वाडा : “भिवंडी”- वाडा – मनोर” या महामार्गावर सध्या धुळीचे अक्षरशः साम्राज्य पसरले असून या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक, वाहनचालक व प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. डागडुजी अभावी रस्ता उखडलेला असून वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट उडत आहेत.
भिवंडी”- वाडा – मनोर” या महामार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम “ईगल इन्फ्रास्ट्रक्चर” या कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे. मात्र कंत्राटदाराने जुना रस्ता सुस्थितीत करण्याची तरतूद नवीन निविदेमध्ये (करार) समाविष्ट असताना ते न केल्याने या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे- मोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाळ्यात पाणी साचल्यास चिखलाचा त्रास व वाहने आपटत आहेत. पाऊस थांबताच धूळ ही दुहेरी समस्या बनली आहे. धुळीमुळे दुचाकीस्वारांचे विशेषतः हाल होत असून, हेल्मेट घातले तरीही डोळे, नाका- तोंडात धूळ जात असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.
शिवाय या मार्गावरून शालेय वाहने, एसटी बस तसेच मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. धुळीमुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहन चालकांमध्ये याबाबत संतापाची भावना निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष?
गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले असून त्याचे पडसाद आता नागरिकांच्या आरोग्यावर आणि प्रवासाच्या सुरक्षिततेवर उमटत आहेत.
नागरिकांची मागणी:
- तात्काळ कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण करावे.
- धूळ नियंत्रणासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करावी.
- अपघात टाळण्यासाठी खड्ड्यांवर तात्पुरती उपाययोजना करावी.
- काँक्रिटीकरण केलेला शिरीष फाटा ते वाडा आणि वडवली ते डाकिवली फाटा हे चार चार किमी अंतराचे दोन्ही रस्ते वाहतुकीस केले असुन या मार्गावर ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक फलक, बॅरिगेट्स अशा अद्याप कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक धोक्यात आली आहे. यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठाणे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “लवकरच या मार्गाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. व योग्य त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातील असे सांगितले.
मात्र, कंत्राटदार व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा संयम मात्र आता सुटू लागला आहे.