पालघर तालुक्यातील विविध ठिकाणांहून आठ महिन्यांत ५०० गुरांची चोरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : पालघर तालुक्यातील माहीम, रेवाळे व केळवे रोड परिसरातील गेल्या सात- आठ महिन्यात किमान ४०० ते ५०० गुरांची चोरी झाली आहे.  गुरे चोरणाऱ्या टोळीला अटकाव करण्यात  पोलिसांना अपयश येत असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.

करोना संक्रमणाच्या काळापासून शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे त्यांच्या शेतजमिनी व बागायतीच्या ठिकाणी वावर कमी झाला होता. तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अनके शेतकऱ्यानी आपली गुरे मोकळी सोडली होती. सफाळे, केळवे रोड, माकुणसार, आगरवाडी, केळवे, दांडाखाडी, माहीम, शिरगाव, पालघर या भागात अनेक ठिकाणी दुग्ध व्यवसाय केला जातो.  गुरे चोरीच्या प्रकारामुळे दुग्ध व्यावसायिकांनीही चिंता व्यक्त केली आहे. गुरे चोरी होत असली तरी त्याची तक्रार करणाऱ्यांची संख्या कमी आहे. ते पोलिसांच्या पथ्यावर पडत आहे.

या गुर चोरीच्या प्रकारात भर घालण्यासाठी गेल्या पंधरवडय़ात माहीम- रेवाळे परिसरातील १०-१२ गुरे गोठय़ांमधून पळवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे केळवे रोड येथून देखील या कालावधीत पाच- सात गुरे पाळविण्यात आली. २९ नोव्हेंबर रोजी माहीम येथून चार गुरे पळविण्यात आली असून त्याच दिवशी चरायला गेलेल्या दोन गुरांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडल्याचे आढळून आले होते.

अंशुमन ट्रस्टच्या पूर्वी ताब्यात असणाऱ्या गवती जागेत पूर्वी किमान ५०० ते ७०० गुरे चरताना सहज दिसत होती.  याची सध्या संख्या ५० पेक्षा कमी झाली असून गुरे चोरणाऱ्या टोळी सक्रिय असल्याने हा प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येते.

तपासणी नाके निष्क्रिय

माहीम केळवे भागातून बाहेर पडण्यासाठी तीन -चार  महत्त्वपूर्ण तपासणी नाके असून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असतो. यापैकी काही ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्थेला चकवा   देऊन गुरे चोरणारी टोळी पोलिसांच्या नजर चुकविण्यास यशस्वी ठरत आहे.

शेतकऱ्यांचे रात्रीचे जागरण

गोठय़ात बांधून ठेवलेली गुरे पाठविण्यास आरंभ झाल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. अनेक स्थानिकांनी रात्रीचा जागता पहारा ठेवून चोरटय़ांवर पाळत ठेवत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cattle gang active police thief ysh
First published on: 09-12-2021 at 01:02 IST