सचिन पाटील
बोईसर जवळील शिगाव खुताड येथे जंगली प्राण्यांपासून संरक्षणसाठी लावलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.बोईसर जवळील शिगाव खुताड येथे असलेल्या मिरचीच्या वाडीमध्ये एक परप्रांतीय कुटुंब काम करत होते. त्यांनी शेतीचे रानडुकरापासून संरक्षण व्हावे यासाठी विजेची तार लावली होती.
आज संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मुलगा ओमप्रकाश कन्हैया सहानी आणि त्याला वाचवायला गेलेल्या त्याची आई ललिता देवी कन्हैया सहानी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बोईसर घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी पंचनामा व अधिक चौकशी करीत आहेत.
हेही वाचा >>>वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
रानडुकरांचा उपद्रव
पालघर जिल्ह्यात बागायती शेतीमध्ये रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत आहे. रानडुकरांच्या उपद्रवामुळे बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पिकांच्या संरक्षणासाठी काही शेतकरी कुंपणाला बेकायदा विद्युत प्रवाह जोडणी लावण्याचे प्रकार करत असतात. पालघर जवळील नंडोरे येथे ऑक्टोबर २०२३ मध्ये अशाच एका घटनेत विजेच्या तारेला स्पर्श होऊन दोघा तरुणांचा दुर्दैवी बळी गेला होता.