शहरबात : खासगी वैद्यकीय व्यवस्थेवर रुग्णांची मदार

करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजल्याने सर्वसाधारण नागरिकांमध्ये आजाराविषयी भीती निर्माण झाली होती.

नीरज राऊत

करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजल्याने सर्वसाधारण नागरिकांमध्ये आजाराविषयी भीती निर्माण झाली होती. कालांतराने परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर नव्या वर्षांत तिसऱ्या लाटेने अचानक उसळी घेतली.  त्यात नागरिक तसेच शासकीय यंत्रणा बेसावध राहिल्याने रुग्णवाढ होत राहिली. अधिकतर रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता कमी आहे.  तसेच या वेळी मृत्युदर नगण्य असल्याचेही दिसून आले आहे. सद्य:स्थितीत बाधित रुग्णांणार उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणा सुसज्ज नसल्याने करोना रुग्णांना खासगी वैद्याकीय व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. मे २०२१ नंतर करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तिसऱ्या लाटेची मुंबई, ठाणे व उपनगरांमध्ये चाहूल लागल्यानंतर  ओमायक्रॉन या उत्परिवर्तित  विषाणूने डोके वर काढले. या आजाराची तीव्रता कमी आहे. तरीही सर्दी, खोकला, अंगदुखी व कमी तीव्रतेचा ताप अशी सौम्य लक्षणे दिसून येत असली तरी नागरिकांमध्ये त्याचे गांभीर्य  नाही.

दुसऱ्या करोना लाटेदरम्यान जिल्ह्यात दररोज अधिकतम १७०० रुग्णवाढ तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या  १८  हजारांपर्यंत  मर्यादित राहिली होती. या डिसेंबरअखेरीस ३०० उपचाराधीन रुग्ण असणाऱ्या पालघर जिल्ह्यात पंधरा दिवसांत अधिकृत उपचाराधीन रुग्णसंख्या ११ हजारांचा आकडा ओलांडला आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात झालेला पाऊस व अचानक आलेल्या थंडीच्या लाटेमुळे अनेकांना विषाणूजन्य सर्दी, खोकला आजाराचा त्रास झाला. त्यातच ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी आजाराच्या संक्रमणाकडे सर्वसामान्यांकडून सर्दी, खोकला म्हणूनच पाहिले जात आहे. जिल्ह्याचा रुग्णवाढ दर २५ टक्क्यांच्या जवळपास कायम राहिला असला तरी प्रत्यक्षात आजारी पडणाऱ्या नागरिकांची संख्या त्यापेक्षा काही पटीने अधिक आहे.

तिसऱ्या लाटेदरम्यान सौम्य लक्षणे दिसून येत असल्याने तसेच मृत्युदर अत्यल्प असल्याने नागरिकांनी तिसऱ्या लाटेकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहेत. अनेकजण तपासणी करणे किंवा उपचार घेण्याचे टाळत असून सर्वसामान्य आजार झाल्याप्रमाणे बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. मुखपट्टय़ांचा वापर तसेच गर्दी टाळण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे शहरी भागात तसेच गाव-पाडय़ात अशा अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात आजाराने शिरकाव केला आहे. शासकीय तपासणी व उपचारासाठी व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असताना शासकीय व्यवस्थेत करोना तपासणी करून घेण्याऐवजी सध्या बाजारात मिळणाऱ्या स्वयंतपासणी संच किंवा खासगी व्यवस्थेकडून तपासणी करून घेण्याचे नागरिक पसंत करीत आहेत. अनेक ठिकाणी खासगी डॉक्टर रुग्णाची लक्षणे पाहूनच तपासणी न करताच करोनाचे उपचार सुरू करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची नावे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध होत नसल्याने व गृह विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण ठेवण्याची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही.  यामुळे शासकीय आकडेवारी फसवी ठरत असून प्रत्यक्ष रुग्णसंख्या काही पटीने अधिक आहे.

गरोदर माता, बालके व लहान मुलांमध्ये करोनाचा मोठय़ा प्रमाणात प्रसार झाला असून सर्वसामान्य नागरिक आपल्याला करोना झाल्याचे मान्यच करीत नाहीत, अशी परिस्थिती आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये आजाराची तीव्रता तुलनात्मक सौम्य असल्याने तिसऱ्या लाटेबाबतचे गांभीर्य अजूनही समाजापर्यंत पोहोचलेले नाही. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी व विशेषत: आदिवासी व दुर्गम भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अजूनही कमी असून त्या ठिकाणी आजाराचा शिरकाव झाल्यास काही रुग्णांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान आढळून आलेल्या विषाणूने प्रभावित रुग्ण अजूनही काही प्रमाणात आढळून येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक करोना काळजी केंद्राची उभारणी करण्यात आली असली तरीही त्या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यंत मर्यादित राहिली आहे.

खासगी डॉक्टरांकडून सध्या यशस्वी उपचार होत असले तरीही दुसऱ्याला लाटेदरम्यानचा विषाणू काही प्रमाणात प्रभावी आहे. तिसऱ्या लाटेमध्ये विषाणूचे उत्तपरिवर्तन झाल्यास पुन्हा नव्याने गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास रुग्णांचे गंभीर होण्याचे प्रमाण अचानकपणे वाढण्याची शक्यता अजूनही कायम आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी सतर्क राहणे तसेच शासकीय यंत्रणेशी समन्वय साधणे गरजेचे  आहे. शिवाय तपासणी केल्याशिवाय औषधोपचार सुरू करण्याची पद्धत घातक असून खासगी डॉक्टरांपर्यंत प्रतिजन चाचणीचे संच व तपासणी करण्याची व्यवस्था उभारणी करण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने गर्भवती महिला व लहान मुलांमध्ये आजाराचा संसर्ग वाढेल ही शक्यता पाहता प्राणवायू व्यवस्था व बालरुग्णांसाठी उपचार केंद्रे उभारली होती. सध्या करोना रुग्णांना दाखल करण्याची आवश्यकता भासत नसली तरीही शासकीय व्यवस्थेने सतर्क राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय अधिकारी, खासगी सेवेतील डॉक्टरांना या आजाराची लागण झाल्याचे दिसून आले असून शासकीय आरोग्य यंत्रणेतील मर्यादा पुन्हा दिसून आल्या आहेत. शासनाने तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेल्या तयारीच्या तुलनेत विषाणू सौम्य असल्याने सध्या परिस्थिती निभावली जात आहे. विषाणूचा प्रसार नियंत्रित राहण्यासाठी तपासणीचे प्रमाण वाढवणे तसेच सर्वसामान्यांमध्ये आजाराविषयी सतर्कता व जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: City patients rely private medical care ysh

Next Story
कचराभूमीच्या दुर्गंधीने हतबल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी