पृथ्वी हा ग्रह खरोखरीच अद्भुत आहे. इथले खडक, खनिजे आणि जीवाश्म अतिशय स्वारस्यपूर्ण आहेत. अथांग सागर, उत्तुंग पर्वतरांगा आणि विस्तीर्ण वाळवंटे निसर्गाची विविध रूपे दाखवतात. इथली विविधतेने नटलेली जीवसृष्टी तर पृथ्वीचे खास वैशिष्ट्य आहे. साहजिकच पृथ्वीचे वय हा प्राचीन काळापासून जिज्ञासेचा विषय झाला आहे.

पूर्वी पृथ्वीच्या वयाच्या अनुमानासाठी धार्मिक किंवा पौराणिक विश्वासांचा आधार घेतला जाई, अथवा ते तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून मोजले जात असे. पृथ्वीच्या वयासंबंधी अनेक वेगवेगळी मते अस्तित्वात होती. वर्ष १६५० मध्ये बायबलमधल्या कथांच्या आधारे आर्च बिशप अशर यांनी पृथ्वीचा जन्म सहा हजार वर्षांपूर्वी झाला होता असे प्रतिपादन केले होते. वर्ष १८९७ मध्ये भौतिकवैज्ञानिक लॉर्ड केल्विन यांनी पृथ्वीमधून दरवर्षी किती उष्णता अवकाशात निघून जाते, याचा अभ्यास करून पृथ्वीचे वय २ ते ४ कोटी असावे असा अंदाज व्यक्त केला होता. तर भारतीय तत्त्वज्ञानानुसार पृथ्वी ही अनादि-अनंत आहे असे मानले जाते.

गाळाच्या खडकांच्या निर्मितीचा दर, समुद्रातील क्षार जमा होण्याचा दर, अशा काही नैसर्गिक आविष्कारांचा आधार घेऊनही पृथ्वीचे वय किती आहे, हे सांगण्याचा प्रयत्न झाला. पण त्यामध्ये काही त्रुटी होत्या. जेम्स हटन यांनी मात्र १७८५ मध्येच पृथ्वीचे वय कित्येक कोटी वर्षे असले पाहिजे असे ठामपणे सांगितले होते.

चार्ल्स डार्विन यांनी १८५९ मध्ये जैव उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तेव्हा विविध पाषाणप्रस्तरात असणाऱ्या जीवाश्मांवरून कोणता प्रस्तर आधी निर्माण झाला आणि कोणता नंतर, हे सांगता येऊ लागले. त्यावरून खडकांचा सापेक्ष कालक्रम तयार झाला. तरी पाषाण प्रस्तराचे किंवा पृथ्वीचे अचूक वय (ॲब्सोल्युट एज) किती आहे, ते सांगता येत नव्हते.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लागलेला किरणोत्सर्जनाचा शोध भूवैज्ञानिक कालमापनासाठी क्रांतिकारी ठरला. जेव्हा एखाद्या मूलद्रव्याचा किरणोत्सारी समस्थानिक स्थिर स्वरूपात रूपांतरित होत असतो, तेव्हा त्याचा सातत्यपूर्ण गतीने क्षय (डीके) होत असतो. मूळ किरणोत्सारी समस्थानिक आणि त्यातून निर्माण झालेले स्थिर समस्थानिक यांचे प्रमाण आणि मूळ समस्थानिकाच्या क्षयाचा दर वापरून गणिती सूत्रानुसार त्या खडकाचे वय काढले जाते.

पृथ्वीवरचे सर्वात जुने खडक सुमारे चार अब्ज वर्षे जुने आहेत. सूर्यमालेतील पृथ्वीवर येऊन पोहोचलेल्या अशनीचे वय किरणोत्सर्गी कालमापनानुसार सुमारे ४.५४ अब्ज वर्षे आहे. पृथ्वी आणि उर्वरित सूर्यमालेची निर्मिती एकाच वेळी झाली असल्याने पृथ्वीचेही वय ४.५४ अब्ज वर्षे ग्राह्य धरले आहे.

– अरविंद आवटी

मराठी विज्ञान परिषद

ई-मेल office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org