डॉ. मोहन मद्वाण्णा
‘समुद्र किनाऱ्यावर सहलीला गेलेल्या तरुणांचा/ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू,’ ‘बुडणाऱ्यांचा मच्छीमारांनी जीव वाचवला,’ अशा स्वरूपाच्या बातम्या अलीकडे वारंवार येतात. यामागे सहलीला घेऊन आलेल्या शिक्षकांचे समुद्राबद्दलचे अज्ञान आणि पायदळी तुडवले जाणारे सुरक्षाविषयक नियम ही प्रमुख कारणे असतात. शाळा आणि महाविद्यालये अनेकदा सागर किनारी शैक्षणिक सहली नेतात. प्राणीशास्त्राचे महाविद्यालयीन विद्यार्थी ओखा, त्रिवेंद्रम, चेन्नई आणि महाराष्ट्रातील किनाऱ्यांना भेट देतात. अशा सहलींत एकही विद्यार्थी बुडणार नाही, याची ग्वाही शाळा प्रशासनाला आणि शिक्षकांना देता यायला हवी.
समुद्र सहलीला कधी जावे, कोणत्या किनाऱ्यांवर जावे, समुद्रात पोहावे का, पोहायचे असल्यास किती खोल पाण्यात उतरावे, भरती-ओहोटीची वेळ, किनाऱ्यांचे स्वरूप आणि तिथे घ्यायची काळजी, याविषयी आधीच माहिती करून घ्यावी. स्थानिक व्यक्तीच्या सहकार्याने समुद्र सहलीचे नियोजन करावे. समुद्र किनाऱ्यास भेट देण्याचा सुरक्षित काळ ओहोटीचा असतो. त्यावेळी किनारे उघडे पडत असल्याने जीवसृष्टी दृष्टीस पडते. भरतीच्या वेळा मात्र असुरक्षित! स्थानिक मच्छीमारांकडे व तटरक्षक दलाच्या कार्यालयात भरती ओहोटीच्या स्थानिक वेळेची माहिती मिळते. साधारणत: तिथीला ०.८ ने गुणले की भरतीची ‘अंदाजे स्थानिक घडय़ाळी वेळ’ समजते. उदा. पौर्णिमा ही १५ वी तिथी. म्हणून १५ गुणिले ०.८ म्हणजे १२. म्हणजेच, अंदाजे दुपारी आणि रात्री १२ वाजता पौर्णिमेला सर्वोच्च भरती असते. अमावस्येची तिथी ३० धरल्यास, ३० गुणिले ०.८ म्हणजे २४. म्हणजे रात्रीचे बारा. म्हणून अमावास्येला रात्री आणि दुपारी १२ वाजता भरती सर्वाधिक पातळी गाठते.
फार तीव्र उतार असलेल्या असुरक्षित किनाऱ्यांवर पाणी किती खोल आहे हे पोहणाऱ्यांना कधीही समजत नाही. पाण्यातून पोहणाऱ्या व्यक्तीस भरतीच्या लाटा बाहेर फेकतात आणि पुन्हा आत ओढून घेतात. अशा वेळी पोहणे टाळावे. शक्य झाल्यास जेवढे आत जाणार आहात त्याच्या दुप्पट लांबीचा दोर कमरेस बांधून दुसरे टोक किनाऱ्यावरील व्यक्तीने हातात ठेवल्यास पाण्यातील व्यक्तीस ओढून घेता येते. बुडालेल्या व्यक्तीस ओढून बाहेर काढल्यावर प्रथमोपचार आवश्यक ठरतात. त्यामुळे सीपीआर (हृदय-फुप्फुस पुनरुज्जीवन) प्रथमोचार करता येणारी एक प्रशिक्षित व्यक्ती किनाऱ्यावर तैनात ठेवावी, म्हणजे जीव वाचवता येईल.