मुंबई अहमदाबाद महामार्गावरील प्रवास धोक्याचा दरड कोसळण्याची भिती

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण घाट, धानीवरी तसेच डोंगरउतारावर ठिकठिकाणी महामार्गावर दरड कोसळून धोकादायक वळणांवर अपघाताचा धोका संभवतो.

pg3 road
संग्रहित छायाचित्र

डहाणू : मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण घाट, धानीवरी तसेच डोंगरउतारावर ठिकठिकाणी महामार्गावर दरड कोसळून धोकादायक वळणांवर अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे या दरडी कोसळून होणारी हानी रोखण्यासाठी घाटात संरक्षक भिंत किंवा उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर धानीवरी, मेंढवण, ढेकाळे खिंडीत तर अनेक भागात डोंगर कपारीतून मोठमोठाले दगड निखळून महामार्गावर कोसळण्याच्या बेतात आहेत. पहिल्याच पावसात मेंढवण घाटात मोठे दगड निखळून महामार्गावर आले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने  महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती आणि डागडुजीसाठी आयआरबी कंपनीला ठेका दिला होता. त्याचा कालावधी आता संपला आहे. सध्या तीन महिन्यांसाठी अन्य ठेकेदार कंपनीकडून टोल वसुलीचं काम सुरू आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच तात्पुरता ठेका असलेल्या कंपनीकडून महामार्गाची निगा राखणे आणि पावसाळय़ाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवन, धानीवारी, ढेकाळे आणि खानिवडे या तीन घाटांदरम्यान तीव्र स्वरूपाची मोठमोठी नागमोडी वळणे असल्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी हायवेवेरील डेंजर झोनमधील दरड नियंत्रणासाठी संबंधित प्राधिकरणाने विभागामार्फत तातडीची उपाययोजना म्हणून मोहीम तातडीने हाती घेणे गरजेचे आहे.

मृत्यूचा सापळा?

मुंबई अहमदाबाद महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काही नियम, शर्ती आणि अटी लावल्या असल्या तरी त्याचे पालन मात्र केले जात नाही. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर ढिगारे, अर्धवट कामे तशीच आहेत. अनेक ठिकाणी महामार्गावर दरडी कोसळण्याच्या बेतात आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा महामार्ग म्हणजे जणू मृत्यूचा सापळा बनलेला आहे. शिवाय रस्त्यांवरील खड्डे चुकविताना वाहनचालकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यामुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक बनला आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fear dangerous danger traveling mumbai ahmedabad highway ysh

Next Story
जिल्ह्य़ातील ३० टक्के ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव संमत; विक्रमगड, मोखाडा तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ठराव समंत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी