काही मच्छीमार पाकिस्तानच्या कैदेत?; जिल्हा प्रशासन अनभिज्ञ
नीरज राऊत/ नितीन बोंबाडे
पालघर : जिल्ह्यातील मासेमारीसाठी गुजरात राज्यात गेलेल्या ४२ पेक्षा अधिक मच्छीमार बेपत्ता आहेत. त्यापैकी काही पाकिस्तानच्या कैदेत असल्याचे म्हटले जात असून मच्छीमारांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. विशेष म्हणजे बेपत्ता मच्छीमारांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रच्या तुलनेत गुजरात राज्यातील पोरबंदर- वेरावळ भागात मोठय़ा प्रमाणात यांत्रिकीकरणाद्वारे मासेमारी करण्यात येत असून बोटींची संख्या व प्रत्येक बोटीवर लागणारे मनुष्यबळ पाहता खलाशांची मोठय़ा प्रमाणात येथे गरज भासते. जिल्ह्यातील मच्छीमारांकडून खलाशांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या काही पटीने अधिक मोबदला गुजरात राज्यात काम करणाऱ्या मच्छीमारांना मिळत असल्याने तलासरी, डहाणू, पालघर व विक्रमगड तालुक्यातील अनेक आदिवासी तरुण मासेमारीसाठी गुजरात राज्यात जात आहेत. ही मंडळी आठ ते दहा महिने ट्रॉलर व मोठय़ा बोटींवर वास्तव्य करत असतात. करोना संक्रमणाच्या काळात मासेमारी ठप्प झाल्यानंतर गुजरात राज्यातून सुमारे १५ ते १८ हजार खलाशी पालघर जिल्ह्यात आपल्या घरी परतले होते. हे खलाशी अनेकदा वेगवेगळय़ा बोटींवर काम करीत असल्याने त्यांच्या बोट मालकांचा तपशील स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतो. तसेच मत्स्य व्यवसाय विभाग, महसूल विभाग व पोलिसांकडे परराज्यात मासेमारीच्या कामासाठी गेलेल्या जिल्हावासीयांची नोंदणी करण्याची आजवर यंत्रणा विकसित झालेली नाही.
गुजरात राज्याच्या मासेमारी क्षेत्राच्या लगत पाकिस्तानी हद्द असल्याने अनेकदा सीमाभागाचे उल्लंघन केल्याच्या कारणामुळे तेथील मासेमारी बोटी पाकिस्तान सरकार ताब्यात घेऊन खलाशांना कैदेत ठेवत असतात. समुद्री अपघातांमध्ये काही प्रसंगी खलाशी बेपत्ता होण्याचे प्रकारदेखील घडल्याचे सांगण्यात येते. मात्र आपल्या कुटुंबीयांचा संपर्क होत नसला तरीही या संदर्भात दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न अशिक्षित व अल्पशिक्षित आदिवासी कुटुंबीयांना पडत आहे. दरम्यान, पालघरचे माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांनी त्यांच्या कार्यकाळात असे अनेक पाकिस्तानी कैदत असणाऱ्या खलाशांची सुटका केल्याची आठवण स्थानिक सांगत असून सध्या बेपत्ता मच्छीमारांचा प्रश्न दुर्लक्षित राहिल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
तक्रारी नसल्याचा प्रशासकीय दावा
जिल्ह्यातील बेपत्ता किंवा पाकिस्तानी कैदेत असलेल्या खलाशांच्या संख्येविषयी पालघर जिल्हा प्रशासन, मत्स्य व्यवसाय विभाग तसेच पोलिसांकडे विचारणा केली असता या संदर्भात आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या नोंदी किंवा तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात आले. तरीदेखील तलासरी तालुक्यातील २५, डहाणू तालुक्यातील १० व पालघर तालुक्यातील ७ खलाशी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
आमचा मुलगा बोटीवर कामाला गेला असताना तीन महिन्यांपासून पाकिस्तानच्या कैदेत सापडला आहे. सरकारने माझ्या मुलाची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत. – नवशा रावत्या, वाकी आंबात पाडा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 42 fishermen missing palghar gujarat some fishermen imprisoned pakistan district administration ignorant amy
First published on: 31-03-2022 at 02:19 IST