scorecardresearch

कुतूहल : स्पंजांच्या गमती

जपानमध्ये लग्नाच्या वेळी शरीरात कोळंबी अडकलेल्या स्पंजाचा तुकडा अहेर म्हणून देण्याची पूर्वापर पद्धत होती.

sponges species information
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

रंध्री संघातले प्राणी सतत आजूबाजूच्या सागरीजलाचे शोषण आणि उत्सर्जन करत असल्याने, आजूबाजूच्या इतर सजीवांच्या शरीराचे सूक्ष्म तुकडे व पेशी पाण्याबरोबर त्यांच्या शरीरात अडकतात. त्यामुळे शरीरात अडकलेल्या पेशींचा  डी.एन.ए. तपासून या रंध्रींच्या साहाय्याने जैवविविधता अहवाल तयार करण्याची पद्धत रूढ झाली.

जपानमध्ये लग्नाच्या वेळी शरीरात कोळंबी अडकलेल्या स्पंजाचा तुकडा अहेर म्हणून देण्याची पूर्वापर पद्धत होती. जसे स्पंज आणि कोळंबी एकत्रच जगतात तसेच हा विवाह चिरकाल टिकावा, अशी कल्पना त्यामागे होती. ‘ड्रोमिया’ प्रजातीचा स्पाँजक्रॅब हा खेकडा आपल्या शेवटच्या उपांगाच्या जोडीने पाठीवर कायम स्पंज धरून फिरत असतो. डेकोरेटर खेकडा आणि स्पायडर खेकडा हे आपल्या पाठीवर स्पंजांचे तुकडे, समुद्र वनस्पती इत्यादी अडकवून नटलेले असतात. भारतीय किनाऱ्यांवर स्पंजाच्या ‘टेथिया’ आणि ‘टेट्टीला’ या प्रजाती आढळतात.

स्पंज प्रजातींच्या व्यवसायामध्ये विविध देश सहभागी होतात. पूर्वेचा भूमध्य समुद्र, त्याचप्रमाणे बहामा बेटे, मेक्सिकोचा समुद्रधुनी आणि फ्लोरिडा अशा ठिकाणी आंघोळीच्या स्पंजाची (युस्पोन्जिया) धरपकड केली जात असे. आंघोळीचा स्पंज म्हणजेच बाथ स्पंजमध्ये ‘स्पाँजीन’ धाग्यांचे कंकाल असते. हे केरॅटिन प्रथिनांपासून तयार झालेले असून त्यात सल्फरचा अंश असतो. या स्पाँजीन तंतूमुळेच त्यांना व्यापारीमूल्य येते. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात असा स्पंज काढण्याचा व्यवसाय म्हणजेच ‘स्पाँजिंग’ मोठय़ा प्रमाणात केले जाई. अथेनियन ऑलिम्पिकमध्ये स्पाँजिंग करण्यासाठी पाण्यात बुडी मारणे हादेखील एक खेळ असे.

बहामा बेटावरील स्थानिक स्पंज वापरतात, हे पाहून १८४१ पासून फ्रेंच व्यापाऱ्यांनी स्पंजावर आधारित नवीन उद्योग सुरू केला. हे स्पंज बोटीवर आणून उघडय़ा पायांनी तुडवून त्यांचा ढीग करून त्यातील पाणी निघून जायची वाट बघत असत. पोत्याखाली झाकून ठेवलेले हे स्पंज पिळून आणि धुऊन त्यांचा बाहेरचा स्तर काढून टाकला जात असे. नंतर एका दोरीवर बांधून, प्रतवारी करून ते विक्रीसाठी नेले जात. या व्यवसायाने स्पंजांची बरीच हानी झाली. कालांतराने कृत्रिम स्पंज तयार केले जाऊ लागले. यांच्यात सेल्युलोज, निओप्रिन आणि विनाइल ही रसायने  जास्त असल्यामुळे नैसर्गिक स्पंजच्या मानाने ते कमी प्रतीचे असतात.

– डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-05-2023 at 03:11 IST

संबंधित बातम्या