पुणे जिल्ह्यात २७ जानेवारी, २०२५ पासून ‘गीलन-बारे सिण्ड्रोम’ म्हणजे जीबीएसचा उद्रेक झाल्यापासून लोकांना हा रोग परिचित झाला. गीलन-बारे हा शब्द दोन शास्त्रज्ञांची आडनावे जोडून बनला आहे. जॉर्जेस गीलन आणि जिन आलेक्झांड्रे बारे या दोन फ्रेंच मेंदूतज्ज्ञ शास्त्रज्ञांनी १९१६ साली या लक्षणसमूहाची प्रथम नोंद घेतली. जीबीएसच्या २११ रुग्णांची नोंद झाली आणि त्यातील ११ रुग्ण दगावले.

जीबीएसमुळे आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष पाणवठ्यांच्या स्वच्छतेकडे, पाण्याच्या दर्जाकडे, आरोग्य सेवाव्यवस्थेच्या दुरवस्थेकडे गेले, कारण जीबीएससाठी कारणीभूत असणारे ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजूनी’सारखे जिवाणू दूषित पाण्यातून, अर्धवट शिजवलेल्या अन्नातून आणि पाश्चरायझेशन पूर्ण न झालेल्या दुग्धजन्य पदार्थांमार्फत माणसाच्या पोटात पोहोचतात. यातून होणाऱ्या गस्ट्रोएंटेरायटिसमुळे प्राणघातक ठरू शकणारा गीलन-बारे सिण्ड्रोम रोग होऊ शकतो. पाणी रोगजंतूवाहक असू शकते, त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करणे क्रमप्राप्तच होते. हगवण, ताप, वेदना अशी लक्षणे दिसतात. यात डोळा आणि चेहऱ्याच्या स्नायूंची हालचाल सामान्यपणे करता येत नाही. स्नायूंना वेदना होतात. हृदयरक्तदाब असामान्य होतो.

जीबीएसमध्ये मुख्यत: परिघवर्ती चेतासंस्थेतील चेतातंतूंभोवतालचे मेद पदार्थाचे आवरण भंगते. केंद्रीय असो की परिघवर्ती, चेतातंतूंभोवतालचे मेदावरण तुटक झाल्यास चेतातंतूमधून होणाऱ्या आवेग वहनवेगावर, आवेगगुणावर दुष्परिणाम होतात. स्नायू दुबळे होतात, पक्षाघातही होऊ शकतो. हातापायाला मुंग्या येतात, श्वासोच्छ्वासास त्रास होतो. जिवाणूची प्रथिने मानवी चेतापेशींच्या प्रथिनांची नक्कल करतात आणि त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता जिवाणूंचा नायनाट करण्याऐवजी स्वत:च्याच चेतापेशींवर हल्ला चढवतात.

चाचणी घेण्यासाठी पाठीच्या कण्याच्या शेपटाकडील भागात चेतावरणात लांब, बारीक, पोकळ सुई घालून मेंदूमज्जारज्जूद्रवाचा नमुना काढून तपासतात. त्यात प्रथिनप्रमाण ४०० मिलिग्राम/लिटरपेक्षा वाढले असेल, पण पांढऱ्या पेशींची संख्या वाढली नसेल तर; जीबीएस असल्याचा संशय बळावतो. इलेक्ट्रोमायोग्राम चाचण्या स्नायू कसे काम करीत आहेत हे दर्शवतात. इलेक्ट्रोमायोग्राम चाचण्यांत स्नायू दिवसेंदिवस अधिकाधिक दुबळे होत आहेत असे दिसले, तर ते जीबीएस निदर्शित करते. चेतातंतूमधून होणाऱ्या आवेग वहनवेगाच्या तपासण्याही जीबीएसचे निदान पक्के करण्यास मदत करतात. उपाय म्हणून रुग्णाला रुग्णालयात ठेऊन श्वासोच्छवास, हृदयस्पंदन, रक्तदाब नियमित ठेवतात. गंभीर रोग्यांच्या रक्तद्रवातून अतिरिक्त प्रमाणातील प्रतिद्रव्ये काढून टाकतात. रोगोपचारापेक्षा उच्च तापमानाला शिजवलेले अन्न, शुद्ध पाणी आणि सार्वजनिक आरोग्य याचा अवलंब करून आपण हा रोग टाळू शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलोजी, पुणे येथे यावर संशोधन सुरू आहे.

नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org