केल्प’ म्हणून ओळखले जाते. केल्पचे वास्तव्य प्रामुख्याने पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरात समशीतोष्ण आणि ध्रुवीय भागात दिसून येते. अलीकडेच केल्पची उपस्थिती उष्णकटिबंधीय महासागरात, इक्वाडोरनजीक दिसून आली. जमिनीवर वनांमध्ये वृक्ष वाढतात, तसेच सागर परिसंस्थेत केल्प अतिशय दाटीने वाढतात, म्हणून यांस ‘केल्प वने’ म्हटले जाते. यांच्या वाढीची सागरातील कमाल खोली एक ते तीस मीटर इतकी असू शकते. केल्पचा आधारक (होल्डफास्ट) हा अवयव केवळ आधारासाठी असतो, त्याद्वारे पोषक द्रव्यांचे शोषण, अभिसरणाचे काम होत नाही. स्टाइप हे खोडासारखे काम करते आणि विपर्ण हे पानांसारखे प्रकाशसंश्लेषणाचे कार्य करते. संपूर्ण जगात केल्पच्या जवळपास ३० जाती आहेत.
केल्पमध्ये आरोग्यासाठी पोषक मूल्ये असल्याने त्यांचा उपयोग खाद्यपदार्थ म्हणून होतो. मोठय़ा मात्रेत जीवनसत्त्वे, खनिज, अँटिऑक्सिडन्ट गुणधर्म असल्याने केल्प औषधासाठीही उपयोगी ठरतात. आयोडिनचे प्रमाण जास्त असल्याने केल्पचा वापर थायरॉइडवरील उपचारांत होतो. केल्पपासून तयार केलेले खाद्यपदार्थ जपान आणि कोरियातील उपाहारगृहांत मिळतात. केल्प वने सागरी जीवांसाठी अद्वितीय आधिवास आहेत. सामान्य सागरी परिसंस्थेपेक्षा वनस्पती आणि प्राण्यांची अधिक विविधता येथे दिसून येते. या वनांचा उपयोग सागरी जीव आश्रय आणि अन्नासाठी तर करतातच शिवाय त्यांच्या पिल्लांचे भक्षकांपासून संरक्षण करण्यासाठीही करतात. उदाहरणार्थ; सील, सी-लायन, व्हेल, ऑटर इत्यादी.
मॅक्रोसिस्टिस नावाचे केल्प पॅसिफिक महासागरात वने तयार करणारी एक उत्तम प्रजाती आहे. त्याची सामान्यवाढ दिवसाला ३० सेंटिमीटर आणि उत्तम वातावरणात ५० सेंटिमीटर इतकी होऊ शकते. निरीओसिस्टिस, लेसिनीया, अस्कोफायलम या केल्प वने तयार करणाऱ्या इतर प्रजाती आहेत. आयसेरीयाची केल्प वने अटलांटिक महासागरात आढळून येतात तर एक्लोनीयाची वने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडनजीकच्या सागरात आढळतात. चांगली केल्प वने तयार होण्यासाठी खडकाळ आधार, उत्तम पोषण आणि सूर्यप्रकाश खोलवर पोहचू शकेल असे स्वच्छ, नितळ पाणी, या बाबी गरजेच्या आहेत. उष्णकटिबंधीय महासागरात केल्प वनांच्या उणिवेचे कारण अपुरे पोषण आणि उष्ण पाणी हे असल्याचे मानले जाते. केल्प वनांची परिसंस्था इतर परिसंस्थेपेक्षा जास्त चैतन्यपूर्ण असते, अर्थात ती नाहीशी होते आणि पुनर्जीवितही होते.