पालघर: पालघर तालुक्यातील दहिसर तर्फे मनोर आयुर्वेद दवाखाना इमारत जीर्ण झाली असून अखेरची घटका मोजत आहे. दुरवस्थेत सापडलेल्या इमारतीत दररोज रुग्णांवर उपचार केले जात असल्याने डॉक्टर,कर्मचारी यांच्यासह रुग्णांच्या जीवाला धोका उद्भवला आहे. मनोर आयुर्वेद दवाखानाद्वारे संपूर्ण गाव उपचार घेत आहे. दररोज अनेक रुग्ण या इमारतीत ये-जा करत असतात. स्वातंत्र्य काळात बांधलेल्या इमारतीची जीर्णावस्था झाल्यानंतर अनेक वेळा डागडुजी केली. इमारत खूप जुनी असल्याने वापरण्यालायक नसल्याचे सांगितले जाते. नागरिकांची आरोग्यव्यवस्था व सुविधा लक्षात घेता येथे हा दवाखाना कार्यरत आहे. इमारतीच्या पोट माळय़ाच्या फळय़ा कुजलेल्या आहेत. तर फरशीवर ओलावा तयार होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिंती व छप्पर हवे तितके मजबूत नसल्याचे सांगितले जाते. फरशांच्या ओलाव्यामुळे दवाखान्यात कायम स्वरूपी दमट वातावरण तयार होत आहे. रुग्ण तपासणीचे टेबल, खाटा, लोखंडी फर्निचर गंजले आहे. लाकडी कपाटे आदी मोडकळीस आहेत. त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली आहे. इमारत कोसळून अपघाताची शक्यता लक्षात घेता त्याच्या दुरुस्तीसाठी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. या दवाखान्यात दररोज रुग्णांची वर्दळ असते. बाह्य व अंतर्गत इमारत मोडकळीस आल्याने आरोग्य अधिकारी,कर्मचारी,रुग्ण यांना धोका उदभवला आहे. दवाखान्याची जीर्ण इमारत पाडून नवीन इमारत बांधकाम करण्याची मागणी पुढे येत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous manor ayurveda dispensary building ysh
First published on: 22-02-2022 at 01:43 IST