पालघर : पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाच्या बनावट लेटरहेडद्वारे मोखाडा तालुक्यात १० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळविल्या प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य आणि जव्हार अर्बन बँकेचे चेअरमन हबीब शेख यांना जव्हार पोलिसांनी अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे रस्तादुरुस्तीची काम परस्पर सादर करून शासनाच्या फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर आहे.
जव्हार व मोखाडा तालुक्यांमधून जव्हार- मोखाडा- त्र्यंबकेश्वर आणि मोखाडा- खोडाळा- विहिगाव असे दोन प्रमुख मार्ग असून या मार्गावर काही वर्षांत किमान ४०० ते ५०० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. अशा परिस्थितीत हबीब शेख यांनी खासदारांचे लेटरहेड छापून मोखाडा- खोडाळा- विहिगाव या राज्य मार्ग ७८ वर विविध भागांत कामे करण्यासाठी १० कोटी रुपये किमतीच्या कामांचे प्रस्ताव मोखाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात सादर केले होते. या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातून पडताळणी करून ११ जूनला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालय सादर करण्यात आला होता.
बोगस कागदपत्रांच्या आधारे ४० कोटींची कामे..
जव्हार नगर परिषद, जव्हार आणि मोखाडा तालुक्यात पर्यटन व रस्त्यांच्या कामांसाठी बनावट तांत्रिक मान्यतेच्या आधारे किमान ४० कोटी रुपयांची कामे झाली असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणी तत्कालीन साहाय्यक जिल्हाधिकारी यांनी २८ कोटी रुपयांच्या गैरप्रकारांचा अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या अनुषंगाने तक्रार दाखल झाल्यास कारवाई करू, असे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.