पालघर : पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या रक्तपेढीचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आवश्यकतेनुसार विनामूल्य रक्तपुरवठा होणार असून अपघात, बालकांचे गंभीर आजारपण व गुंतागुंतीच्या प्रसूती दरम्यान रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
पालघर ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक कै. डॉ. दिनकर गावित यांच्या पुढाकार व प्रयत्नाने नोव्हेंबर २०१९ मध्ये रक्तपेढीसाठी मंजुरी मिळाली होती. त्यांच्या व डॉ. संजय बोदाडे यांच्या कारकिर्दीत या रक्तपेढीच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दोन टप्प्यांमध्ये सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सुमारे सहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या रक्तपेढीच्या उभारणीनंतर विविध उपकरणांसाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट व बीपीसीएल या तेल कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीमधून सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.
या रक्तपेढीला नोव्हेंबर २०२४ मध्ये अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून आराखडा मंजुरी करण्यात आल्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये याच कार्यालयाच्या दिल्ली कार्यालयातून रक्तपेढीला परवाना प्राप्त झाला. या रक्तपेढीने काम २९ जानेवारी २०२५ पासून सुरू केले असले तरीही पालघर ग्रामीण रुग्णालयातील या रक्तपेढीचे विधिवत उद्घाटन प्रलंबित राहिले होते. पालकमंत्री गणेश नाईक, आमदार राजेंद्र गावित, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे रोटरी क्लबच्या रक्तपेढी प्रकल्पाचे सल्लागार डॉ. बाळकृष्ण इनामदार तसेच जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत आज या रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तपेढीच्या कार्यरत होण्यासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात समन्वयक म्हणून काम करणाऱ्या सायली साठे यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला.
६००- ८०० रक्त बाटल्या (युनिट) साठवणूक करण्याची क्षमता असणाऱ्या या रक्तपेढीमुळे पालघर जिल्ह्यातील रक्तसाठा करणाऱ्या शासकीय चार केंद्रांना तसेच अशासकीय ११ केंद्रांना पाठबळ मिळणार आहे. या रक्तपेढीसह जिल्ह्यात तीन शासकीय तर आठ अशासकीय रक्तपेढ्या कार्यरत असून रक्तपेढी प्रभावीपणे कार्यरत राहण्यासाठी ठीकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे व त्यामधील लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवाय विविध रक्तपेढ्यांशी संलग्नता राहिल्याने उपलब्ध रक्ताची देवाणघेवाण (पोटॅबिलिटी) शक्य होणार असून या रक्तपेढीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी दिली.
अत्याधुनिक व सुसज्जता
- पालघर येथे कार्यरत झालेल्या रक्तपेढीत समुपदेशन कक्ष, वैद्यकीय तपासणी कक्ष, रक्त दात्याची माहिती व चाचण्या करण्याचा कक्ष, रक्तदान कक्ष, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी कक्ष, घटक साठा करण्यासाठी कक्ष, स्टरीलायझेशन, निर्जंतुकीकरण कक्ष, गुणवत्ता नियंत्रण कक्ष व घटक विलगीकरण कक्षाचा समावेश आहे.
- जेलकार्ड या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे रक्त नमुन्यांचे अचूक व त्वरित क्रॉस मॅचिंग करण्यासाठी पालघर मधील रक्तपेढीत सुविधा असून आतापर्यंत पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील रक्तपेढीतून २५२ रुग्णांना रक्तपुरवठा झाला आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या रक्तपेढी अंतर्गत चार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या अत्याधुनिक रक्तपेढीमुळे रुग्णांना विनामूल्य रक्तपुरवठा सहजगत उपलब्ध होणार आहे.