पालघर :साडेपाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या राज्यातील भागातील झालेले काँक्रिटीकरण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह राज्यातील विविध आमदारांनी जिल्हा नियोजन बैठकीच्या प्रसंगी जाहीरपणे मत मांडले. झालेल्या कामाची त्रयस्थ पद्धतीने पाहणी करून तपासणी करण्याची मागणी देखील याप्रसंगी करण्यात आली. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी पुढील आठवड्यात पाहणी करून या संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना गणेश नाईक यांनी दिल्या.
केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून हाती घेण्यात आलेले राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प सर्वत्र उत्तम पद्धतीने राबवले जात असताना पालघर जिल्ह्यातील काँक्रिटीकरणाचे काम सुमार दर्जाचे कसे झाले असा सवाल आमदार विलास तरे यांनी व्यक्त करून नापसंती व्यक्त केली. आमदार राजेंद्र गावित यांनी रस्ता उभारणीच्या पहिल्याच वर्षी २० हजार खड्डे पडल्याचे सभागृहाच्या बैठकीत सांगितले. आमदार निकोले यांनी काँक्रिटीकरणपूर्वी महामार्गाच्या दुरवस्थेपेक्षा बिकट परिस्थिती झाल्याचे सांगून येथील लोकप्रतिनिधींना विधिमंडळात प्रवास करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे नमूद केले. इतर लोकप्रतिनिधींनी देखील महामार्गाच्या उभारणीत रस्त्याची पातळी राखली गेली नसल्याने तसेच सध्याच्या अवस्थेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून झालेल्या कामाची तपासणी करण्याची मागणी केली.
या संदर्भात पालकमंत्री यांनी आमदार महोदयांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमती दर्शवत राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याचे मान्य केले. जोपर्यंत या कामाचा दर्जा तपासला जात नाही व काम पूर्णपणे व्यवस्थित होत नाही तोपर्यंत या रस्त्याचे हस्तांतर करून घेण्यात येऊ नये अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी यांनी भाईंदरच्या सीमेपासून गुजरातच्या सीमेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यासोबत रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा असे देखील सुचित केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी महामार्गावरील वाहतूक कोंडी निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित केल्याचे याप्रसंगी सांगितले. या प्रयत्नाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर ही बाब मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणण्यात येईल असे सांगण्यात आले.
अवजड वाहनांनी मार्गीका शिस्त पाळावी
सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना अवजड वाहन उजव्या बाजूने प्रवास करीत असल्याचे आपल्याला अनेकदा निदर्शनास आले असून हलक्या वाहनाला ओव्हरटेक करताना डाव्या बाजूच्या मार्गीकेचा अवलंब करावा लागत असल्याचे पालकमंत्री यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. ही बाब आपण परिवहन मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली असून यासंदर्भात मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय तसेच पालघर पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत व महामार्ग पोलिसांच्या मदतीने मार्गिका शिस्त पाळण्यासाठी वाहन चालकांचे समुपदेशन तसेच आवश्यकता पडल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.