खाण म्हणजे औद्याोगिक उपयोगांची खनिजे, कोळसा आणि मौल्यवान रत्ने मिळवण्यासाठी जमिनीमध्ये केलेले खोदकाम. खाणींचे दोन प्रमुख प्रकार पडतात; पृष्ठभागावरील भलामोठा खड्डा म्हणजे खुली खाण (ओपन पिट) किंवा जमिनीखालील बोगदे (अन्डरग्राउंड टनल). बऱ्याचदा खाणी पृष्ठभागावरील खड्ड्यांच्या स्वरूपात सुरू होतात आणि मग भूगर्भात बोगद्यांच्या स्वरूपात विकसित होतात. खड्डे हळूहळू खोल होत जातात. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये भूस्खलनाचा धोका असतो; तर जमिनीखालील बोगद्यांमध्ये छतावरून खडक पडण्याचा धोका असतो.

हे बोगदे खणताना कसे खणावेत, कोठे विस्फोटके वापरावीत आणि कोठे वापरू नयेत याचाही विचार करावा लागतो. विस्फोटके वापरल्याने स्फोटाच्या ऊर्जेमुळे भूस्खलन अथवा भूकंप होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कामगारांना गंभीर इजा होऊ शकते. कधी कधी मृत्यूही होऊ शकतो. म्हणून स्फोट घडवण्याआधी संपूर्ण खाण रिकामी केली जाते.

कोळशाच्या खाणी आणि इतर खनिजांच्या खाणी यात थोडासा फरक आहे. कोळशाच्या खाणींमध्ये कोळशाबरोबर मिथेन वायूही असतो. तो अत्यंत ज्वालाग्राही असल्यामुळे खाणकाम करताना थोडीशी जरी चूक झाली तरी खाणीत आग लागू शकते. शिवाय स्वत: कोळसा ज्वलनशील असतो. त्यामुळे खाणींमधील आग सहज विझवता येत नाहीत. २७ मे, १९६२ रोजी अमेरिकेतील सेंट्रालिया येथे कोळशाच्या खाणींमधून निघालेल्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करताना त्या कचऱ्याच्या ढिगाला आग लावण्यात आली होती. काही कारणामुळे ती आग ढिगाखालील कोळशाच्या खाणीत पसरली. ती कोणालाच विझवता आली नाही आणि आजतागायत, म्हणजे गेली ६३ वर्षे ती आग तशीच धगधगत आहे. वैज्ञानिकांच्या मते या खाणीमध्ये अजूनही इतका कोळसा शिल्लक आहे, की आग आणखी सुमारे २५० वर्षे अशीच धगधगत राहील.

खनिजाची खाण तुलनेने सुरक्षित असते. तरीही इथेही आगीचा धोका असतोच. कारण भोवतालच्या खडकांमधूनही काही वेळा ज्वलनशील वायू निघू शकतात. याशिवाय खाणींमधल्या भूजलाचे व्यवस्थापन हाही एक महत्त्वाचा घटक असतो. खाणींमध्ये विविध जीवाश्मही आढळतात. त्यांच्याकडेही लक्ष ठेवावे लागते.

खाण बंद करताना आतील बोगदे तसेच सोडून दिल्यास जमीन खचण्याचा धोका असतो. तसेच खाणीमधून वाहणारे भूजल हे खनिजे, खडक आणि रसायने यांमुळे विषारी झालेले असते. ते तसेच नदीत सोडून दिल्यास नदीही प्रदूषित होते. म्हणून खाण बंद करताना लोकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाचे रक्षण या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी लागते.

डॉ. निनाद भागवत, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org