एखादी वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साबणाची उपयुक्तता सांगायला नकोच. साबण हा वनस्पतीजन्य तेलांतील किंवा प्राण्यांच्या चरबीतील मेदांपासून तयार केला जातो. या मेदांपासून बनणाऱ्या मेदाम्लांचे सोडियम, पोटॅशियमसारख्या अल्कधर्मी धातूंचे क्षार म्हणजे साबण. वस्तूवरची न धुतली जाणारी धूळ ही त्या वस्तूवरील तेलामुळे चिकटून राहिलेली असते. पाण्यात विरघळणारे साबणातील क्षार त्या वस्तूवरील तेलाच्या रेणूंना रासायनिक बंधांद्वारे वेगळे करून पाण्यात खेचतात. त्यामुळे तेल व धूळ हे दोन्ही पदार्थ त्या वस्तूपासून दूर होऊन ती वस्तू स्वच्छ होते. पूर्वी युरोपातल्या महिला साबण बनवण्यासाठी, प्राण्यांची टाकाऊ चरबी, स्वयंपाकघरात जमणारी राख आणि पाणी यांचे मिश्रण तापवून त्यापासून साबण तयार करत असत. राखेमध्ये असलेल्या अल्कधर्मी काबरेनेटची प्राण्यांच्या चरबीपासून बनणाऱ्या पाल्मिटिक किंवा स्टीरिक आम्लाशी प्रक्रिया होऊन साबण तयार होई.
सन १७८९ साली निकोलस लॅब्लां या फ्रेंच रसायनतज्ज्ञाने सोडियम क्लोराइडपासून सोडियम काबरेनेट तयार करण्याची रासायनिक क्रिया विकसित केली. या सोडियम काबरेनेटपासून सोडियम हायड्रॉक्साइड (कॉस्टिक सोडा) सहजपणे तयार केले गेले. कॉस्टिक सोडय़ाची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती करता येऊ लागल्याने, साबण निर्मितीसाठी कॉस्टिक सोडय़ाचा वापर सुरू झाला आणि साबण उद्योगाला चालना मिळाली. १८२३ साली मिशेल युजेन-शेवरूल या फ्रेंच रसायनतज्ज्ञाने आपल्या, मेदाम्लांवरील संशोधनादरम्यान साबणाचे खरे स्वरूप शोधून काढले. त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस साबणाची निर्मिती ही रीतसरपणे त्यातील रासायनिक घटकांच्या वापराद्वारे मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली.
पहिल्या महायुद्धाच्या काळात, १९१६ साली जर्मनीतील चरबीच्या तुटवडय़ामुळे तिथे वेगळी प्रक्रिया शोधून काढली गेली व त्याद्वारे डिर्टजटची निर्मिती झाली. साबणातील क्षार हे काबरेक्सिलिक आम्लाचे असतात, तर डिर्टजटमधील क्षार हे सल्फॉनिक आम्लाचे असतात. खनिज तेलातील मेदांवर सल्फुरिक आम्लाची प्रक्रिया करून डिर्टजट तयार केले जाते. साबण जेव्हा कठीण पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचे पाण्यातील कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमच्या आयनांबरोबर पाण्यात न विरघळणारे क्षार निर्माण होतात. डिर्टजटच्या बाबतीत मात्र असे पाण्यात न विरघळणारे कोणतेही क्षार निर्माण होत नाहीत. त्यामुळे पाण्यात अधिक प्रमाणात विरघळणाऱ्या डिर्टजटने आज धुलाईच्या बाबतीत अनेक ठिकाणी साबणाला बाजूला सारले आहे.
– प्रा. भालचंद्र भणगे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org