अधिकारी, वाहतूकदारांचे उखळ पांढरे; भात वाहतुकीवर लाखो रुपयांचा खर्च
रमेश पाटील
वाडा : गेल्या खरीप हंगामात येथील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाताची खरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून करण्यात आली आहे. तसेच, भिवंडी तालुक्यातील शहरी भागात शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी बाजार समिती (मार्केटिंग फेडरेशन) च्या माध्यमातून झाली आहे. या खरेदी केलेल्या भाताची वाहतूक व भरडाईच्या माध्यमातून संबंधित विभागांचे अधिकारी व वाहतूकदार ठेकेदार यांनी चांगलेच उखळ पांढरे केल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत.
भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा येथे आधारभूत योजनेअंतर्गत बाजार समितीमार्फत या परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल भाताची खरेदी केली आहे. आता या भाताची भरडाई स्थानिक भात गिरणी धारकांच्या माध्यमातून होणे गरजेचे असताना येथील अधिकाऱ्यांनी हे हजारो मेट्रिक टन भात वाहतुकीवर लाखो रुपये खर्च करून परजिल्ह्यात पाठण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (३ सप्टेंबर) रोजी येथील काही जागृत नागरिकांनी एकत्र येऊन येथील भात भरडाईसाठी सांगली जिल्ह्यात नेत असताना रंगेहाथ पकडले आणि हा प्रकार उघडकीस आला.
श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी प्रमोद पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दुगाड ता. भिवंडी येथील गोदामास भेट दिली असता बाजार समिती ठाणे यांच्या आदेशाने येथील भात सांगली येथील ‘श्री ज्योतिर्लिग एंटरप्राइजेस’ यांच्याकडे भरपाईसाठी नेत असल्याचे उघडकीस आले.
ठाणे व पालघर जिल्ह्यात अनेक भात भरडाई गिरण्या असताना व या गिरणी मालकांनी बाजार समित्यांकडे भात भरडाईची मागणी केलेली असताना देखील येथील भात शेकडो किलोमीटर लांब अंतरावर देण्याचे कारण काय? हा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुरच्या जिल्ह्यातील गिरणीदारांना भरडाईचा ठेका देऊन वाहतूक भत्याच्या नावाने शासनाच्या कोटय़वधी रुपयांची लूट सुरू असल्याचा आरोप श्रमजीवीने केला असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बाजार समिती ठाणेचे अधिकारी (डीएमओ) केशव ताटे यांना याबाबत विचारले असता स्थानिक गिरणी मालकांनी भरडाईसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तशी नोदणी केली तर यापुढे ठाणे-पालघर जिल्ह्यातील भात भरडाई गिरण्यांना भात भरडाईसाठी दिले जाईल असे ताटे यांनी सांगितले.
आदिवासी विकास महामंडळ, जव्हार अंतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी पालघर या जिल्ह्यात आधारभूत व एकाधिकार भात खरेदी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांकडून लाखो टन भाताची खरेदी केली जाते. या भाताची भरडाई करतांनाही वाडा तालुक्यात विविध केंद्रांवर खरेदी केलेले भात भरडाई करण्यासाठी पालघर तालुक्यातील भात गिरणीधारकांकडे नेले जाते. तर विक्रमगड तालुक्यात खरेदी केलेले भात वाडा तालुक्यातील भात भरडाई गिरण्यांमध्ये आणले जात आहे.
गेल्याच आठवडय़ात वाडा तालुक्यातील अबिटघर परिसरात असलेल्या एका गोदामांमध्ये साठवणूक केलेले शेकडो टन भात महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पालघर तालुक्यातील ढेकाले येथील समृद्धी भात गिरणीमध्ये भरडाईसाठी वाहतूक केली आहे. अजूनही असे प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
वाहतूकीवरच अधिक खर्च
शून्य ते पाच किलोमीटर अंतरावरील वाहतुकीसाठी प्रति क्विंटल सहा रुपये दर वाहतूकदाराला दिला जातो. तर हिच वाहतूक ४० किलोमीटर अंतरावर असेल तर प्रति क्विंटल ५० रुपये दिले जातात. जितकी लांब अंतरावर वाहतुक होईल तितका जास्त दर वाहतुकीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला मिळत असतो. अधिकारी आणि वाहतूक ठेकेदार यांच्या संगनमताने अधिक भाडे मिळवण्यासाठी अधिक लांब अंतरावर भात भरडाईसाठी पाठवले जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपये अधिक खर्च होत असतानाही महामंडळाचे संचालक मुग गिळून बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महामंडळाने खरेदी केलेल्या भात भरडाईमध्ये व भरडाई केलेला तांदुळ शासनाच्या गोदामांमध्ये पोहोचेपर्यंत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे, या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी.
प्रमोद पवार, पदाधिकारी, श्रमजीवी संघटना पालघर.
महामंडळाने खरेदी केलेल्या भाताची ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी भरडाई करण्याचे शासनाचे आदेश असल्याने पालघर जिल्ह्यातील उपलब्ध होत असलेल्या कुठल्याही भात गिरणीमधून भात भरडून घेतले जात आहे.
– विजय गांगुर्डे, प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ जव्हार.