योग्य संदर्भीय सेवा व वडिलांना अंत्यविधीची माहिती दिल्याचे प्रशासनाचा दावा
पालघर : मोखाडा तालुक्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या जोगलवाडी येथील अविता सखाराम कवर (२४) या महिलेच्या गर्भाशयातील बाळ मृत असल्याचे आढळल्याने तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र तिचे पती व नातेवाईकांचे अज्ञान व समन्वयाच्या अभावामुळे मृत अर्भकाला त्याच्या वडिलांनी पिशवीमध्ये घालून ९० किलोमीटरचा प्रवास एसटीने केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे गेल्या ११ वर्षात विविध क्षेत्रात प्रगती केल्याचा टेंभा मिरवणाऱ्या शासकीय यंत्रणेची लक्तरे उघड्यावर पडली असून शासकीय यंत्रणेमध्ये असणाऱ्या असंवेदनशीलतेचा फटका आदिवासी कुटुंबाला सोसावा लागला आहे.
रोजगारासाठी वीटभट्टीवर स्थलांतरित झालेल्या कविता सखाराम कवर हिच्या तिसऱ्या खेपेतील प्रसुतीची नोंद ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत करण्यात आली होती. ही गर्भवती महिला २६ मे रोजी आपल्या मूळ गावी परतल्यानंतर तिची पाहणी गावातील आशा सेविका यांनी करून सायदे उपकेंद्रात तिची नोंद केली. तिचे आरोग्य त्यावेळी व्यवस्थित असल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले असून तिला दर बुधवारी होणाऱ्या गर्भवती महिलांच्या तपासणी शिबिरात उपस्थित राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
११ जून रोजी सकाळी ११.३० वाजताच सुमारास या महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या सासऱ्याने गावातील आशा सेविकेला पाचरण केले. त्यावेळी १०८ प्रणाली व १०२ प्रणालीच्या रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने या आशा सेविकेने खाजगी वाहनाद्वारे या महिलेला खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. या ठिकाणी महिलेची तपासणी केली असता बाळाचे ठोके लागत नसल्याने या महिलेला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भीय सेवेसाठी पाठविण्याचे ठरवण्यात आले. तसेच १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने तीन वाजताच्या सुमारास ही महिला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
या महिलेच्या पोटामधील आठ महिन्याचे अर्भक मृत अवस्थे मध्ये असल्याने तसेच या महिलेला ताप आल्याने आईच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या महिलेला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचे ठरविण्यात आले. मात्र तिच्यासोबत शेजारची वृद्ध महिला असल्याने घरून तिच्या पतीला बोलवण्यास विलंब झाला. सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास तिचे पती आल्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास या महिलेला नाशिक येथे पाठवण्यात आले.
या महिलेची सामान्य पद्धतीने प्रसुती रात्री १०.४० वाजता झाल्याने तिने मृत अवस्थेतील १.६० किलो वजनाच्या मृत मुलीला जन्म दिला. त्यानंतर सकाळी हे मृत बाळ पती सखाराम कवर यांना अंत्यविधीसाठी सोपवताना त्यांना त्या संदर्भातील माहिती देऊन व संमती पत्र नोंदवून घेतल्याचे नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र सखाराम कवर यांनी आपल्या मृत नवजात मुलीला १२ जून रोजी सकाळी पिशवीत घालून सुमारे ९० किलोमीटरचा प्रवास करून आपले मूळ गाव गाठले व त्या ठिकाणी तिच्यावर अंत्यविधी करण्यात आले. तसेच अविता कवर यांना काल (१३ जून) नासिक रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र त्यांनी देखील रुग्णवाहिका सेवा नाकारून खाजगी वाहनाने प्रवास करणारे पसंत केल्याचे रुग्णालयातील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान आपल्याला योग्य वेळी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचे आरोप कवर कुटुंबीयांनी केले असून या आरोपांचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी खंडन केले आहे. संदर्भीय सेवा पुरवण्यास जव्हार, मोखाडा येथे खाजगी रुग्णालय नसल्याने गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यासाठी नाशिक येथे पाठवणे आवश्यक होते व त्यात विलंब झाला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शासकीय निधीतून वाहनाचा खर्च उचलण्यात आला व त्यानंतर १०८ प्रणालीच्या रुग्णवाहिकेतून या महिलेला संदर्भीय सेवेसाठी हलवण्यात आले असे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. दरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मृत अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नाशिक येथे असणाऱ्या सुविधा व त्यासाठी सहकार्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्याचे स्पष्ट करण्यात आले असून आपल्याकडून कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा झाला नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
आदिवासी समाजामध्ये असणारे समज, शिक्षणाचा अभाव व रूढी परंपरा त्याच्यामुळे या मृत बालिकेला मूळ गावी घेऊन येण्याचा प्रयास सखाराम कवर यांनी केला असून याकरिता खाजगी वाहन करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या सेवेचा वापर केल्याचे दिसून आले आहे. एकीकडे गेल्या ११ वर्षात केंद्र सरकारने अनेक लोकोपयोगी धोरणांची अंमलबजावणी केल्याचा टेंबा सरकार मिरवत असताना शववाहिनी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक तसेच पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागात असणारा समन्वयाचा अभाव या केवीलवाणी व हृदयस्पर्शी घटनेवरून स्पष्ट झाले आहेत.
आणखी एक सर्पदंश मृत्यू
२९ मे रोजी मनोर येथील ग्रामीण रुग्णालय एका पाच वर्षीय मुलाचा सर्पदंशमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज (ता. १४) सकाळी आठ वर्षीय प्रतीक्षा बाबू पालकर या मुलीचा सर्पदंशाने डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या मुलीच्या मानेजवळ मण्यार जातीच्या सापाने दंश केल्यानंतर तिला तीन वाजल्याच्या सुमारास वाणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. त्या ठिकाणी तिला सर्पदंशवर उपचारार्थी १० इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी देखील तिला पुन्हा १० सर्पदंश इजेक्शन दिल्यानंतर देखील सकाळी ५.४५ वाजल्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी पत्रकाराला दिली. मानेजवळ दंश झाल्याने विष मेंदूमध्ये पोहचून प्रकृतीवर लवकर परिणाम झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.