साखरेच्या संहत द्रावणात द्राक्ष ठेवल्यास त्यातील पाणी परासरणामुळे बाहेर पडून मनुका तयार होतात. परासरण म्हणजे निवडक्षम पारपटलाने विलग झालेल्या दोन द्रावणांमधील पाण्याचे कमी क्षारतेच्या द्रावणाकडून जास्त क्षारतेच्या द्रावणाकडे प्रवाहित होणे. शरीरातील अंतर्गत कार्य सुरळीत चालण्यासाठी सर्व सजीवांना परासरण नियमन करावे लागते. म्हणजेच शरीरातील पाणी आणि क्षार यांचे योग्य प्रमाण राखावे लागते.

समुद्री माशांच्या शरीरात असणाऱ्या क्षारांच्या तुलनेत आजूबाजूच्या पाण्यात जास्त क्षार असल्याने परासरणामुळे शरीरातून पाणी बाहेर निघून जाण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी विविध प्रकारच्या समुद्री माशांमध्ये विविध परासरण नियमन यंत्रणा कार्यरत होतात. यात उत्सर्जन संस्था मुख्य भूमिका पार पाडते. या माशांमध्ये शरीरातील द्रवांची क्षारता आजूबाजूच्या पाण्यापेक्षा खूप कमी असूनही परासरणीय समतोल राखला जातो, कारण मासे बाहेर पडू पाहणाऱ्या पाण्याची भरपाई करण्यासाठी खूप पाणी पितात. पाण्याबरोबर शरीरात शिरणारे अनावश्यक क्षार मूत्राद्वारे बाहेर टाकले जातात. मुशी, पाकट अशा काही कूर्चामीनांमध्ये गुदाशयातील विशेष ग्रंथीद्वारे जास्तीचे क्षार बाहेर टाकले जातात. तसेच शरीरातील द्रवाचा परासरणीय दाब समुद्राच्या पाण्याइतका वाढवण्यासाठी कूर्चामीन शरीरात तयार होणारा युरिया पूर्णपणे उत्सर्जित न करता शरीरात साठवून ठेवतात. बाकी सजीवांपेक्षा या माशांच्या ऊतींमध्ये युरियाचे प्रमाण खूप जास्त असते. युरिया हे एक प्रथिन चयापचयातून निर्माण झालेले टाकाऊ द्रव्य आहे. याचा शरीरातील यंत्रणेवर विशेषत: विकरांच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या माशांमध्ये ट्रायमिथाईल अमाईन ऑक्साईड व त्यासारखी बाकी काही द्रव्येदेखील असतात. त्यामुळे युरियाचा शरीरावर होणार विपरीत परिणाम टळतो.

रावससारखे (सामन) काही अस्थिमीन आयुष्याचा काही काळ समुद्रात तर काही काळ गोडय़ा पाण्यात घालवतात. समुद्रात असताना शरीरातील पाणी कमी होण्याची व गोडय़ा पाण्यात असताना शरीरात जास्त पाणी घुसण्याची तसेच क्षार बाहेर पडण्याची भीती यांना असते. म्हणूनच यांच्या कल्ल्यांच्या त्वचेत समुद्रात असताना शरीरातील जास्तीचे क्षार बाहेर टाकण्याची व गोडय़ा पाण्यात असताना क्षार शोषून घेण्याची क्षमता असते. वाढीसाठी आवश्यक असणारे संप्रेरक या माशांमध्ये परासरण नियमनाचे कार्यही करते.

(रावससारखे (सामन))

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेणू भालेराव,मराठी विज्ञान परिषद