आमच्या कॉलेजमध्ये आमची एक मैत्रीण होती. जेवणाच्या सुट्टीत जेव्हा आम्ही आमचे डबे उघडून एकत्र जेवायला बसायचो. तेव्हा ती दुसऱ्याच्या डब्यांवर ताव मारून, आपला डबा तसाच ठेवायची. त्यामुळे तिला काय समाधान मिळायचे कोणास ठाऊक! यासाठी ती बरीच कारणे देत असे- ‘माझे एक नातेवाईक खूप आजारी आहेत..’ किंवा ‘माझी तब्येत बिघडली, मी आज डबा घेऊन येऊ शकले नाही’ इ.इ. एक ना दोन!

हजार कारणे सांगून ती आपला हेतू साध्य करून घेई. पण खोटे बोलणे फार दिवस लपून राहू शकत नाही. त्यातले सत्य कधी तरी बाहेर येतेच!

तसेच झाले.

एके दिवशी एका मैत्रिणीला खरे काय ते कळलेच. मग ती मैत्रीण चक्क या ‘डबा न आणणारी’चाच डबा तिच्या नकळत जेवायच्या वेळेला घेऊन आली. आणि सर्वाना म्हणाली, ‘मैत्रिणींनो! मी आज अगदी चविष्ट जेवण या डब्यातून सर्वासाठी आणले आहे. बघा तरी इतके रुचकर जेवण कुणाचे आहे!’  तिने डबा  उघडला. त्या डब्याकडे आमची ती लबाड मैत्रीण केवळ बघतच राहिली. मग आमची मैत्रीण तिला म्हणाली, ‘‘हे बघ, तू आमच्या डब्यावर रोजचाच ताव मारीत होतीस ही गोष्ट आमच्या खरे तर लक्षात आली होती, पण आम्ही विचार करत होतो, सावज जाळय़ात कसं पकडायचं? आज पकडली गेलीस. ‘आयत्यावर कोयतं आणि  शिंक्यावर रायतं’ या म्हणीप्रमाणे आपलं शिंक्यावरचं लोणचंही कुणाच्या हाती लागू द्यायचं नाही आणि दुसऱ्यानी वाढवलेल्या, आयत्याच हाती लागलेल्या फांदीवर कोयत्याचे घाव घालायचे ही तुझी रीत आहे. इतकी कशी गं खादाड आणि अप्पलपोटी आहेस तू ?’’

रायतं म्हणजे लोणचं. लोणच्याला मराठवाडय़ात कुठे कुठे ‘रायतं’ असे म्हणतात. दह्यत कालवून केलेला कोशिंबिरीसारखा पदार्थ, असाही त्याचा अर्थ आहे. ‘आयत्यावर कोयतं आणि  शिंक्यावर रायतं’ ही म्हण अत्यंत स्वार्थी माणसासाठी वापरली जाते. दुसऱ्यांनी वाढवलेल्या फांदीवर हे लोक कोयत्याने सपासप घाव घालतात, पण आपले लोणचेही शिंक्यावर ठेवून देतात. त्याची एकही फोड कुणाच्या हाती लागू देत नाहीत.

– डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com