क्षयरोगाची पहिली लिखित नोंद भारतात सापडते ती एक हजार वर्षापूर्वीची. क्षय अतिगंभीर संसर्गजन्य रोग आहे. तो मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिसस जीवाणूंमुळे होतो. हे क्षयजीवाणू फुप्फुसांमध्ये वास्तव्य करतात, वाढतात. रोग्याच्या खोकण्या-शिंकण्यातल्या तुषारांतून आसपासच्या सजीवांपर्यंत पोहोचतात. क्षयजीवाणू आश्रयदात्याच्या पेशींत दडून राहतात. त्यामुळे त्यांना मारणे म्हणजे आपल्याच पेशींना मारणे ठरते. क्षयजीवाणूची पेशीभित्तिका जाड असून प्रतिजैविकांना सहजपणे जीवाणूपेशींत येऊ देत नाही. अनेक प्रतिजैविके जीवाणूपेशींचे विभाजन होताना त्या आवरणहीन पेशींना मारतात. हे टाळण्यासाठी क्षयजीवाणू सुप्तावस्थेत राहतात व पेशीविभाजन टाळतात.

क्षयजीवाणू रक्तातील भक्षक पांढऱ्या पेशी परिपक्व होण्यात बाधा ठरतात. त्यामुळे पांढऱ्या पेशींना सूक्ष्मजीव नष्ट करणे अवघड होते. क्षयाच्या जीवणूंच्या पेशीभित्तिकेवर मेणासारख्या चिकट आणि टणक रसायनांचा थर असतो. मायकॉलिक अॅसिड आणि पेप्टायडोग्लायकान या रसायनांमुळे या जीवाणूची पेशीभित्तिका प्रतिजैविकांना विरोध करते. क्षयजीवाणू ई-सॅट-६ प्रथिन स्रावतात. ते आश्रयदात्याच्या पेशीपटलांचे खंडन करते. क्षयजीवाणूंमध्ये उत्परिवर्तने म्हणजे डीएनए रचनेत बदल घडतात. त्यामुळे काही क्षयजीवाणूंचे जगणे सुलभ होते, आणि आश्रयदात्याचे मुश्कील! एथामब्युटॉल, कानामायसिन, पिरॅझिनॅमाइड यांसारख्या क्षयजीवाणूंवरील औषधांविरोधी उत्परिवर्तने कोणत्या जनुकांत होतात हे कळले आहे. त्याचा भविष्यात क्षयनियंत्रणात उपयोग करता येईल.

क्षयरोगावरील औषधे दीर्घकाळ सहा-नऊ महिने घ्यावी लागतात. पण काही रोगी प्रकृती जरा सुधारताच औषधे घेणे स्वत:च बंद करतात. त्यातून साध्या औषधांना न जुमानणारे, प्रतिजैविक-विरोधी क्षयजीवाणूंची नवीन वाणे निर्माण होतात. त्यांचा नायनाट करण्यासाठी बहुऔषध-प्रतिरोधक [मल्टी ड्रग रेझिस्टंट (एमडीआर) टीबी] क्षयरोग्याना खर्चीक, नवी, आक्रमक, महागडी औषधे दीर्घकाळ देऊन बरे करावे लागते. तरीही काही रोगी दगावतात. हे जीवाणू रिफम्पीसीन आणि आयसोनियाझिड या प्रतिजैविकांना विरोध करतात. मरण्यापूर्वी क्षयप्रसार करू शकतात. एमडीआर-टीबी आणि त्यापेक्षा घातक असा त्याचा उपसंच, एक्सएमडीआर-टीबीच्या निदानात अडचणी आल्याने औषधोपचारात विलंब होतो. अशा परिस्थितीत रोगप्रसाराची यशस्विता २०२० साली फक्त ६३ टक्के होती. थुंकीतल्या क्षयजीवाणूंच्या जाड पेशीभित्तिका फोडून, या जीवाणूंचे डीएनए नेमके शोधणे अवघड असते.

फुप्फुसांखेरीज हाडे, सांधे, मेंदू, चेतारज्जू, यकृत, मूत्रपिंडे, रसग्रंथी, डोळे यांच्यावरही हा रोग वाईट परिणाम घडवू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने ‘जागतिक क्षय निर्मूलन’ कार्यक्रम आखून २०३०-३५ दरम्यान क्षय निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले असल्याने, क्षयाच्या यक्षप्रश्नाशी जगभरचे आरोग्यरक्षक लढत आहेत.

नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org