पालघर : पालघर जिल्हा मुख्यालय ठिकाणी दापोली कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी व मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रालयातील दालनातील बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने महाविद्यालय उभारण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कृषी विषयक अभ्यास तसेच मत्स्य संशोधना संदर्भात देखील येथील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होणार आहे.
पालघरसह गडचिरोली मधील सोनगड तसेच नंदुरबार येथे कृषी विद्यालय उभारण्यासाठीच्या मागणीला तत्वतः मान्यता देण्यात आली होती. इतर दोन ठिकाणी जागेची उपलब्धता झाल्याने त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय सुरू झाली होती. कोकणामध्ये दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय व्यतिरिक्त पालघर व ठाणे जिल्ह्यात कृषी विषयक शिक्षण घेण्यासाठी संधी नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांना दापोलीत जावे लागत होते. या अनुषंगाने उत्तर कोकणात कृषी महाविद्यालय सुरू करावे यासाठी विविध लोकप्रतिनिधींमार्फत प्रयत्न सुरू होते.
आमदार मनीषा चौधरी यांनी सन २०२४ मध्ये या संदर्भात अशासकीय ठराव मांडला होता व या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू ठेवला होता. या मागणीच्या अनुषंगाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दालनात काल (मंगळवारी) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार मनीषा चौधरी, आमदार राजेंद्र गावित, निमेष सावे, ज्योती मेहेर, राजेंद्र मेहेर, अशोक अंबुरे मान्यवर उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने कृषी व मत्स्य विद्यापीठ स्थापन करणे या विषयावर सविस्तर चर्चा होऊन या प्रस्तावास मान्यता देण्याचे कबूल करून तसे आदेश कृषीमंत्री यांनी दिले. कृषी महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी १६ हेक्टर जागा तसेच मत्स्य व्यवसाय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आवश्यक पाच हेक्टर अशी एकंदर २१ हेक्टर जागेची उपलब्धता कोकण कृषी विद्यापीठाच्या कडून उपलब्ध होणार असल्याचे विद्यापीठाच्या कुलगुरू व इतर अधिकाऱ्यांनी या बैठकीत मान्य केल्याने पालघर मध्ये कृषी व मत्स्य व्यवसाय महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कृषी विभागाने या महाविद्यालयांना मान्यता दिल्याने निधीच्या उपलब्धतेसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असून या कामे जेएनपीए किंवा अन्य उद्योगांकडून सामाजिक दायित्व निधीमधून निधी उपलब्ध साठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत असे आमदार मनीषा चौधरी यांनी लोकसत्ता ला सांगितले.
जागेची उपलब्धता
कृषी महाविद्यालयासाठी ग्रामीण भागात ३० हेक्टर जागेची आवश्यकता असली तरी काही वर्षांपूर्वी डोंगरी व शहरी भागात १६ हेक्टर जागा या कामी पुरेशी आहे. कोकण कृषी विद्यापीठाची पालघर मध्ये एकंदर २५ हेक्टर जागा उपलब्ध झाल्याने या जागेचा कृषी व मत्स्य व्यवसाय महाविद्यालय उभारणीसाठी निर्णय झाला आहे. यामुळे गेल्या आठ वर्षांपासून पाठपुरावा सुरू असणारा प्रश्न मार्गी लागला आहे.
बैठकीतील इतर काही निर्णय
– पालघर जिल्ह्यातील चिकू पिक विमाबाबत असलेल्या समस्या – जिल्ह्यात ऑल वेदर स्टेशन प्रत्येक मंडळात कार्यरत करणे
– चिकू व मिरची यासाठी संशोधन केंद्र स्थापन करणे
– पालघर जिल्ह्यात खते व औषधे यांची गुणवत्ता तपासणीसाठी केंद्र उभे करणे
– अग्रिस्टेक संबंधित अडचणी अशा अनेक विषयांवर देखील मंत्री महोदयांनी तत्काळ विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले