पालघर : पालघर जिल्ह्यातील युरिया विक्री करणाऱ्या १० वितरकांकडून एप्रिल ते जून महिन्यापर्यंत युरिया वितरणात अनियमितता आढळल्याने या वितरकांचे परवाने कृषी विभागाने रद्द केले आहेत. या प्रकरणात दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून याखेरीस इतर काही वितरकांकडे आढळलेल्या अनियमिततेबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात युरियाचा ३३६ मॅट्रिक टनाचा संरक्षित साठा विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील युरिया वापराचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळून आल्याने जिल्ह्यातील युरिया खताचे लेखापरीक्षण हाती घेण्यात आले होते. या प्रकरणात १० वितरकांविरुद्ध परवाना रद्द करण्याची कारवाई केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप नेरकर यांनी दिली आहे.

दरम्यान, डहाणूच्या कृषी अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडल्यानंतर संतोष पवार यांना जामीन मंजूर झाला आहे. डहाणू तालुक्यातील १० केंद्रांमध्ये संतोष पवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यापैकी सहा खत विक्री केंद्रांतर्फे सादर करण्यात आलेले म्हणणे ग्राह्य धरण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या चौकशीत नामंजूर केलेल्या लेखी म्हणण्याची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. खत वितरणातील अनियमिततेबाबत दाखल केलेल्या मंजूर प्रकरणाची देखील पुनर्तपासणी करण्यात येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. डहाणू तालुक्यात एका वितरकाकडे असणाऱ्या ५० टन युरिया साठय़ाच्या विक्रीवर बंदी करण्यात आली होती, मात्र जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात युरिया खताची कमी लक्षात घेऊन देखरेखाली ही विक्री सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३३६ मेट्रीक टन संरक्षित साठा खुला करण्याचे आदेश
जिल्ह्यात सध्या २२८ मेट्रिक टन युरिया साठा उपलब्ध असून जिल्ह्याने ठेवलेला ३३६ मेट्रिक टनाचा संरक्षित साठा शेतकऱ्यांच्या वापरासाठी खुला करण्याचे आदेश दिल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आगामी खरीप हंगामासाठी १७ हजार मेट्रिक टन युरियाची मागणी असून ही मागणी जिल्हाधिकारी यांच्या शिफारसपत्रानंतर पुढील आठवडय़ात संबंधित कंपनीकडे पाठवण्यात येईल, असेदेखील कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या युरियाचा कृत्रिम तुटवडा भासत असून चोरटय़ा मार्गाने उद्योगांना पुरवण्यात येणारा युरिया पकडण्यास शासकीय यंत्रणा अपयशी ठरत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.