कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना प्रथम विज्ञानकथांमध्ये मांडली गेली होती. प्रस्थापित विज्ञान तंत्रज्ञानाच्या आविष्काराचं भविष्यात प्रक्षेपण करून कोणत्या संभाव्य प्रणाली विकसित होऊ शकतात यासंबंधीचं कल्पनाचित्र हा विज्ञान कथांचा स्थायीभाव आहे. त्या अनुषंगानं जेव्हा संगणकाधिष्ठित विविध यंत्रांचा वापर रूढ होऊ लागला त्या वेळी ही यंत्रं चालकाचा हात सोडून स्वतंत्रपणे काम करू शकतील अशी कल्पना लढवली गेली. तिचाच विस्तार कृत्रिम अवतारात पुढं आला आहे. त्या अर्थी विज्ञान कथा ही कृत्रिम प्रज्ञेची जननी आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. एके काळी फक्त विज्ञान कथेच्या क्षेत्रातच वावरणारी ही कल्पना आज प्रत्यक्षात साकार झाली आहे.

हेही वाचा >>> कुतूहल: ‘सायबरस्पेस’ संकल्पना मांडणारे वर्नर विंजी

आज जरी कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाजावाजा होत असला तरी ती तशी नव्यानंच प्रकाशात आलेली कल्पना नाही. कथांमधून तिचे विविध आयाम यापूर्वीच उदयाला आलेले आहेत. काही समीक्षक तिचा उगम प्राचीन ग्रीक वाङ्मयात झाल्याचा दावा करत असले तरी साधारण एका शतकापूर्वी जेव्हा यंत्रसंस्कृती उदयाला आली तेव्हा या संकल्पनेची ठिणगी पडली असं म्हणता येईल. तिचाच विकास आज एका सर्वस्पर्शी आग्यामोहोळात होऊ घातला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे काम करणाऱ्या यंत्रमानवांनी आज जग पादाक्रांत केलेलं नसलं तरी तो दिवस दूर नाही याची प्रचीती आताच येऊ लागली आहे. आजची विज्ञान कथा हे उद्याचं वास्तव आहे या दाव्याची पुष्टी करणारी ही घटना आहे. तसंच या आविष्काराचा प्रभाव तुमच्याआमच्या आयुष्यावर आपला प्रभाव टाकणार आहे, याविषयी शंका राहिलेली नाही. त्या दृष्टिकोनातून विज्ञानकथांचा मागोवा घेत त्यातल्या वर्णनानुसार माणसाच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आणि मुख्यत्वे भावनिक आयुष्यात कोणते आवर्त कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उठू शकतात यांचा धांडोळा घेणं उचित ठरतं.

हेही वाचा >>> कुतूहल: यशाचे आव्हान

विज्ञानकथांच्या या प्रवाहाची गंगोत्री ॲलन ट्युरिंगच्या पाऊणशे वर्षांपूर्वी सादर केलेल्या एका शोधनिबंधात मिळते. त्या दूरदर्शी वैज्ञानिकानं माणूसप्राण्याप्रमाणेच स्वतंत्र विचार करणाऱ्या यंत्राची कल्पना केली होती. माणसं जशी त्यांना मिळालेल्या विविध अनुभवांची चिकित्सा करून आपल्या वर्तणुकीचं आयोजन करतात, त्याचप्रमाणे यंत्र त्याच्या निर्मितीच्या वेळी त्याला मिळालेल्या आज्ञावलीवरच विसंबून न राहता मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करत त्या आज्ञावलीच्या पलीकडे जाईल, असा ट्युरिंगचा होरा होता. त्या वेळी इतर वैज्ञानिकांनी जरी त्याची हेटाळणीच केली तरी विज्ञानकथाकारांना त्यात आपल्या साहित्यकृतींसाठी नवीन बीज सापडलं होतं. त्याचीच जोपासना करत त्या काळातल्या आघाडीच्या विज्ञानकथाकारांनी आपल्या साहित्यकृती निर्माण केल्या होत्या.

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद

ई-मेल: office@mavipa.org                                    

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ: http://www.mavipa.org