पालघर : मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बांबूचा उपयोग करून वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे तयार केलेले अपघातासाठी संरक्षण कुंपण अर्थात क्रॅश बॅरियरची उभारणी करण्यास आरंभ केला असून डहाणू ते तलासरी दरम्यान चार किलोमीटर वरील त्याची उभारणीचे काम पूर्ण झाली आहे. अपघातादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असणाऱ्या पर्यावरण स्नेही बांबूचा वापर केल्याने तांत्रिक, आर्थिक तसेच सामाजिक लाभ होणार आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची उभारणी व त्यानंतर सहा पदरीकरण विस्तार करताना लगतच्या जमिनीपेक्षा अधिकतर ठिकाणी महामार्ग उंचीवर आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतर अथवा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास वाहन लगतच्या खोलगट भागात कोसळून अपघात घडण्याचे किंवा अपघाताची तीव्रता वाढण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपघात प्रवणक्षेत्र आहे तेथे धातूने बनवलेले क्रॅश बॅरियर काही ठिकाणी बसवलेले आहेत. मात्र या बॅरियरची होणारी चोरी, वातावरणाचा होणारा परिणाम व इतर तांत्रिक बाबी पाहून धातू ऐवजी बांबूचा या संरक्षण कुंपणासाठी वापर करण्याचा प्रयोग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आला होता.
यापूर्वी सुमारे एक किलोमीटर लांबीच्या क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर बांबूद्वारे तयार करण्यात आलेल्या क्रॅश बॅरियरची कामगिरी समाधानकारक असल्याने डहाणू तालुक्यातील चारोटी पासून आच्छाड पर्यंत सुमारे १० किलोमीटर पट्ट्यात बांबूचा उपयोग या संरक्षण कुंपणासाठी केला जाणार आहे. पर्यावरणीय लाभांसोबत आर्थिक लाभ देखील या प्रयोगामुळे होणार आहेत. धातुने बनवलेला बीम क्रॅश बॅरियर उभारणीसाठी सुमारे ४००० रुपये प्रति लिटर इतका खर्च येत असताना बांबूद्वारे अशाच प्रकारची व तितक्याच मजबुतीचे क्रॅश बॅरियर उभारताना प्रति मीटर किमान एक हजार रुपयांची बचत होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली. बांबूचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या क्रॅश बॅरियरला विशेष बांधकाम करून महामार्गाची सीमा दर्शविणारा असल्याने ते वाहन चालकांना उपयुक्त ठरणार आहे.
संपूर्ण बांबूचा वापर
क्रॅश बॅरियर ही उभारणी करताना या रचनेतील बीम, स्पेसर व पोस्ट हे संपूर्णपणे बांबूद्वारे तयार केले असून याची मजबुती धातू न बनवलेल्या क्रॅश बॅरियर इतकीच असल्याची माहिती देण्यात आली. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना बांबूच्या व्यावसायिक व इतर उत्पादनांसाठी होणारा उपयोग हा लागवड करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आशादायी व पथदर्शक ठरणार आहे.
बांबूच्या वापराने तयार केलेल्या क्रॅश बॅरिअरची कामगिरी समाधानकारक असल्याने त्याचा वापर अधिक प्रमाणात करण्याचे योजिले आहे. पहिल्या टप्प्यात चारोटी ते आछाड पर्यंत बांबूने बनवलेले क्रॅश बॅरियर उभारण्यात येत असून आगामी काळात त्याची व्याप्ती वाढवण्याचा विचार आहे.
सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
तांत्रिक फायदे:
१. जास्त वाकण्याची क्षमता
२. चांगली लवचिकता
३. दीर्घ आयुष्य
४. उच्च पुनर्वापर मूल्य
५. सुधारित सुरक्षितता (तीव्रता निर्देशांक)
६. कमी प्रवेग तीव्रता निर्देशांक (ASI)
७. कमी सैद्धांतिक डोके प्रभाव वेग (THIV)
८. चांगले काम करण्याची रुंदी
९. जवळच्या पोस्ट स्पेसिंग
१०. जास्त बीम उंची
सामाजिक-आर्थिक फायदे:
१. वाढलेले रोजगार:
○ स्टीलच्या कमी कामगार गरजांच्या तुलनेत उत्पादनात जास्त कामगार/मनुष्यबळ आवश्यक आहे.
२. ग्रामीण विकासाला चालना देते:
○ स्टीलचा नगण्य ग्रामीण प्रभाव विपरीत, शेतकरी, कामगार आणि ग्रामीण उद्योजकांना सहभागी करून घेते.
३. ग्रामीण अर्थव्यवस्थेला समर्थन देते:
○ विकेंद्रित उत्पादन स्टीलच्या केंद्रीकृत उत्पादनाप्रमाणे, गावांमध्ये प्राथमिक प्रक्रिया करण्यास परवानगी देते.
४. शाश्वत कच्चा माल:
○ शेती-आधारित (बांबू) विरुद्ध स्टीलचा खाण-आधारित, नूतनीकरणीय कच्चा
माल.
५. कमी ऊर्जेचा वापर:
○ स्टीलच्या खूप जास्त ऊर्जेच्या वापराच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी ऊर्जा आवश्यक आहे.
६. नूतनीकरणीय संसाधन:
○ बांबू शाश्वत आणि पुनरुत्पादनक्षम आहे, स्टीलच्या विपरीत जे नैसर्गिकरित्या पुनरुत्पादित केले जाऊ शकत नाही.
७. पर्यावरणपूरक उत्पादन:
○ बांबू लागवडीदरम्यान प्रति टन ०.८५ ते २.२ टन कार्बन शोषून घेते, तर पोलाद प्रति टन १.८ ते ३ टन उत्सर्जित करते.
८. पर्यावरणीय फायदे:
○ पर्यावरणाची पुनर्बांधणी करण्यास मदत करते, तर स्टील पर्यावरणपूरक मानले जाते
९. पुनरुत्पादनाची सोय:
○ बांबू गवत जिथे वाढेल तिथे कुठेही वाढू शकतो, ज्यामुळे त्याची लागवड करणे सोपे होते.
महामार्ग लगतचे राडारोडा उचलण्याचे काम सुरू
पालघर: पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग लगत असलेला कचरा, राडारोडा व प्लास्टिकचे पदार्थ उचलण्यासाठी सक्त सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या कडेला पडलेल्या बांधकाम तोडल्यानंतरचा राडारोडा व इतर साहित्य उचलण्याचे काम हाती घेतले आहे. याच बरोबरीने पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा या दृष्टीने देखील उपाययोजना हाती घेण्यात आले असून या उपक्रमामुळे महामार्ग लगतचा भाग स्वच्छ दिसण्यास लाभदायक ठरेल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी आशा व्यक्त केली. नागरिकांनी तसेच बांधकाम व्यवसाय करणाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या लगत पुन्हा अशा वस्तू टाकू नयेत असे आवाहन केले आहे.