asheri fort in palghar drunken tourists create mess at asheri fort zws 70 | Loksatta

आशेरी गडावर मद्यपी पर्यटकांचा धिंगाणा ; मद्यपींवर कठोर कारवाईसाठी वन विभाग, पोलिसांना साकडे

डहाणू वन विभाग व कासा, मनोर पोलीस प्रशासनाने त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

asheri fort in palghar
आशेरी गड

पालघर : वनदुर्ग प्रकारात इतिहास प्रसिद्ध असणाऱ्या पालघर तालुक्यातील खडकोना गावाजवळील आशेरी गडावर हौशी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यातील काही जण मद्यपान करून धिंगाणा घालतात. डहाणू वन विभाग व कासा, मनोर पोलीस प्रशासनाने त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

आशेरी गडावर येणाऱ्या पर्यटकांमुळे विविध प्रकारचा कचरा वाढला आहे. त्यात प्लास्टिक, विविध खाद्यपदार्थ्यांच्या पाकिटांचे वेष्ठन, मद्याच्या बाटल्या तसेच फेकून दिलेले जुने कपडेही आढळत आहेत. यामुळे गडावर आगी लागण्याच्या घटनाही घडत आहेत. त्याला पालघर, डहाणू वन विभागाची उदासीनता कारणीभूत ठरत आहे. पर्यटकांची तसेच त्यांच्या साहित्याची तपासणी करण्यासाठी गडाच्या पायथ्याशी केंद्र नाही.

गेल्या वर्षी पावसाळय़ात स्थानिक पोलीस प्रशासनाने आशेरी गडावर होणारी बेसुमार गर्दी आवरत मदत करत असलेल्या दुर्गमित्र संघटनेच्या प्रतिनिधींनाच अटक करून कारवाई केली. या वेळी गडावर मद्यपान करत धिंगाणा घालणारे पळून गेले होते. पंचक्रोशीतील तरुणांनी गडावरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली आहे. मात्र, शनिवार, रविवारी येणाऱ्या पर्यटकांनी या टाक्यांमधील पाण्यात यथेच्छ उडय़ा मारून पाणी दूषित केले आहे.

ग्रामपंचायत, पोलीस, वन विभागाने गडावर दारूबंदी, प्लास्टिक बंदी करावी. पर्यटकांसाठी नियम फलक, वनसंरक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती तरण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी येत आहे.

दुर्गमित्र संघटना विरोध करणार आशेरी गड विजय दिन ५ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. किल्ले वसई मोहीम परिवार, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, गडमाची ट्रेकर्स, मुंबईने त्यानिमित्ताने गडावर दुर्गसंवर्धन जनजागृती मोहिमेचे आयोजन केले आहे. गडावर दारू नेणाऱ्या, गडावर दारू पिणाऱ्या, कर्कश आवाजात गाणी लावून धिंगाणा घालणाऱ्या, तोफांवर बसून व उभे राहून छायाचित्रे टिपणाऱ्या, मुख्य पाणवठय़ावर अन्न, मांसाहार शिजवत कचरा करणाऱ्या हौशी पर्यटकांना दुर्गमित्र संघटना विरोध करणार आहेत.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 13:13 IST
Next Story
कासामधील ग्रामस्थांना नैसर्गिक गरम पाण्याचा लाभ; २० वर्षांपासून कूपनलिकेद्वारे २४ तास गरम पाणी