डहाणू : डहाणू तालुक्यातील वाढवणं परिसरातील समुद्रात मासेमारी करत असताना डहाणू खाडी आणि सातपाटी येथील मच्छीमारांच्या जाळ्याला लाखो रुपये किमतीचे घोळ मासे लागले आहेत. शनिवार २३ मार्च रोजी तीन मासेमारांच्या जाळ्याला साधारण २०० घोळ मासे लागले असून सोमवारी देखील त्याच ठिकाणी तीन ते चार मच्छीमारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात घोळ मासे लागले आहेत.

घोळ माश्याच्या पोटातील पिशवीला ( बोत ) बाजारात मोठी किंमत मिळत असून नर आणि मादी माश्याच्या पिशव्यांना वेगवेगळा भाव मिळतो. शिवाय माश्याच्या मांसाला देखील ५०० ते ६०० रुपये किलो इतका दर मिळतो. ऐन होळीच्या सणावर मच्छीमारांच्या जाळ्याला घोळ लागल्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या खोल समुद्रातील मासेमारी बंद असून समुद्रात मात्र काही अंतरावर मासेमारी केली जात आहे. घोळ प्रजातीचे मासे समुद्रात एका गटातच फिरत असून मच्छिमारांच्या जाळ्याला लागल्याने मच्छिमारांना चांगला धनलाभ मिळाला आहे.

हेही वाचा…पालघर मतदारसंघ शिंदेंच्या वाट्याला जाण्याची शक्यता, राजेंद्र गावित यांच्या नावाला वसई भाजपचाही विरोध

डहाणू तालुक्यातील समुद्रात घोळ मासा मिळण्याचे प्रमाण कमी आहे. गेल्या काही वर्षात घोळ मासा गळाला लागण्याचे प्रमाण मोजके आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मच्छिमारांना वाढवणं हद्दीतील समुद्रात मोठ्या प्रमाणात घोळ मासे मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सातपाटी येथील मच्छिमाराला ११३, डहाणू खाडी येथील मच्छिमारांना अनुक्रमे ८८, १४, ६२ आणि ४३ घोळ मासे मिळाले आहेत. या माश्याच्या पोटातील पिशवी आणि मांसाच्या विक्रीतून मच्छिमारांना मोठा नफा मिळत आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांच्याकडे अचूक माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ऑईल वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग

गेल्या अनेक दिवसांपासून मच्छिमारांना समुद्रात योग्य प्रमाणात मासे मिळत नाही. त्यामुळे मच्छीमार निरंतर मासेमारी करत नसून हंगामी मासेमारी करतात. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर खलाशी सण साजरा करण्यासाठी आपापल्या घरी जात असल्यामुळे बहुतांश बोटी किनाऱ्याला लागल्या असून काही मोजक्या बोट मालकांनी समुद्रात मासेमारी साठी बोटी उतरवल्या होत्या. त्यातच मच्छीमारांच्या जाळ्याला घोळ मासे लागले असून त्यांना मोठे यश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.