वसई : पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे (शिंदे गट) जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता भाजप पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाला विरोध वाढला आहे. पालघर पाठोपाठ वसई भाजपानेही गावित यांना विरोध केला आहे. गावित यांच्याविरोधात नाराजी असून त्यांना उमेदवारी दिल्यास विरोधात मतदान होण्याची भीती भाजपाने व्यक्त केली आहे. याबाबत वसई शहर मंडळ अध्यक्षाने प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून आपला विरोध दर्शवला आहे.

महायुतीमध्ये ज्या जागांमध्ये मतभेद आहेत त्यापैकी पालघर मतदारसंघ एक आहे. पुर्वीचा उत्तर मुंबई आणि नंतर पालघर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला होता. त्यामुळे भाजपाचा या मतदार संघावर पूर्वीपासून दावा आहे. मात्र विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेचे (शिंदे गट) असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेवर दावा सांगितला आहे. जागा वाटपात पालघर मतदारसंघ हा शिवसेनेकडे जाणार असल्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून गावित यांना उमेदवारी मिळणार आहे.

हेही वाचा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ऑईल वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग

पालघर आपल्या वाटेला येणार नसल्याचे दिसू लागल्याने भाजपाने आता राजेंद्र गावित यांना विरोध करण्याची मोहीम सुरू केली आहे. पालघर मधील भाजपाने पत्रकार परिषद घेऊन गावित यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. आता वसई भाजपानेही पत्र लिहून गावितांना विरोध केला आहे. वसई मंडळ शहर अध्यक्ष महेश सरवणकर यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना पत्र लिहिले आहे. गावित हे अकार्यक्षम खासदार आहे. मतदारसंघात ते फिरकत नाही. त्यांच्या विरोधात स्थानिकांपासून मच्छिमार, शेतकरी, कामागार प्रचंड नाराज आहे. या नाराजीमुळे भाजपाला अनुकूल असेलली मते विरोधकांना जातील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : अनाकलनीय हत्येचा पालघर पोलिसांकडून उलगडा; लोणावळा येथे फिरायला नेतो सांगून मोखाडा येथे केली होती हत्या

दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. नंतर २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि धनुष्यबाण चिन्हावर जिंकून आले होते. आता ते शिंदे गटात गेले आहेत.