खेळ आणि खेळाडूच्या संवर्धनासाठी क्रीडाविश्वात कृत्रिम बुद्धिमत्ता अत्यंत लाभदायक आहे, यात शंकाच नाही. परंतु कोणत्याही संगणकीय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीप्रमाणेच या कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणाही अतिप्रचंड प्रमाणात विदा म्हणजे डेटाचा उपयोग करतात. त्यामुळेच नीतिमूल्यांचे (एथिक्स) अनेक प्रश्न या प्रणालींच्या उपयोगात उभे राहतात.

या प्रणाली खेळाडूचा खेळ, त्याचे आरोग्य आणि त्याचा वैद्याकीय डेटा, विविध प्रकारे म्हणजे व्हिडीओ, परिधानलेली उपकरणे, वैद्याकीय नोंदी इत्यादींमार्फत गोळा करतात. हा डेटा एकदा कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेत आला की त्याचा योग्य वापर होतो आहे की नाही यावर कोणाचे नियंत्रण राहत नाही. शिवाय हा वापर त्या खेळाडूच्या संमतीने होतो आहे की त्याच्या नकळत होतो आहे, हाही प्रश्न उभा राहतो. वापर खेळाडूच्या संमतीने होत असला तरी संमती घेताना त्या खेळाडूला त्याच्या उपयोगाबाबत आणि संभाव्य चांगल्या आणि वाईट परिणामांबद्दल पूर्णपणे माहिती दिली होती की नाही (इन्फॉर्मड कन्सेंट) याचा विचार आवश्यक आहे.

हे सर्व योग्य रीतीने झाले असे मानले तरी हा सर्व डेटा अधिकृत कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेच्या बाहेर पडून अपात्र/ अनधिकृत व्यक्तींच्या अथवा प्रणालींच्या हातात पडणार नाही याची खात्री देता येईल का, म्हणजे डेटाची सुरक्षितता आणि गोपनीयता याविषयी प्रश्न उभा राहतो. शिवाय एकदा रुग्णालयात दाखल झाल्यावर आपली ओळख जशी बेड क्र. ५ अशी राहते तसाच प्रकार खेळाडूच्या बाबतीत होऊन खेळाडूऐवजी एक डेटास्राोत म्हणून त्याची ओळख राहील का, असा प्रश्नही उभा राहतो.

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींचा वापर करून अनेक संघ आणि संस्था खेळाडू निवडतात. त्यामुळे जर प्रणाली निर्माण करताना त्यात धर्म, वंश, वर्ण, प्रदेश इत्यादी गोष्टींसंदर्भात काही पूर्वग्रह (बायस) अंतर्भूत झाला असेल तर एखादा खेळाडू किंवा संघ एका चांगल्या संधीला मुकू शकतो किंवा एखाद्या खेळाडूवर अन्याय होऊ शकतो किंवा त्याच्या बाबतीत भेदभाव होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीतिमूल्यांबाबत उभ्या राहणाऱ्या अनेक प्रश्नांपैकी हे काही प्रश्न. असे काही घडले नाही तर उत्तमच; परंतु अनवधानाने किंवा जाणूनबुजून असे झाले तर त्याचे उत्तरदायित्व कोणाचे, हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वात चर्चिला जात आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आणि तत्सम मान्यवर आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्थांनी या संदर्भात नियमन अस्तित्वात आणावे अशी जोरदार मागणी होत आहे.