09 August 2020

News Flash

वस्तुजालाची घडण

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’द्वारे एखादे उपकरण प्रत्यक्ष वापरापर्यंत त्यात कशा कशाची गुंतवणूक केली जाते, याविषयी.. 

|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’द्वारे एखादे उपकरण प्रत्यक्ष वापरापर्यंत त्यात कशा कशाची गुंतवणूक केली जाते, याविषयी.. 

मागील लेखात आपण ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)’बद्दल प्राथमिक माहिती करून घेतली. तिथून पुढे आयओटी प्रकल्पात ज्या गोष्टी मोडतात, त्यांतील बारकावे पाहू या. हल्ली एमजी हेक्टर एसयूव्ही गाडीच्या जाहिरातीची जोरदार चर्चा आहे. ‘इट्स अ ह्यूमन थिंग’ म्हणत एका गाडीला (थिंग) मानवी पैलू असू शकतात- जसे शिकणे, बोलणे, प्रतिसाद देणे.. हे ठसवत हळूहळू आपल्या भावविश्वात प्रवेश असा सुंदर परिणामकारक प्रयत्न त्या जाहिरातीत केलेला दिसतोय. भारतात सादर झालेली आयओटी आणि एआयवर आधारित पहिली स्मार्ट-कार म्हणून एमजी हेक्टरला नक्कीच स्थान मिळू शकेल.

सध्या जगात जवळपास ७.३५ अब्ज माणसं राहतायेत आणि ‘कनेक्टेड थिंग्ज’ (आयओटी उपकरणे) आहेत सुमारे २६ अब्ज! २०२५ सालापर्यंत कनेक्टेड उपकरणांची संख्या ७५ अब्जांवर जाईल, असा अंदाज आहे. भविष्यात अधिकाधिक आयओटी उपकरणे फक्त एकमेकांशी जोडलेली न राहता, त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून ‘इंटेलिजन्स’ आणला जाईल. त्यातून प्रचंड डेटा-विश्व निर्माण होईल, सध्याच्या कैक पटींनी मोठे. जमा केलेल्या डेटाचा वापर अर्थातच विश्लेषणासाठी (अ‍ॅनालिटिक्स) करून त्यातून व्यक्तिकेंद्रित (मास-पर्सनलायझेशन) सेवा-सुविधा पुरवल्या जातील. त्यातून अनेक नवीन व्यवसाय, रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील. मुख्य म्हणजे, आपले राहणीमान (वे ऑफ लाइफ) कायमस्वरूपी बदलेल. फायदा/ तोटा व धोके अर्थातच कुठल्याही इतर तंत्रज्ञानाप्रमाणे यातही असणारच; पण कुठे लक्ष्मण-रेषा आखायची, हे शेवटी माणसाच्याच हाती असते.

आजच्या घडीला आयओटीचा सर्वात जास्त वापर पुढील क्षेत्रांत होत आहे : (१) उत्पादन व अवजड उद्योग (२) वैद्यकीय व आरोग्य सेवा (३) ऊर्जा व त्याशी निगडित उद्योग (४) परिवहन, पर्यटन आणि हॉटेल्स (५) पायाभूत सुविधा (६) किरकोळ विक्री बाजार.

वित्तीय व बँकिंग व्यवहार, टेलिकॉम, माध्यमे आणि उच्च तंत्रनिष्ठ उद्योगांमध्ये मात्र आयओटीचा वापर अजूनही नगण्य आहे. जिथे एखादी भौतिक वस्तू आणि त्याची हालचाल, दूरस्थ ठिकाणी त्यांचा वापर असे प्रकार येतात तिथे आयओटीचा वापर अर्थातच जास्त. जिथे मुख्य उत्पादन वा सेवाच अभौतिक स्वरूपात आहे, तिथे आयओटीचा प्रत्यक्ष वापर थोडा अवघडच. दुसरा मुद्दा म्हणजे, आयओटी प्रकल्प अजूनही संकल्पना आणि काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहेत. म्हणजे भविष्यात काहीतरी करायचेय हे नक्की; परंतु सध्या प्रकल्पांची पूर्वतयारी वा अभ्यास सुरू आहे.

आता पाहू, सर्वसाधारणपणे कुठल्याही आयओटी प्रकल्पात लागणाऱ्या प्रमुख गोष्टी आणि स्वतंत्र खर्चाचे गट :

(१) आयओटी तज्ज्ञ सल्लागार (सुमारे पाच टक्के खर्च)-

एकंदरीत प्रकल्पासाठी लागणारे मार्गदर्शन व त्यातील बारकावे माहीत असणारे अनुभवी तज्ज्ञ बहुतांश कंपन्यांकडे नसतात आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरीत ठेवणेही गरजेचे नसते. त्यात अशा तज्ज्ञांची इतकी चणचण आहे, की हवे असल्यास मिळणेही कठीण व अत्यंत महागडे प्रकरण. म्हणून ‘कन्सल्टिंग’ करणाऱ्या कंपन्या इथे कामी येतात. त्यांचे तज्ज्ञ मग ज्यांना आयओटी प्रकल्प राबवायचा आहे, त्या कंपनीच्या अधिकारी समितीबरोबर चर्चा, कार्यशाळा वगैरे करून एकंदरीत आयओटी धोरण ठरवितात. पुढे खोलात जाऊन आयओटी प्रकल्पातील बारकावे- म्हणजे कधी, कुठे, किती गुंतवणूक/ नफा आणि भागीदार म्हणून कुठले कंत्राट कोणाला द्यायचे, वगैरे निर्णय घ्यायला मदत करतात. हल्ली बरेच प्रकल्प पूर्णपणे ‘आऊटसोर्स’- म्हणजे एखाद्या अनुभवी आयओटी कंपनीला कंत्राट म्हणून दिले जातात. त्यांचे कर्मचारी प्रकल्पातील सर्व टप्पे कंत्राट स्वरूपात पार पाडतात.

(२) आयओटी हार्डवेअर (सुमारे १०-१५ टक्के खर्च) –

यात डिव्हाइस सेन्सर्स व त्यांचे डिझाइन, उत्पादन, दुरुस्ती आदींचा समावेश होतो. अब्जावधी सेन्सर्स सध्या उपलब्ध आहेत आणि नवनवीन निर्माण होताहेत. त्यांची किंमतही हळूहळू कमी होतेय. परंतु बरेचदा उपलब्ध असलेल्या सेन्सर्समध्ये थोडेफार फेरफार करून गरजेनुसार नवीन बनवणे आणि ‘फ्रुगल इंजिनीअिरग’- म्हणजे एखाद्या महागडय़ा वस्तूचे किफायतशीर पद्धतीने प्रचंड प्रमाणात उत्पादन करणे, असली कामे यात मोडतात.

आयओटी तंत्रज्ञान प्रामुख्याने सेन्सर्सवर आधारित असले, तरी त्याचा एकंदरीत खर्च संपूर्ण प्रकल्पाच्या १०-१५ टक्के इतकाच असतो आणि तोही दिससेंदिवस कमी होतोय. मागील वर्षी मला आयआयटी, मुंबई येथे राष्ट्रीय आयओटी स्पर्धेत प्रमुख परीक्षक म्हणून बोलवले होते. तेथील विद्यार्थ्यांच्या एका गटाने फक्त २५० रुपयांत शेतकऱ्यांच्या उपयोगी येईल असा आद्र्रता व तापमान सेन्सर सादर केला होता, ज्यास पारितोषिकदेखील मिळाले! एकदम सुटसुटीत डिझाइनचा एका छत्रीच्या टोकाला जोडलेला सेन्सर, त्यापासून तारेद्वारा हॅण्डलपर्यंत आलेली यूएसबी-पोर्ट; ते मोबाइलशी जोडले आणि छत्रीचे टोक शेतजमिनीत खुपसले, की लगेच मोबाइलच्या पडद्यावर जमिनीतील आद्र्रता व तापमान सादर!

इथे आणखी एक मोठा खर्च असतो. तो म्हणजे फील्ड इंजिनीअर आणि पुरवठा साखळीचा! स्थापना, नंतरची देखभाल व गरज पडल्यास दुरुस्ती या सर्व कामांत डिव्हाइस सेन्सर्स उत्पादन-स्थळापासून प्रकल्प-स्थळापर्यंत नेणे, फील्ड इंजिनीअर्सना जुळवणीसाठी आणणे, मग पुढे देखभाल/दुरुस्ती.

(३) आयओटी नेटवर्क (सुमारे १०-१५ टक्के खर्च) –

मागील लेखात पाहिल्याप्रमाणे, जास्त रेंजसाठी जीएसएम मोबाइल नेटवर्क/ सॅटेलाइट, कमी रेंजसाठी वायफाय/ ब्लूटूथ/ ईथरनेट-लॅन आणि एकदम जास्त रेंज, परंतु कमी ऊर्जेसाठी एलपी-वॅन नेटवर्क वापरली जातात, जिथे वीजपुरवठा नसतो.

बहुतांश टेलिकॉम कंपन्यांनी, त्यांची आधीच अस्तिवात असलेली यंत्रणा वापरून असल्या सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, हल्ली आयओटीसाठी खास सिम-कार्ड मिळते. घरगुती आयओटी उपकरणे तर घरातील वायफायद्वारेच नियंत्रित केली जातात. हे वायफायही कुठल्याना कुठल्या टेलिकॉम कंपनीचेच उत्पादन असते.

(४) आयओटी क्लाऊड प्लॅटफॉर्म (सुमारे १०-१५ टक्के खर्च) –

डिव्हाइस सेन्सर्सनी विविध नेटवर्क वापरून मिळविलेल्या डेटाच्या विश्लेषणासाठी सॉफ्टवेअर प्रणालीची आवश्यकता असते. त्यांना ‘आयओटी प्लॅटफॉर्म’ म्हटले जाते. क्लाऊड यासाठी की, असे प्लॅटफॉर्म इंटरनेटद्वारा वापरता येतात आणि प्रत्यक्ष संगणक यंत्रात माहिती साठविण्याची आवश्यकता नसते. फक्त वेब ब्राऊजर आणि इंटरनेट जोडणी मात्र हवी.

(५) आयओटी अ‍ॅप्लिकेशन सव्‍‌र्हिसेस (सुमारे ३०-३५ टक्के खर्च)-

आयओटी सेन्सर्सनी मिळविलेला डेटा कंपनीच्या इतर डेटा-संचात मिळवावा लागतो. त्यासाठी आयटी सिस्टीम्सची जोडणी आणि पुन्हा उद्योगानुसार त्या त्या प्रकारचे आयओटी अ‍ॅप्लिकेशन निर्माण (उदा. कनेक्टेड-कार हे वाहन उद्योगासाठी, तर स्मार्ट-पॉवर हे ऊर्जा क्षेत्रासाठी) करावी लागतात. इथे साधारण आयओटी प्रकल्पाचे ‘औद्योगिकीकरण’ केले जाते आणि म्हणूनच हे जास्त खर्चीक आणि वेळखाऊ  काम आहे.

(६) आयओटी अ‍ॅनालिटिक्स व इनसाइट्स (सुमारे २०-२५ टक्के खर्च) –

इथे कृत्रिम बुद्धिमत्ता कामाला येते. मिळालेल्या आयओटी व इतर डेटा-संचातून डेटा अ‍ॅनालिटिक्स (विश्लेषण) सादरीकरण करून पुढे अ‍ॅक्शनेबल इनसाइट्स (शिफारसी) दिल्या जातात. हा असा टप्पा आहे, जिथे तुमची सर्जनशीलता आणि व्यावसायिक ज्ञान जास्तीत जास्त पणास लागते.

(७) आयओटी कमांड सेंटर (सुमारे ५-१० टक्के खर्च) –

आयओटी सॉफ्टवेअरने केलेले विश्लेषण व शिफारसी आणि एकंदर आयओटी प्रकल्प सुरळीत चाललाय की नाही, ते बघायला नियंत्रण-कक्ष सुरू ठेवावा लागतो. इथे बिगर-तांत्रिकी कर्मचारी जवळपास २४ तास काम करत असतात.

आयओटीचे विविध विकास टप्पे, सध्याची आव्हाने पुढील लेखात पाहू आणि त्यापुढील लेखात पाहू आयओटी टॉप-१० उदाहरणे : घरगुती, वैद्यकीय, ऊर्जा, वाहन-परिवहन, स्मार्ट-सिटी, अवजड उद्योग आणि अर्थातच वर्तमानात अधिक गरजेचे स्मार्ट-फार्मिग!

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2019 12:05 am

Web Title: internet of things 3
Next Stories
1 वस्तुजालाचा ‘सक्रिय’ संवाद!
2 ओळख झाली, पुढे काय?
3 देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी..
Just Now!
X