डहाणू : तलासरी पोलिसांना जबरी चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्यात फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात यश आलं आहे. समीर महादेव जाधव असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला १८ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० एप्रिल २०२५ रोजी संदीप पारधी यांच्यासोबत जबरी चोरीची घटना घडली होती. उपलाट-कलबटपाडा येथे तीन अज्ञात आरोपींनी पारधी यांच्या गाडीसमोर दुचाकी आडवी लावून त्यांना जबरदस्तीने त्यांच्याच कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लुटून त्यांना कल्याण बायपास येथे सोडून कारसह पसार झाले होते.

या प्रकरणी २२ एप्रिल २०२५ रोजी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ५ मे २०२५ रोजी विशाल दत्तात्रय तांदळे या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून चोरीला गेलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५,०५,३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या गुन्ह्यात समीर महादेव जाधव हा घटनेपासून सुमारे दोन महिन्यांपासून फरार होता. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. १७ जुलै २०२५ रोजी त्याला मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथून ताब्यात घेऊन १८ जुलै २०२५ रोजी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड, उपनिरीक्षक अमोल चिंधे, पोलीस नाईक महेश बोरसा आणि पोलीस अंमलदार योगेश मुंढे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. याप्रकरणी पुढील तपास तलासरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल चिंधे करत आहेत.