अपुऱ्या माहितीमुळे नोंद न झालेल्या मृतांचा तपशील उघड

पालघर : करोनाच्या दुसऱ्या लाटेत तांत्रिक अडचणी आणि अपुऱ्या माहितीमुळे नोंदवण्यात न आलेल्या मृत्यूंची माहिती  दोन दिवसांत निश्चित करण्याबाबत सूचना आरोग्य विभागाच्या सचिव यांनी  दिली होती. त्यावर कार्यवाही केली असता त्यामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये  १३५ नवे रुग्णांची भर पडली आहे.

पालघर जिल्ह्यत गेल्या वर्षीपासून आजवर २३५८ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी पहिल्या लाटेत ११९८ तर दुसऱ्या लाटेत ११६० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. यापैकी ६७२ रुग्णांचा मृत्यू ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण भागांतील करोना मृत्यूचे प्रमाण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रापेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागांत गेल्या २४ तासांत १३५ नवे करोना मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. हे मृत्यू तांत्रिक अडचणींमुळे नोंदविले गेले नव्हते.  या मृत्यूंमध्ये पालघर तालुक्यात १००, डहाणू  २० तर विक्रमगड १३ तर वाडा तालुका आणि वसई ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक मृत्यू  आहेत. यामुळे दुसऱ्या लाटेत जिल्ह्यचा सरासरी मृत्युदर १.७ टक्के इतका पोहोचला असून ग्रामीण भागातील मृत्युदराने १.७ वरून २.१ टक्क्य़ावर उसळी घेतली आहे.

करोनाच्या दुसरा लाटेदरम्यान जिल्ह्यत उपचाराची सोय उपलब्ध नसल्याने अनेक रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यबाहेर दाखल झाले होते. त्यांच्यापैकी मृत्यू झालेल्याची माहिती संकलित करणे, मृत्यू झालेल्यांच्या माहितीची खात्री करणे आदी कामे प्रलंबित होती. त्याचप्रमाणे काही रूग्णालयात नागरिकाला दिसणाऱ्या आजाराची लक्षणे किंवा एचआरसिटी अहवालाच्या आधारे रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. अशापैकी काही रुग्णांची प्रतिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी न केल्याने,  रुग्णांचा मृत्यू झाल्यास  संसर्गाच्या अहवालाशिवाय मृतांची माहिती  करोना पोर्टलवर अपलोड होत नसे. रुग्णालयात दाखल करताना अपूर्ण  किंवा चुकीच्या पत्त्याच्या आधारावर दाखल झालेल्या गंभीर रुग्णांचा मृत्युची माहितीची जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. मात्र इतर कामात व्यस्त राहिल्याने हे काम प्रलंबित राहिले. चाचणी अहवालात रुग्णांचे नाव व रुग्णालयात दाखल करते प्रसंगी नोंदविलेल्या नावात  किंवा आधारकार्डमधील नाव व पत्ता व रुग्णांच्या मृत्यू नोंदणीमधील नावामध्ये तफावत असल्याने देखील अनेक मृत्यू नोंदी कायम करण्याचे प्रलंबित राहिले होते. या सर्व कामांची  आरोग्य विभागाच्या सचिव यांनी तातडीने  समायोजन करण्याच्या सूचना दिल्यानंतर सर्व जिल्ह्यंनी या मृत्यूंची खातरजमा करुन त्याची नोंदणी केली.  पालघर जिल्ह्य़ातील नोंदणीत  ग्रामीण भागांतील  मृत्यूंची  नोंद अधिक असल्याचे आढळून आले, असे  आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ग्रामीण भागांत १३८ नवे रुग्ण

पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण भागांत गेल्या २४ तासांत १३८ नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी पालघरमध्ये ७५, विक्रमगडमधील २४, डहाणूमध्ये २३ तर वसईच्या ग्रामीण भागात १५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागांत सध्या १३२७ उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यापैकी पालघर तालुक्यात ६६४, डहाणू   ३१७,  वाडा तालुक्यात ९२ रुग्णांचा समावेश आहे. वसईच्या ग्रामीण भागांत २१८ रुग्णांचा समावेश आहे.