पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात भूविज्ञान विभाग १९०८ मध्ये स्थापन झाला. सुरुवातीला जीवविज्ञानाचे प्राध्यापक पुराजीवविज्ञान (पॅलिऑन्टॉलॉजी) शिकवत, भौतिकीचे प्राध्यापक खनिजांचे प्रकाशीय गुणधर्म (ऑप्टिकल प्रॉपर्टीज) शिकवत, रसायनविज्ञानाचे प्राध्यापक खनिजविज्ञान शिकवत. अभियांत्रिकी महाविद्यालयातले प्राध्यापक प्रस्तरविज्ञान (स्ट्रॅटिग्राफी) शिकविण्यासाठी येत.
१९१९ मध्ये कमलाकर वामन केळकर यांनी तिथे विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. त्यांच्या वडिलांची कोकणात खोती होती, पण ते सरकारी नोकरीनिमित्त कर्नाटकात गोकाक येथे असल्याने केळकरांचे प्राथमिक शिक्षण कर्नाटकातच झाले होते. नंतर ते पुण्यात आले आणि त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९२३ मध्ये त्यांनी भूविज्ञान आणि रसायनविज्ञान घेऊन बीएस्सी ही पदवी मिळवली. त्याच वर्षी भूविज्ञान विषयासाठी पूर्णवेळ प्राध्यापकाची नेमणूक करण्याचा निर्णय फर्ग्युसन महाविद्यालयाने घेतला आणि त्या पदावर केळकर यांची नेमणूक झाली.
पुढे तीनच वर्षांनी महाविद्यालयाने बीएस्सीसाठी संपूर्ण भूविज्ञान विषय घेण्याची अनुमती विद्यार्थ्यांना दिली. त्यामुळे केळकरांच्या खांद्यावर तरुण वयातच मोठी जबाबदारी आली. पण कठोर मेहनत घेऊन त्यांनी महाविद्यालयाचा भूविज्ञान विभाग उभा केला. स्वत: वाचन करून ते भूविज्ञानातल्या उपविषयांचे अद्यायावत ज्ञान मिळवत आणि मगच शिकवत. कोणत्याही सुविधा नसताना स्वत:च्या हिमतीवर त्यांनी गोकाक परिसरातल्या खडकांवर संशोधन करून एमएस्सीसाठी प्रबंध सादर केला. ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ विभागातले ख्यातनाम भूवैज्ञानिक डॉ. ल्युइस फरमॉर यांची नियुक्ती मुंबई विद्यापीठाने त्यांचे परीक्षक म्हणून केली होती. फरमॉर यांच्या शिफारसीवरून विद्यापीठाने केळकरांना विशेष प्रावीण्यासह (डिस्टिंक्शन) एमएस्सी पदवी प्रदान केली.
काही काळ त्यांनी संशोधनाद्वारे एमएस्सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शोधनिबंधही प्रकाशित केले. १९४६ मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यावर मात्र परीक्षेद्वारा एमएस्सी प्रदान केली जाऊ लागली. जवळपास १५ वर्षे केळकरांनी फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ या दोन्ही संस्थांच्या भूविज्ञान विभागाची धुरा सांभाळली. १९६२ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले, पण सेवाभावातून निवृत्त झाले नाहीत. महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मितीच्या कार्यात त्यांनी विज्ञान विभागाचे संपादक म्हणून योगदान दिले.
त्या काळात भारतात भूविज्ञान विकसित करण्याच्या विचाराने झपाटलेल्या निरनिराळ्या विद्यापीठांतल्या अनेक समर्पित प्राध्यापकांच्या समूहाचे ते एक सदस्य होते. त्या काळात उभ्या राहिलेल्या अनेक भूवैज्ञानिक संघटनांच्या निर्मितीमध्ये केळकरांचाही सहभाग होता.
केळकरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या भूवैज्ञानिक आस्थापनांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ६ डिसेंबर १९७१ रोजी त्यांनी वाई इथे शेवटचा श्वास घेतला.
– डॉ. रवींद्रसिंह परदेशी,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org